साखरप्यात साकारत आहेत वर्तुळाकार परसबागा

शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

साखरपा - येथे वर्तुळाकार परसबागांचा प्रकल्प साकारत आहे. उमेद संस्थेच्या पुढाकारातून बचत गटांना प्राधान्य देत, केवळ सेंद्रिय खतांवर भाजीपाला तयार करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे.

साखरपा - येथे वर्तुळाकार परसबागांचा प्रकल्प साकारत आहे. उमेद संस्थेच्या पुढाकारातून बचत गटांना प्राधान्य देत, केवळ सेंद्रिय खतांवर भाजीपाला तयार करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे.

एका घराला लागणारा भाजीपाला घराच्या आवारात तयार व्हावा आणि तोही केवळ सेंद्रिय खतावर हा उद्देश ठेवून उमेद संस्थेकडून महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अभियानाचा भाग म्हणून परसबाग प्रकल्प साखरपा येथे राबविण्यात येत आहे. बचत गट, वैयक्तिक लाभार्थी यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभा राहत आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य सखी म्हणून काम करणाऱ्या दीपिका कदम यांनी माहिती दिली.

आठवडा बाजारातून आणलेल्या भाज्यांची प्रत आणि पौष्टिकता आपल्याला माहिती नसते. म्हणून घरच्याघरी तयार केलेल्या आणि सेंद्रिय खतांवर पिकवलेल्या भाज्या सर्वात चांगल्या. हाच उद्देश ठेवून उमेद संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. 

सर्वसाधारण चार वर्तुळात तयार केलेले वाफे हे एका कुटुंबाला सर्व प्रकारच्या भाज्या मिळवून देतात. वर्तुळाच्या सर्वांत आत केंद्रस्थानी मोठा खड्डा करून त्यात शेण, पालापाचोळा घालून वाफ्याला लागणारे कंपोस्ट खत जागेवरच केले जाते. त्यानंतर आतून बाहेर याप्रमाणे औषधी वनस्पती,पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या आणि सर्वात बाहेर पपई, सीताफळ, लिंबू, कडीपत्ता अशी झाडे लावली जातात. अशा पद्धतीने साखरपा गावात ३२ वैयक्तिक आणि ११ गटांनी परसबागा तयार केल्या आहेत. धनश्री जोशी यांनी अशी परसबाग आपल्या शेतात तयार केली असून त्यातून तयार केलेल्या भाजीची विक्री केली आहे. 

या पद्धतीने तयार केलेल्या मुळा, पालक, माठ यांची पौष्टिकता अधिक आहे. गांडूळ खतावर तयार केलेल्या या भाजीला ग्रामस्थांची मोठी मागणी आहे. पहिल्या प्रयत्नात तयार केलेली भाजी गावातच विक्री केली. भाजीला मागणी वाढत आहे.
 - धनश्री जोशी,
बचत गट सदस्या