डोंगरकपारीत तरुणाने फुलविली फूलशेती

निवास मोटे
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पोहाळे तर्फ आळते - येथील नंदकुमार मारुती चौगले या तरुण शेतकऱ्याने माळरानात जरबेरा फुलांचा मळा फुलविला. त्याची फुले रोज मुंबई, दादर बाजारपेठेत जातात. ते २०१२ मध्ये नोकरी सोडून ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय करत शेतीकडे वळले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर, घरातील लोकांचे मार्गदर्शन यामुळे शेतीत विविधरंगी जरबेरा फुले आनंदाने डोलत आहेत.

२०१६ ला त्यांनी पंजाबवरून सुधारित बटाटे बियाणे मागवून अर्धा एकर शेतीत आंतरपीक म्हणून बटाटे शेती केली; परंतु अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. नाराज न होता, त्यांनी शेतीचे पुढचे प्रयोग चालू ठेवले. २०१७ मध्ये सरकारकडे त्यांनी ग्रीन हाऊससाठी अर्ज केला. त्यात १३ गुंठे क्षेत्रात त्यांनी ग्रीन हाऊसची उभारणी केली. यात जरबेरा फूलशेती लागवड केली.
भागातील शेती ही डोंगरभागातील आहे. या ठिकाणी मोर, लांडोर, वानर यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

कमी क्षेत्र असल्याने मशागती करताना येथील शेती कामासाठी खूप अडचणी या ठिकाणी येतात. वानर, मोर, डुकरांसाठी रात्रीचा कंदील लावणे, पशुपक्ष्यांसाठी कटकटी यंत्र, बुजगावणे, असे प्रयोग त्यांनी केले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, लोकांचे मार्गदर्शन, स्वतः अभ्यास करणे, शेतीत वेळेवर काम करणे, तसेच बाजारभावाचा अभ्यास केल्यास ही शेती फायद्याची ठरते, असे त्यांचे मत असून, आज त्यांचा परिवार शेतात रात्रंदिवस कष्ट करतो. ते विक्रमी पिके घेऊ लागले आहेत. गावात पहिले ग्रीन हाऊस उभारणारे ते शेतकरी ठरले. त्यांना त्यांचे आई-वडील, पत्नी प्रियांका, वहिनी, भाऊ, नातेवाईक यांचे प्रोत्साहन मिळते.

शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेती करणे ही काळाची गरज आहे. यापुढे शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याचा माझा मानस आहे. जरबेरा शेती फायद्याची असून, यापासून आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. 
- नंदकुमार चौगले,
शेतकरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cultivation of flower meeting by Nandkumar Chougle