बाजारभाव नसल्याने मेंढ्यांपुढे टाकला कांदा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

सरकारने शीतगृहे उभारली पाहिजेत


"शेतमालातून उत्पादन खर्च निघत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी सरकारने परदेशी बाजारपेठ मिळवण्याकरिता त्याला प्रोत्साहित करायला हवे. गरज भासल्यास अनुदान देऊन शेतातील नाशिवंत माल अधिक काळ टिकण्यासाठी सरकारने शीतगृहे उभारली पाहिजेत,''

- ऍड. जोगाजी तांबे, शेतकरी

कवडीमोलाने माल विकला जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला

रांजणगाव सांडस : उरळगाव (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने तो मेंढ्यांना खायला टाकला. कोणत्याच मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण त्यांचा माल विकला जातोय; पण तो कवडी मोलाने.

गेले वर्षभर कांद्यासह बहुतांश भाजीपाला शेतातून काढून बाजारपेठेत नेईपर्यंत मजुरीसह इतर खर्च भागत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. पिके घेण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. त्यातच मजुरीसह रासायनिक खतात मोठी वाढ झाली आहे. शिवाय पिकाला पोषक असे हवामान नसल्याने त्यावरती अनेक प्रकारचे रोग पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागते. या औषधाचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याला आपल्या शेतात विविध पिके घ्यावी लागत आहेत.

योग्य भाव न मिळाल्याने कांदा शेळ्या-मेंढ्यांपुढे टाकण्याबरोबरच त्याला शेतात खत म्हणून गाडणे अनेकांनी पसंत केले आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कांद्यासह सर्व भाजीपाल्याचे उत्पादन जास्त झाले. मंडईसह आठवडे बाजारतही शेतीमाल विकण्यासाठी जागा मिळत नाही एवढी आवक झाली आहे. शेतकऱ्याला व्यापाऱ्यासह ग्राहकाच्या मागे लागून मिळेल त्या किमतीला माल द्यावा लागत आहे. ही परिस्थिती गेली अनेक महिने चालली असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.

सरकारने शीतगृहे उभारली पाहिजेत
"शेतमालातून उत्पादन खर्च निघत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पुन्हा उभा राहण्यासाठी सरकारने परदेशी बाजारपेठ मिळवण्याकरिता त्याला प्रोत्साहित करायला हवे. गरज भासल्यास अनुदान देऊन शेतातील नाशिवंत माल अधिक काळ टिकण्यासाठी सरकारने शीतगृहे उभारली पाहिजेत,'' असे उरळगाव येथील शेतकरी ऍड. जोगाजी तांबे म्हणाले.

Web Title: down market onion thrown to feed sheep by farmers