आहारात असावा पोषक डाळींचा वापर

आहारात असावा पोषक डाळींचा वापर

डाळींचा रोजच्या जेवणातला उपयोग फक्त आमटी किंवा वरणापुरताच मर्यादित नक्कीच नाही. अर्थात या आमटी आणि वरणाचेच कितीतरी प्रकार करता येतात. दोन-तीन डाळी एकत्र करून किंवा फोडणीत वेगवेगळ्या भाज्या घालून रोजचे वरणही चवदार करता येते. कढी, डाळींचे पीठ पेरलेल्या भाज्या, पीठ लावून केलेली ताकातली भाजी, ढोकळा, धिरडी, घावन, डाळींचे सूप असे इतर पदार्थ आहेत. शिवाय आपल्याकडे डाळींचे पुरण, डाळींचा हलवा, डाळीच्या रव्याचा शिरा, लाडू अशा गोड पदार्थाचीही वानवा नाही. प्रश्न इतकाच आहे की आपण रोजच्या आहारात डाळ वापरतो का? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डाळी पचायला जड असल्यामुळे अनेक जण डाळींपासून दूर राहणेच पसंत करतात. फार-फार तर तूरडाळ किंवा मूगडाळीच्या पुढे जात नाहीत. पण डाळींचे अनेक चांगले गुण आहेत. डाळीत असलेली प्रथिने शरीरातील स्नायूंना बळकटी देतात. डाळींमध्ये जस्त (झिंक), तंतुमय पदार्थ आणि शरीरात नैसर्गिकरीत्या तयार न होणारी अमिनो आम्लेही असतात.

डाळींचे फायदे
तूरडाळ :
ही डाळ पचायला खूप जड किंवा खूप हलकी नाही, तर मध्यम असते. मात्र, ती अति प्रमाणात खाल्ली गेल्यास काहींना पित्ताचा त्रास होऊ शकतो. तूरडाळीत फॉलिक अ‍ॅसिड, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कोलिन हे घटक असल्याने गरोदर स्त्रियांसाठी ही डाळ पोषक समजली जाते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मूगडाळ : ही डाळ अगदी हलकी, पथ्याची डाळ आहे. प्रथिने शरीरात शोषले जाण्यासाठीचे घटक या डाळीत चांगल्या प्रमाणात आहेत. यातले विरघळण्याजोगे तंतुमय पदार्थ (सोल्युबल फायबर्स) शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करतात. मूगडाळीतला ‘आयसोफ्लॅवॉन’ हा घटक ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकासारखा परिणाम देतो. त्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या वेळी मूगडाळ चांगली ठरते. या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अ‍ॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मसूर डाळ : ही डाळ फार कमी वापरली जाते, मात्र या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतड्यांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवते. मसूर डाळीचे थोडेसे सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते. ही डाळ वेगवेगळ्या अ‍ॅलर्जीमध्ये पथ्यकर ठरते.

हरभरा डाळ : या डाळीत ‘सी’ व ‘के’ व्हिटॅमिन आणि जस्त असते. हे घटकही शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. चणाडाळीतले कॅल्शिअम हाडे, दात, नखे मजबूत करते. या डाळीत पोटॅशिअम भरपूर आहे. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब योग्य राहण्यासाठी ही डाळ मदत करते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राहण्यासाठीही तिचा उपयोग होतो.

उडीद डाळ : ही डाळ पचायला जड, पण पौष्टिक असते. त्यामुळे शरीराच्या पोषणासाठी ती चांगली. चमकदार, मऊ केसांसाठी उडीद डाळ आहारात घेतल्यामुळे फायदा होतो. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांचे खाणे कमी असल्यामुळे त्यांना मळाला भरीवपणा नसल्याने बद्धकोष्ठाची तक्रार असते. ही डाळ शरीरात तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा देते. उडीद डाळ यकृतालाही कार्यप्रवण ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे कावीळ, डेंग्यू, मलेरिया किंवा यकृताच्या आजारांमधून पूर्ण बरे झाल्यानंतर यकृताचे कार्य सुधारण्यासाठी ही डाळ आहारात घ्यावी. या डाळीतही पोटॅशिअम चांगले आहे. ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, जस्त आणि तांबेही उडीद डाळीतून मिळते.

डाळी पचण्यासाठी काही उपाय
काही जणांना डाळी खाल्ल्यावर गॅसेस आणि पित्त होते. डाळींमध्ये असलेल्या प्रथिनांचे शरीरात शोषण व्हावे यासाठी शरीरातील ‘ग्लुटोफियन’ हे रसायन काम करते. काही जणांमध्ये वयोमानानुसार किंवा दीर्घकाळ विशिष्ट औषधे घेतल्यामुळे किंवा पोटाच्या तक्रारींमुळे या रसायनाची कमतरता निर्माण होते. परिणामी प्रथिने नीट पचत नाहीत आणि गॅसेससारखा त्रास होतो.

डाळ शिजताना त्यात आले किसून घालावे. 
डाळीला देण्याच्या फोडणीतदेखील हळद, जिरे, मोहरी, हिंग याबरोबर दालचिनीचा तुकडा, काळे मिरे, कढीपत्ता, तेजपत्ता घालावा. 
डाळीवर लिंबू पिळावे, तसेच शक्यतो डाळीला काळे मीठ वापरावे.
डाळींना कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा भाज्यांची जोड दिल्यास ती पचायला तुलनेने हलकी होते.
डाळीचे गोड पदार्थ करताना त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ जरूर घालावी.
डाळींचे पदार्थ असलेले जेवण जेवल्यानंतर अननस किंवा पपईच्या दोन फोडी खाल्ल्या तरी पचन सोपे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com