कापूस निर्यातीत वाढ होणार

Cotton
Cotton

भारतीय रुपयात झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात झालेली वाढ यामुळे भारताच्या कापूस निर्यातीने वेग पकडला आहे. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या आशियाई देशांकडून भारतातील कापसाची खरेदी वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानकडून मात्र भारतीय कापसाची खरेदी थंडावली आहे.

भारतातून कापूस निर्यात वाढत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरावर दबाव येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे दर आठ महिन्यांतील सर्वोच्च पातळीच्या आसपास पोचले आहेत. तसेच आशियाई देशांनी भारताकडून कापूस खरेदी वाढवल्याने अमेरिका आणि ब्राझील यांच्याकडून आशियाई देशांना होत असलेल्या निर्यातीमध्येही घट होण्याची चिन्हे आहेत. 

‘गेल्या पंधरवाड्यात कापूस निर्यातीत चांगली उलाढाल झाली. चीनकडून खरेदी वाढली आहे,’’ असे डी. डी. कॉटन या निर्यातदार फर्मचे व्यवस्थापकीय संचालक अरुण सेखसरिया म्हणाले.

एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नवीन विपणन वर्षात (२०१९-२०) १० लाख गाठी कापसाची निर्यात झाली. जानेवारी आणि फेब्रुवारीत आणखी सात लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झालेले आहेत, असे पाच निर्यातदारांनी रॉयटर्सला सांगितले.

काही आठवड्यांपूर्वीपर्यंत भारताची कापूस निर्यात मंदावली होती. देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत अधिक असल्याने निर्यातीत पडतळ बसत नव्हती. केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किमतींत वाढ केलेली आहे. यंदाच्या हंगामासाठी प्रति क्विंटल ५५५० रुपये आधारभूत किंमत आहे. गेल्या दोन वर्षांत कापसाच्या आधारभूत किमतीत ३८ टक्के वाढ झाली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरांनी उसळी घेतल्यामुळे आणि भारतीय रुपया घसरल्यामुळे भारतीय कापूस जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक ठरू लागला आहे. त्यामुळे निर्यातीत वाढ होण्याचे चित्र आहे, असे सेखसरिया यांनी सांगितले.

बांगलादेश आणि चीन यांच्याकडून जोरदार कापूस खरेदी सुरू असून व्हिएतनाम आणि इंडोनेशिया थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करत आहेत, असे एका मुंबईस्थित डीलरने सांगितले. ब्राझील आणि अमेरिकेतील कापसाच्या तुलनेत भारतातील कापसाचे दर ३ ते ४ सेन्ट कमी आहेत. सध्या भारतातील कापसाला चांगली मागणी आहे, असे त्याने स्पष्ट केले.

भारतातील कापूस उत्पादन २०१९-२० मध्ये ३५५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात १३.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. 

एरवी भारतातून कापूस आयात करण्यात पाकिस्तान आघाडीवर असतो. परंतु सध्या काश्मीरमधील स्थितीवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने व्यापारावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुलनेने स्वस्त असूनही पाकिस्तान सध्या भारतातून कापूस खरेदी करत नाही, असे नवी दिल्लीतील एका डीलरने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com