बंधाऱ्यांसाठी एकवटला रुईघर गाव

प्रतिनिधी
गुरुवार, 14 मार्च 2019

भिलार, जि. सातारा - दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून उष्णतेने पाणी समस्या वाढत आहे. रुईघर (ता. जावळी) हे डोंगरकपारीत वसलेले गावही पाणीटंचाईच्या समस्येने तहानलेले आहे. यात्रेच्या निमित्ताने एकवटलेला महिला, पुरुष, युवक अख्खा गाव या पाणीटंचाईच्या विचाराने आणखी घट्ट झाला असून, ऐकीच्या बळातून कुडाळी नदीवर श्रमदानातून पाच जाळीचे बंधारे साकारले आहेत. 

रुईघर गाव हे जावळी तालुक्‍याचे शेवटचे टोक. सनासाळी, गणेश पेठ आणि रुईघर अशा एकवटलेल्या गावांतील ग्रामस्थांनी ‘ग्रामपरी’ या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पाणीटंचाईवर मात करण्याचा निर्धार केला. यात्रेच्या निमित्ताने बैठकीला बसलेला गाव वाद वितंडवाद बाजूला ठेवून भिलार या पुस्तकांच्या गावातून उगम पावलेल्या कुडाळी नदीवर जमा झाला. ग्रामस्थ, महिला, युवक यांनी हा हा म्हणता पाच बंधारे आकाराला आले. कुडाळी नदीकाठाला वसलेल्या या गावाला पावसाळ्यात मुबलक पाणी असते; परंतु उन्हाळ्यात मात्र, या गावाला टॅंकरचा आधार घ्यावा लागतो. या बंधाऱ्यामुळे पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीचे स्रोत मजबूत होऊन पाणीटंचाईवर मात होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

पाचगणी येथील ‘ग्रामपरी’च्या नीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उद्योजक दिलीप घाडगे, मिलिंद शिंदे, सरपंच सुनंदा बेलोशे, सुरेश बेलोशे, अशोक बेलोशे, विलास बेलोशे, ग्रामस्थ, महिला यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी श्रमदानातून दोनच दिवसांत कुडाळी नदीवर पाच ठिकाणी जाळीचे बंधारे बांधले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Determined to overcome the water shortage