टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार

टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार

सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. कसेबसे खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा. शेतकरी कायम अडचणीत असायचा. यावर उपाय शोधायचा तर तो पाणी व्यवस्थापनातूनच मिळणार होता. पडणारे पाणी जमिनीत मुरविणे, हा त्यातील मुख्य पर्याय होता. गावाच्या शिवारात जलसंधारणाची कामे केली तरच संपूर्ण गावाचा शाश्वत विकास होणार होता. तत्कालीन सरपंच सागरभाऊ साळुंखे व विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी ग्रामस्थांना याबाबतचे महत्त्व पटवून दिले. 

श्रमदानातून वनराई बंधारे 
गावाला पाणीदार बनविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांनाही पटले. गावास रामेश्वर व चांदण या दोन डोंगरांची देणगी आहे. राम व गावओढा हे दोन प्रमुख ओढे आहेत. पाऊस झाल्यावर या ओढ्यांवर पाणी अडविण्याची साधने नसल्यामुळे पाणी वाहून जात होते. सन २०१५ मध्ये ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारे उभारणी करण्याचे काम हाती घेतले. हाच निर्णय गाव पाणीदार होण्यास ‘टर्निंग पॅाइंट’ ठरला. सुरवातीस श्रमदानातून दोन बंधारे बांधले गेले. यादरम्यान पाऊस झाला. कामांचे महत्त्व लगेचच दिसून आले. दोन्ही बंधारे पाण्याने भरल्याने गावकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला. मग दोन्ही ओढ्यांवर श्रमदानातून १६ बंधारे बांधले  गेले. सुदैवाने निसर्गाची साथ मिळाल्याने  हे बंधारेही पाण्याने तुडुंब भरून वाहिले. 

 लोकसहभागातून विविध कामे
गवातील वानझरा, इजाळी, कोकाटे व आवारवाडी आदी ठिकाणच्या पाझर तलावांची पाणीसाठवण क्षमता चांगली होती. मात्र गाळ मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे अत्यल्प पाणीसाठी होत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या तलावांतील गाळ काढण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येत यांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिली. 

नियोजनबद्ध पद्धतीने कामे हाती घेतली. सहा पाझर तलावांतून सुमारे २८ हजार ६४० क्युबिक मीटर गाळ उपसण्यात आला. तो शेतकऱ्यांना पडीक जमिनींत वापरण्यासाठी मोफत देण्यात आला. या उपक्रमामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. तसेच पडीक जमीन वाहिवाटीखाली येण्यास मदत झाली.

ओढ्यांचे रुदी-खोलीकरण  
आमदार शशिकांत शिंदे यांच्या  विशेष प्रयत्नांतून तीन व पूर्वीचा एक असे एकूण चार सिमेंट बंधारे ओढ्यावर बांधले हाेते. त्यामध्ये गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. या ओढ्यातील गाळ काढणे, रुंदी खोलीकरण करणे गरजेचे होते. लोकसहभागातून  दोन्ही प्रमुख ओढ्यांतील सुमारे सव्वा दोन किलोमीटर लांबीचे खाेलीकरणाचे काम पूर्ण  केले झाले. गावातील लोकांची धडपड पाहून सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी देण्यात आला. त्यातून बंधाऱ्यातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढली. तनिष्का गटातील महिलांनीही गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. 

बंधाऱ्यांची दुरुस्ती 
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभागाने एक कोटी १४ लाख रुपये निधी खर्च करून नवे नऊ सिमेंट बंधारे बांधले. त्यासह जुन्या पाच सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढून चार बंधाऱ्यांची दुरुस्ती केली. लघुसिंचन विभागाकडून पाच सिमेंट बंधारे व वन विभागाकडून तीन माती नालाबांध बांधण्यात आले आहेत. या जलसंधारण कामांच्या जागी श्री संत गुंडोजीबाबा विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले.  

गावात २०१५ पर्यंत दुष्काळी परिस्थितीत जनावरे कशी जगावयाची, शेतकऱ्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायाचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र लोकसहभाग व जलयुक्तच्या कामांमुळे गाव पाणीदार झाले. ग्रामस्थ, लाेकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांसह कृषी विभाग, गावातील ज्य़ेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते, महिला आदींच्या सहकार्यामुळे विसापूर पाणीदार झाले आहे.
- सागरभाऊ साळुंखे, माजी सरपंच, विसापूर

दुष्काळग्रस्त गाव पाणीदार हाेण्यात ग्रामस्थांचे याेगदान माेठे आहे. 
गावाच्या शिवारात मुबलक पाणीसाठा झाल्याने ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. ठिबक सिंचनाचा वापरासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती केली जात आहे.
- राजेंद्र साळुंखे, माजी अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी साेसायटी, विसापूर

गावात सर्वांच्या पुढाकारातून पाण्यासाठी चळवळ सुरू झाली. पाण्याची उपलब्धता झाल्याने गावाच्या पीक पद्धतीत बदल होत आहे. 
 : शहाजी साळुंखे, सरपंच, विसापूर 
संपर्क- ९५७९०९२६९७, ७७०९८९८८३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com