कापसाच्या दरात घसरणीची शक्यता

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची घटती मागणी आणि उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज यामुळे कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची घटती मागणी आणि उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज यामुळे कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. कापसाचा पुरवठा आणि मागणीचे चित्र पाहता कापसाचे दर उसळी घेण्याची शक्यता नाही, असे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या ऑगस्ट महिन्याच्या अहवालात म्हटले आहे. २०१९-२० मध्ये कापूस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज असला तरी मागणीचे चित्र मात्र उत्साहवर्धक नाही, असे अहवालात नमूद केले आहे.

‘‘जागतिक कापूस वापरात १.७ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. परंतु, कापूस उत्पादनात मात्र ६ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत ३ लाख टन कापूस जादा उपलब्ध होईल. त्यामुळे आंतराराष्ट्रीय पातळीवरील कापसाचा साठा १८० लाख टनावर पोचेल. तसेच जागतिक अर्थकारणाचा विस्तार मंदावला आहे. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून येत्या हंगामात कापसाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता मंदावली आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुध्द अधिकच तीव्र झाल्याचा फटका कापूस बाजारपेठेला बसणार आहे. जून २०१९ मध्ये झालेल्या जी-२० बैठकीमध्ये या दोन देशांमधील वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, त्यात यश आले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात घसरण होणार आहे. 

२०१९-२० मध्ये जागतिक कापूस उत्पादन २७२ लाख टन राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला आहे. चीन ५९ लाख टन कापूस उत्पादन घेऊन पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागेल. भारतात ५७.५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर प. आफ्रिकेत १३ लाख टन कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. प. आफ्रिकेतील हे आजपर्यंतचे सर्वोच्च उत्पादन असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton prices to fall

टॅग्स