पाऊस नसताच आला तं पुरला असता

संतोष मुंढे
Wednesday, 24 October 2018

खर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्‍विंटल, तुरी गेल्या वाळून. दिवाळीआधीच उन्हाळा झाला. आता एक लाखाचा माल तरी होऊन राहिला का. व्याजानं पैसे काढले आता भरबाकी कशी व्हायची. याच्यापेक्षा पऊसच नसता आला तं पुरला असता. लोकांचे पैसे व्याजानं काढले नसते ना. कुठून द्यायचे आता हे. कुटुंबात दोन मुलं, दोन मुली आम्ही दोघ. शेतीतच आम्ही सगळे. लोकाचे द्यायचे, घर पोसायचे कसं? यातून उरलचं काय आता, अशा शब्दात औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हणगाव येथील सरूबाई नागरे यांनी आपली कैफियत मांडली.  

खर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्‍विंटल, तुरी गेल्या वाळून. दिवाळीआधीच उन्हाळा झाला. आता एक लाखाचा माल तरी होऊन राहिला का. व्याजानं पैसे काढले आता भरबाकी कशी व्हायची. याच्यापेक्षा पऊसच नसता आला तं पुरला असता. लोकांचे पैसे व्याजानं काढले नसते ना. कुठून द्यायचे आता हे. कुटुंबात दोन मुलं, दोन मुली आम्ही दोघ. शेतीतच आम्ही सगळे. लोकाचे द्यायचे, घर पोसायचे कसं? यातून उरलचं काय आता, अशा शब्दात औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हणगाव येथील सरूबाई नागरे यांनी आपली कैफियत मांडली.  

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत भीषण दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. खरीप हातचा गेलाय. कपाशीचं उत्पादन दीड दोन क्‍विंटलच्या पुढं नाही. रब्बीची आशा नाही. साधारणपणे डिसेंबर जानेवारीपर्यंत चालणाऱ्या खरीप हंगामाची आक्‍टोबरमध्येच उलंगवाडी होण्याची स्थिती आहे. एक ना दोन वेचणीत कापूस संपल्यात जमा आहे. मका, बाजरीच्याही उत्पादनात मोठा फटका आहे. त्यामुळं आभाळंच कोसळल्यागत स्थिती झालेल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून शासन काय पावले उचलतं हा खरा प्रश्न आहे. 

पाण्याच्या प्रश्नामुळं बैलं विक्रीला 
यंदाच सालं लई बेक्‍कार....मागचेच बरं म्हणण्याची येळ आली. सहा एकर शेती. दोन गावड्या अन्‌ दोन बैलं पणं पाण्यावाचून बैल इक्रीला काढली. चारा बी नाय पणं आपणं स्वत:च खायचं भागीतो मंग जनावराचं कसबी भागविलं असतं. पणं पाण्याचा प्रश्न लई गंभीर. एकदा जनावरं इकली अन्‌ ती पुन्हा घ्यायची म्हणली तर डबलनं पैसे मोजूनबी ती मिळणार नाहीत, पण पाण्याच्या प्रश्नानं अडचणीत भर घातली. बाजरी होती, कापूस व्हता. चार एकरांत सात क्‍विंटल कापूस झाला. दोन एकरात नऊ किंटल बाजरी झाली. दिवसेंदिवस सालं बेकारचं पडू लागले. पैठण तालुक्‍यातील खादगावचे अर्जून कोहकडे यांनी रविवारी (ता. २१) पाचोड येथील जनावरांच्या बाजारात मांडलेली दैना औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळांची तीव्रता मांडण्यास पुरेशी आहे. 

बाजारात बैलाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्याला कुणी लेवाल नाही. ५० हजार ते ९० हजारांपर्यंत असणारे बैलजोडीचे दर २८ हजार ते ४८ हजारांवर आलेत. शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. मी ही शेतकरी आहे, पण काय करावं त्यांच्याकडे इलाज नाही. काही शेतकऱ्यांनी आपली जनावरं चारा पाण्याविणा मरू नये म्हणून फुकट ऊसतोड करणाऱ्यांना देण्याचा पर्याय निवडल्याचे पाचोडच्या बैल बाजाराचा गुत्ता सांभाळणारे जसबीर सिंग म्हणाले. 

व्यापारीही चिंतेत
दुष्काळानं पाचोडच्या भुसार आणि कापूस बाजारातील आवक प्रचंड मंदावली आहे. उत्पादनात बसलेला फटका पाहता दिवाळीनंतर बाजारात व्यापार करण्यासाठी येण्याची गरज पडेल की नाही याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे. जवळपास पाचशे ते सहाशे क्‍विंटलपर्यंत होणारी ज्वारीची आवक आता ५० ते १०० क्‍विंटलवर येऊन ठेपली आहे. व्यापारी अभय बडजात्या म्हणाले, पाउस पडेल अन्‌ फळबागवाले लिंबोळी पेंड मागतील या आशेने साठवून ठेवली, पणं तिला कुणी विचारेना. 

