बचत गटातून दुग्ध व्यवसायाला मिळाली उभारी

sonali
sonali

बोरोडी गावाच्या सरपंचपदी लोकांतून माझी २०१७ साली निवड झाली. या भागात शाश्वत सिंचनाचा अभाव असल्याने रोजगारासाठी लोकांची भटकंती ठरलेली. बहुतेक जण ऊस तोडणी कामगार आहेत. कित्येक वर्ष गावाला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. हे लक्षात घेऊन सर्वप्रथम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जल, मृद संधारणाची कामे केली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गावशिवारात पुरेसे पाणी उपलब्ध झाले. शेती बागायती झाली. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई असताना आमच्या गावशिवारातील ओढे, नाल्यांमध्ये पाणीसाठा आहे. यंदा विहिरीमध्येदेखील चांगला पाणीसाठा झाला. शिवाराच्या विकासाला प्राधान्य दिल्याने गावातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर थांबले आहे. 

लोकसहभागातून विकासाची कामे
बोरोडी गावाची लोकसंख्या सुमारे दीड हजार. दुष्काळी परिस्थिती आणि सिंचनाच्या अभावामुळे  गावात विविध उपक्रम राबवताना लोकसहभाग उपयुक्त ठरला. गावशिवारात लोकसहभाग आणि सरकारी निधीतून १४ सिमेंट बंधारे, २०० हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चर, ४०० हेक्टरवर कंपार्ट बंडिंगची कामे केली. नालाबंडिंगच्या कामावर लोकांनी श्रमदान केले. यातून जमलेल्या रकमेतून ग्रामदैवत मंदिर आणि शाळेमध्येदेखील सुधारणा केली. ग्रामविकास, सिंचनाच्या कामासाठी निधी आणि लोकसहभाग मिळण्यासाठी जयसिंग ईश्वर गव्हाणे, ग्रामसेवक एच. डी. तांबे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी श्री. सुपेकर, कृषी सहायक श्री. राऊत यांच्यासह ग्रामस्थांची चांगली साथ मिळाली. 

शेतीला पशुपालनाची जोड 
दुष्काळी पट्ट्यातील बोरोडी आणि परिसरातील शेती पाण्याअभावी कायम अडचणीत असायची. त्याचबरोबरीने दुग्ध व्यवसायही अडचणीत आला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी चांगली दुधाळ जनावरे विकली. यंदा मात्र परतीचा पाऊस चांगला झाला. जल, मृद संधारणाची चांगली कामे केल्यामुळे  भूगर्भात पाणीसाठादेखील चांगला झाला. गावात दहा महिला बचत गट आहेत. बचत गटाच्या आधारावर नव्याने दुध व्यवसायासाठी दोनशेपेक्षा अधिक दुभत्या गाई, म्हशींची खरेदी झाली आहे. काही महिलांनी शेळीपालन सुरू केले आहे. लोकसहभाग आणि सरकारी योजनांच्या मदतीने दुष्काळमुक्तीचा संकल्प केला. त्याला काहीसे यश येत मोडून गेलेल्या दुग्ध व्यवसायाला पुन्हा बळ मिळू लागले आहे. शेती विकासाला चालना देण्यासाठी शेतकरी गटदेखील सुरू करत आहोत.

सौ. सोनाली गव्हाणे, ९७६३९८४४०४ (शब्दांकन - सूर्यकांत नेटके)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com