केशर खरेदीला व्यापारीच नाही

Buying saffron is not a business dealer
Buying saffron is not a business dealer

अमेरिकन केशरचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची व्यथा 

पुणे - राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी अमेरिकन केशरच्या नावाखाली करडई घेतली त्यांचे अनुभव समस्त शेतकऱ्यांना निश्चितच जागरूक करणारे आहेत. अमेरिकन केशरची प्रती बी ३० ते ४० रुपये दराने खरेदी करून पीक घेतले. घरी काही किलोपर्यंत हे केशर पडून आहे, मात्र ते खरेदी करायला आज कोणीच व्यापारी तयार नाही. मोठी गुंतवणूक करूनही हाती काहीच लागले नसल्याने आपण पुरते फसवलो गेल्याने निराशा झाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात पापलवाडी (ता. महागाव) येथील शेतकरी भीमराव हेलगंड यांनी मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये सात गुंठ्यांत अमेरिकन केशर लागवडीचा प्रयोग केला. ते म्हणाले की, जोधपूर येथे हे पीक माझ्या पाहण्यात आले. संबंधित शेतकऱ्याला त्याविषयी विचारले असता त्याने ते अमेरिकन केशर असल्याचे सांगितले. त्याच्याकडून प्रति बी ३० रुपये इतक्या महागड्या दराने एक हजार बिया आणल्या. त्याचे तीस हजार रुपये दिले. इंटरनेटवर या केशरला किलोला ६५ हजार ते ७० हजार रुपये दर असल्याचे आम्हाला कळाले. राज्यातील एका शेतकऱ्यानेही हा दर ४० हजार रुपये असल्याचे आम्हाला सांगितले. आता काढणी झाली आहे. ११ किलो उत्पादन मिळाले आहे. अद्याप त्याला व्यापारी मिळालेला नाही. मध्य प्रदेशातील ज्या व्यापाऱ्याला ते विकायचे ठरवले होते त्याने अद्याप पुढील खरेदीदार नसल्याचे कारण देत खरेदीला नकार दिला आहे. 

तज्ज्ञांनी दिला शास्त्रीय अहवाल 
महागाव तालुका कृषी विभागाने मात्र हेलगंड यांनी केलेल्या प्रयोगाची शहानिशा केल्याने परिसरात जागरूकता होण्यास मदत होत आहे. तालुका कृषी अधिकारी आर. डी. गणवीर याबाबत म्हणाले, की हेलंगड यांनी प्रयोग तर केला. पुढे झाडांना फुले येऊ लागल्यानंतर केशरची फुले समजून हा प्लॉट पाहण्यासाठी अनेकजण त्यांच्या शेताला उत्सुकतेने भेट देऊ लागले. आम्हाला मात्र हे पीक करडईसारखे दिसत होते. शास्त्रज्ञांकरवी त्याची खात्री पटवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील करडई विषयातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ज्ञ व आम्ही कृषी विभागाचे प्रतिनिधी यांनी मिळून या प्रयोगाची पाहणी केली. अधिक निरीक्षणाअंती ते करडईचे वाण असल्याचे निष्पन्न झाले. कृषी विद्यापीठातील संबंधित शास्त्रज्ञांनी तसा लेखी अहवालही आमच्याकडे दिला आहे. एवढेच नव्हे तर त्या शास्त्रज्ञांनी संबंधित शेतकऱ्याला विद्यापीठात बोलावून करडईचे तुलनात्मक प्रायोगिक प्लॉट दाखवून त्याचे प्रत्यक्ष समाधान केल्याचे गणवीर यांनी ऍग्रोवनला सांगितले. 

६० किलो केशर विक्रीअभावी पडून 

मोरगाव (ता. रावेर, जि. जळगाव) येथील शेतकरी संजय पाटील यांचाही अनुभव धक्कादायक आहे. ते म्हणाले, की सुमारे दोन वर्षांपूर्वी या पिकाविषयीची माहिती राजस्थानात मिळाली. मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याने प्रती बी ४० रुपये अशा महागड्या दराने बी दिले. इंटरनेटवर अमेरिकन सॅफ्रॉनची लागवडीपासून ते मार्केटपर्यंत सगळी माहिती घेतली. दोन वर्षांपूर्वी अर्ध्या एकरात पहिला प्रयोग केला. त्यात साडेपंधरा किलो उत्पादन मिळाले. मार्केटिंगची चिंता त्यावेळीही होती. पण मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याने ४० हजार रुपये प्रति किलो दराने उत्पादन खरेदी केले. त्यामुळेच याला मार्केट आहे असे वाटून मागील वर्षी क्षेत्र दोन एकर केले. 

बियाण्याचाच खर्च जास्त 
पाटील म्हणाले, की एकरी सुमारे ४००० म्हणजे दोन एकरांत ८००० बिया लागल्या. मागील वर्षीचे बियाणे वापरल्याने त्यावरील खर्च वाचला. अन्यथा ४० रुपये प्रति बी या हिशेबाने दोन एकरांत तीन लाख २० हजार रुपये केवळ बियाण्याचाच खर्च आला असता. 

रडकुंडीला आलोय 
पाटील म्हणाले, की पहिल्या वर्षी अर्धा एकरासाठी लावणी ते काढणीपर्यंत पावणेदोन लाख रुपयांचा खर्च केला. यंदा त्यातील काही खर्च वाचून एकरी ३० ते ४० हजार म्हणजे दोन एकरांत ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. यंदा तेवढ्या क्षेत्रात ५५ ते ६० किलो उत्पादन मिळाले. विक्रीसाठी मध्य प्रदेशातील नेहमीच्या व्यापाऱ्याशी संपर्क केला. मात्र सध्या तरी मालाची गरज नाही, असे उत्तर पाटील यांना ऐकावे लागले. आज त्यांचा ६० किलोपर्यंतचा माल घरी तसाच पडून आहे. 

शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगतो आहे 
मी उत्पादन घेऊन केशर विकले तोपर्यंत तरी मला ही करडई आहे हे माहितच नव्हते. आज त्याबाबत माहित होऊ लागले आहे. प्रसारमाध्यमे, व्हॉटसॲपच्या माध्यमातून माझ्या प्रयोगाची प्रसिद्धी झाली. त्या माध्यमातून अनेक शेतकरी माझा केशरचा प्रयोग पाहण्यासाठी भेट देऊ लागले. ज्यांनी बियाणे मागितले त्यांना किलोला २५ रुपये या दराने काही बियाणेदेखील विकले. आज मला खरी वस्तुस्थिती समजली आहे. आता माझ्याशी संपर्क करणाऱ्या प्रत्येकास या प्रयोगातील धोके समजावून देऊन शेतकऱ्यांना सावध करायला सुरवात केली आहे. 

अमेरिकन केशर असा प्रकारच नाही 
अन्न सुरक्षितता (फूड सेफ्टी) क्षेत्रातील केंद्र सरकारच्या ‘एफएसएसएआय’ संस्थेचे पुणे येथील सहायक आयुक्त संजय शिंदे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये ज्या वनस्पतीपासून केशर (सॅफ्रॉन) मिळते तेच अस्सल केशर समजले जाते. ‘फूड सेफ्टी’ कायद्याअंतर्गत त्याचे निकष आहेत. हे केशर वगळता अन्य कोणत्याही वनस्पतीचे केशर हे संमत नाही. अमेरिकन केशर असाही काहीही प्रकार नाही. अस्सल केशरच्या नावाखाली जर कोणी व्यापारी भेसळयुक्त उत्पादनाची विक्री करीत असेल तर ते आमच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com