देशातील धरणसाठा 53 टक्‍क्‍यांवर 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या मोठ्या 91 जलाशयांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत (ता. 19) 82.92 अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 53 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. 

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या मोठ्या 91 जलाशयांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत (ता. 19) 82.92 अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 53 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. 

मागील आठवड्यात 91 जलाशयांमध्ये 85.97 अब्ज घनफूट पाणीसाठी शिल्लक होता. या आठवड्यात पाणीसाठ्यात 3.6 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 65.98 अब्ज घनफूट पाणीसाठा होता. यंदा मागील वर्षापेक्षा 26 टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा मात्र मागील दहा वर्षांच्या सरासरीच्या एक टक्का पाणीसाठा कमी आहे. दहा वर्षांची सरासरी 83.62 अब्ज घनफूट आहे, अशी माहिती जल आयोगाने दिली आहे. 

देशातील जलाशये यंदाच्या पावसाळ्यात भरली होती. मात्र रब्बी हंगाम सुरू होताच पाणीसाठा कमी होण्यास सुरवात झाली आहे. यंदा देशात नैर्ऋत्य मॉन्सून 97 टक्के झाला. नैर्ऋत्य मॉन्सून मागील वर्षी 86 टक्के झाला होता. नैर्ऋत्य मॉन्सून संपला त्या वेळी देशातील जलाशयांमध्ये साठवण क्षमतेच्या 74 टक्के पाणीसाठा होता. मात्र, मागील दहा वर्षांच्या सरासरीच्या 3.5 टक्के पाणीसाठा कमी आहे.

देशातील जलाशयांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा तेलंगण राज्यात आहे. तेलंगण राज्यात जलाशयांमध्ये 72 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उत्तर प्रदेशातही देशातील सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. उत्तर प्रदेशात 63 टक्के पाणीसाठा अद्याप जलाशयांमध्ये आहे. मध्य प्रदेशातही काही भागांत दुष्काळीसदृश स्थिती असली तरी पाणीसाठा पातळी देशाच्या पातळीपेक्षा जास्त आहे. मध्य प्रदेशातील जलाशयांमध्ये 52 टक्के पाणीसाठा आहे. तामिळनाडू मध्येही जलाशयातील पाणीपातळी चांगली आहे. कर्नाटकात 39 टक्के तर केरळमध्ये 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. 
 
तेलंगणात 74 टक्के साठा 
देशातील जलाशयांमध्ये 53 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. देशात सर्वाधिक पाणीसाठा तेलंगण राज्यात आहे. तेलंगणामध्ये 74 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात 63 टक्के, मध्य प्रदेशात 52 टक्के, कर्नाटकात 39 टक्के तर केरळमध्ये 36 टक्के पाणीसाठा आहे. यंदा केरळ राज्यात जलाशयातील पाणीसाठा सर्वांत कमी आहे.

Web Title: Dam storage is 53 percent at the moment in India