साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्याची मागणी अमलात आणणे अवघड - नरेंद्र मुरकुंबी

साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्याची  मागणी अमलात आणणे अवघड - नरेंद्र मुरकुंबी

पुणे - देशात उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी ४० टक्के साखर घरगुती वापरासाठी आणि उर्वरीत ६० टक्के साखर औद्योगिक उत्पादनांसाठी वापरली जाते. पण या औद्योगिक वापरात शीतपेये किंवा डेअरी उत्पादनांच्या तुलनेत छोटे रेस्टॉरंट आणि मिठाई दुकाने यांचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर ठेवण्याची मागणी व्यावहारिकदृष्ट्या अमलात आणणे अवघड आहे, असे मत रेणुका शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मुरकुंबी यांनी व्यक्त केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित केलेल्या ‘ऊस मूल्य साखळी व्हिजन २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

आगामी काळात सेंद्रिय साखर, प्रमाणित साखर आणि फेअरट्रेड साखर या प्रकारच्या विशेषीकृत साखरेला खूप वाव राहणार असून त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, असे मुरकुंबी म्हणाले. ऊस उत्पादन आणि साखर निर्मितीच्या प्रक्रियेत रासायनिक खते व रसायनांचा वापर न करता तयार केलेली साखर म्हणजे सेंद्रिय साखर. तर साखर विक्रीतील लक्षणीय हिस्सा थेट ऊस उत्पादकाला मिळवून देणाऱ्या उद्योगातील साखर म्हणजे फेअर ट्रेड साखर. देशात २०२५ पर्यंत साखरेची गरज सध्याच्या २५० ते २६० लाख टनांवरून ३२५ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. साखर कारखान्यांची क्षमता ही समस्या नसली, तरी उपलब्ध शेतजमीन व पाण्याची सोय याबाबतीत अडचणी आहेत. त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र अपेक्षित प्रमाणात वाढेल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर उपाय म्हणजे उसाची उत्पादकता वाढवून मर्यादीत क्षेत्रात अधिक उत्पादन मिळवणे. त्यासाठी उसाच्या उत्पादकतेत १० टक्के वाढ मिळवावी लागेल, असे मुरकुंबी यांनी स्पष्ट केले. पुढील दशकभराच्या काळात संस्थात्मक घटकांकडून साखरेची मागणी वाढणार असल्यामुळे साखरेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मुरकुंबी म्हणाले.

ब्राझीलमध्ये यापुढील काळात उसाचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढण्यास मर्यादा आहेत, आशिया आणि आफ्रिकी खंडातील देशांमध्येच साखर उद्योगाची लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत, असे लंडन येथील इंटरनॅशनल शुगर जर्नलचे संपादक अरविंद चुडासमा यांनी सांगितले.

आशिया आणि आफ्रिकी देशातील साखर क्षेत्रातच अधिक आर्थिक गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. साखर उद्योगाचा विचार करताना ऊस उत्पादन आणि शेतकऱ्यांना ग्रहीत धरले जाते, त्यात बदल होण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

जागतिक पातळीवर साखरेचे दरडोई सेवन कमी होत असून सोशल मीडियाच्या वापरामुळे उत्पादकांपेक्षा ग्राहक अधिक प्रभावी झाले आहेत, असे स्वित्झर्लंड येथील बाजार विश्लेषक जोनाथन किंग्समन यांनी सांगितले. जागतिक साखर संशोधन संस्थेच्या महासंचालक डॉ. रॉबर्टा रे यांनी आरोग्य व पोषण या संदर्भात साखरेविषयी असलेल्या गैरसमजांविषयी माहिती दिली.

‘शुगरबीटची उत्पादकता वेगाने वाढतेय’
जगभरात उसाच्या तुलनेत शुगरबीटची उत्पादकता अधिक वेगाने वाढत असून फ्रान्स आणि जर्मनी हे देश त्यात आघाडीवर आहेत, असे नरेंद्र मुरकुंबी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com