पीक व्यवस्थापन सल्ला 

पीक व्यवस्थापन सल्ला 

फळझाडे ः 
मोसंबी ः 
१) आंबे बहाराची फळे धरण्यासाठी बागेस जमिनीच्या मगदुरानुसार ४० ते ६० दिवसांचा पाण्याचा ताण देण्यास सुरवात करावी. 
२) बागेत उभी व आडवी नांगरणी केल्यास पाण्याचा ताण लवकर बसेल. 
३) मोसंबीच्या खोडाला बोर्डोपेस्ट लावावी. 
४) मृगबहार धरला असल्यास बागेला दुहेरी बांगडी पद्धत किंवा ठिबक संचाद्वारे नियमित पाणी द्यावे. 
५) आंतरमशागत व खते झाडाच्या घेराच्या बाजूने आणि खोडाच्या दूरवर द्यावीत. 

आंबा ः 
१) बहार धरण्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत पाण्याता ताण द्यावा. 
२) नवीन लागवड केलेल्या कलमांमा काठीचा आधार द्यावा. 
३) नवीन कलमे बांधलेली असल्यास त्या ठिकाणची पट्टी सैल करून परत बांधावी. 
४) कलमाच्या खुंटावर आलेली नवीन फूट काढून टाकावी. 
५) नवीन कलमांना नियमित पाणी द्यावे, सावली करावी. 
६) जिरायतीमध्ये नवीन लागवड केलेल्या कलमांचे आळे स्वच्छ करून त्यात पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा गवताचे आच्छादन टाकावे. 
७) खोडाला बोर्डोपेस्ट लावावी. 

केळी ः 
१) नवीन लागवड केलेल्या बागेतील नवीन पिले कापून टाकावीत. 
२) लागवड केलेल्या केळी बागेस ६ महिन्यांनंतर प्रत्येक झाडास ५० ग्रॅम नत्र द्यावे. 
३) बागेस पाण्याच्या पाळ्या नियमित द्याव्यात. 
४) बागेवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास रोगग्रस्त पाने कापून बांधावर जाळून नष्ट करावीत. 
५) केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. बागेभोवती सकाळी शेकोट्या पेटवावेत. 

भाजीपाला लागवड ः 
मिरची ः 
१) परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१ आणि संकेश्वरी या जातींची निवड करावी. प्रति हेक्टरी एक किलो बियाणे वापरावे. रोपे तयार करून १५ नोव्हेंबरपर्यंत लागवड पूर्ण करावी. 
२) जमिनीनुसार ६० बाय ६० सें.मी. किंवा ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. 
३) प्रति हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश जमिनीत पेरून लागवड करावी. ५० किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर ४५ दिवसांनी बांगडी पद्धतीने देवून लगेच पाणी द्यावे. 

कांदा ः 
१) ॲग्रिफाउंड लाईट रेड, डार्क रेड, एन-५३, बसवंत-७८०, एन-२-४-१, पीकेव्ही लोकल, फुले सफेद या जातींची निवड करावी. 
२) मध्यम निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी. प्रति हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागते. रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. ८ ते १० आठवड्यांनी रोपे लागवडीस निवडावीत. लागवड क्षेत्रात भर खते आणि शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. लागवड १५ बाय १० सें.मी. अंतरावर करावी. 

फुलकोबी ः 
१) स्नोबॉल-१६, पुसा सिंथेटिक या जातींची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी ६०० ते ७०० ग्रॅम बियाणे लागते. गादीवाफ्यावर रोपे करावीत. १५ नोव्हेंबरपर्यंत लागवड पूर्ण करावी. 
२) हेक्टरी १६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व पालाश ८० किलो खतमात्रा द्यावी. 
३) ६० बाय ६० किंवा ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. 

वाटाणा ः 
१) सिलेक्शन-८२, सिलेक्शन-९३, जवाहर, आर्केल या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. 
२) लागवडीसाठी मध्यम ते भारी निचऱ्याची जमीन निवडावी. शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी. लागवड ३० बाय १० किंवा ४५ बाय १० सें.मी.वर करावी. 

मेथी ः 
१) पुसा आर्लिब्रांचींग, पुसा कसुरी, आरएमटी-१, सिलेक्शन या जाती निवडाव्यात. प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे लागते. 
२) लागवडीसाठी ३ बाय २ मी. आकाराचे सपाट वाफे करावेत. बी फेकून किंवा २५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. 
३) प्रति हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. ५० किलो नत्राची मात्रा मेथी कापणीनंतर द्यावी. 

कोथिंबीर ः 
१) स्थानिक शिंपी, डी.डब्ल्यू.डी.-३, सी.एस.-४ या जाती निवडाव्यात. मध्यम काळ्या जमिनीत लागवड करावी. जमिनीत पुरेसे शेणखत मिसळून लागवड करावी. 
२) हेक्टरी ४० किलो बियाणे लागते.१० बाय १५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. 

पालक ः 
१) ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित या जातींची निवड करावी. हेक्टरी १० किलो बियाणे लागते. प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. 
२) लागवडीसाठी ३ बाय २ मी. आकाराचे सपाट वाफे करावेत. १० बाय १० सें.मी. अंतरावर लागवड करावी. 

पीक व्यवस्थापन ः 
१) खरीप ज्वारी व बाजरीची कापणी करून उतारास आडवी नांगरट करावी. 
२) बागायती हरभऱ्याची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. 
३) गव्हास पेरणीच्या वेळी शिफारस केलेले नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. बागायती रबी सूर्यफुलाची पेरणी पूर्ण करावी. 
४) रब्बी ज्वारीस पोटरी अवस्थेत पाणी द्यावे. 
५) बागायती हरभरा, करडईस पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी द्यावे. 
६) सूर्यफुलास पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र द्यावे. बोंडे लागते वेळी व फुलोऱ्यात असताना पाणी द्यावे. 
७) पूर्वहंगामी उसाची लागवड १५ तारखेपर्यंत संपवावी. 
८) टोमॅटो, फुलकोबी, पानकोबी, कांदा रोपांची पुनर्लागवड करावी. 
९) ज्या ठिकाणी रब्बी पेरणी उशिरा होणार आहे, तेथे लवकर तयार होणारे आणि किडी रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी द्यावयाची मिश्र तसेच संयुक्त खते जमिनीत पेरून द्यावीत. 
१०) पेरणीनंतर लगेच पाणी देण्यासाठी सारे पाडावेत. 
११) कोरडवाहू फळझाडात आच्छादन व मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. 
१२) पाण्याची बचत करण्यासाठी फळबाग, ऊस पिकास ठिबक संचाद्वारे पाणी द्यावे. 
१३) पूर्व हंगामी उसात कोबी, कांदा, बटाटा यासारखे आंतर पीक घ्यावीत. 

संपर्क ः ०२४५२- २२९००० 
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com