मोसंबीच्या मार्केटलाही झळ 
तीन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पाचोडच्या मोसंबी उपबाजारालाही झळ बसली आहे. आधी फळगळीमुळे मोसंबीची मोठ्या प्रमाणात तूट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनाही १० ते २० हजार रुपये टनाच्या दरम्यानच आपली मोसंबी विकावी लागली. आता दर बरे असले तरी मोसंबी मात्र कुणाकडे शिल्लक नाही. लांबणारा मोसंबीचा बाजार यंदा पावसाअभावी लवकरच गुंडाळला जाणार हे स्पष्ट असल्याची माहिती बाजाराशी संबंधितांनी दिली.

बाग वाळू लागली 
रांजनगाव दांडगा येथील सलीम युसुफ शहा म्हणाले, सहा-सात वर्षांपूर्वी मोसंबीची झाडं लावली होती. आजवर ती सांभाळली. आता उत्पादन मिळण्याची वेळ आली आणि पाणी संपलं. गेल्यावर्षीही पाऊस कमी झाला. यंदाही पाऊस झाला नाही. दोन महिन्‍यांपासून मोसंबीला पाणी नसल्यानं अडीचशे झाडं वाळून जात आहेत. काही तर पूर्णत: वाळून गेली. दीड एकरात क्‍विंटलभर कापूस झाला. कुणी पहायला आलं नाही. 

बैल बी कुणी घेईना
कानडगाव येथील शरद घुले यांनीही चाऱ्यापाई दोन बैल विक्रीला आणली होती. घुले म्हणाले, पाचोडच्या बाजारात रविवारी (ता. २१) दुसऱ्यांदा बैलं घेऊन आलो. दिवसभरापासून घेवालची वाट बघतोय पणं कुणी मागितलीच नाही. लासुऱ्याचे भागवत शिकारे म्हणाले, कमी दामाना बैल मागत असल्याने परत घेऊन जातोय. चारा पाणी नाही म्हणून बैल विक्रीला आणले होते. रहाटगावचे प्रल्हाद इरतकर म्हणाले, चारा पाण्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून गंभीर आहे. साठ हजारांची बैलजोडी तीस बत्तीस हजाराला मागताहेत, घेवालचं नाही त्यांना.

पाणीसाठ्यांनी गाठलाय तळ 
औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल सात प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. लाहूकी, गिरजा, वाकोद, अजिंठा अंधारी, टेंभापूरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव या मध्यम प्रकल्पाचा त्यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे ९३ लघू प्रकल्पांमध्ये केवळ२३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ६६ लघु प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीतही केवळ ३५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीस शिल्लक असून त्यामधील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. 

२८ मंडळात ५० टक्‍केही पाऊस नाही 
जिल्ह्यातील एकूण ६५ मंडळांपैकी २८ मंडळात वार्षिक सरासरीच्या ५० टक्‍केही पाऊस पडला नाही. या मंडळामध्ये पडलेल्या पावसाचा टक्‍का वार्षिक सरासरीच्या तुलनेत २८ ते ४९ टक्‍क्‍यांदरम्यान राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण आदी तालुक्‍यातील काही भागात खरिपाची दोन-तीन वेळा पेरणी करूनही पिकं टिकली नाही. 

पंधरवड्यापासून मिळेल तिथून टॅंकरनं जनावरांना व कुटुंबाला पाणी आणतोय. यंदा झाडाखाली पाऊस काळात वलं झालचं नाही. नांगराचं ढेकूळ इरगल नाही. आठ पिशव्यांत पाच क्‍विंटल कापूस झाला. आणखी दोन-तीन क्‍विंटल व्हईल. बाजरीचं सरमाड ९०० रुपये क्‍विंटलनं घेतलं. शासनाचं प्रशासनाचं आमच्याकडं कुणी अजून फिरकलं नाही. 
- गजानन दौंड, गारखेडा, सुलतानपूर 

वीस एकर शेती, दहा एकर कपाशी, ८०० मोसंबीची अन्‌ ६०० पपईची झाडं. पपई ऐन फळात असताना पाणी संपलं. आता मिळंल तिथून ईहिरीत आणून टाकून कसं बसं भागवणं सुरू आहे. 
- भाउसाहेब कोल्हे, खादगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

साडेपाच एकरांतला ऊस पाण्याअभावी जळून चाललायं. २५०० रुपये टनानं शेतकऱ्याच्या घरी पोच देतोयं. टनामागं दीड हजाराचं नुकसान व्हतयं पणं पाणी नसल्याने नोंदणी करूनही कारखान्याला देऊ शकत नाही. 
- पंढरीनाथ जावळे, दाभरूळ, जि. औरंगाबाद. 

महिनाभरापासून मोसंबीच्या बागेला टॅंकरने पाणी देतोय. आंबे बहार चांगला लगडलायं. एका टॅंकरला किमान दोन हजार खर्च येतो. मिळेल तिथून किमान तीन टॅंकर दिवसाला आणून बागेला पाणी देणं सुरू आहे. 
- सुनील पिवळ, मोसंबी उत्पादक, आडूळ, जि. औरंगाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Rain Water