पुणे विभागात २७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

तालुकानिहाय टँकरची संख्या : 
पुणे :
पुरंदर १२, आंबेगाव ५, बारामती ८, भोर २, जुन्नर ३, खेड २, दौंड २ 
सातारा : माण ४३, कोरेगाव १५, वाई ४, फलटण ६, खटाव १६, पाटण ३, जावळी ६, कराड ३, सातारा १, महाबळेश्वर १ 
सांगली : जत ७६, खानापूर १६, तासगाव १५, कवठेमहाकाळ १२, आटपाडी १८, शिराळा २

पुणे : पुणे विभागातील २९० गावे आणि १८०० वाड्यांना २७१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागातील सुमारे २३ तालुक्यांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. येत्या काही दिवसांत या तालुक्यांमधील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

पुणे विभागात सातारा, पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यापैकी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. उर्वरित कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत अजून पाण्याची स्थिती चांगली असून, पाणीटंचाई भेडसावत नसल्याचे चित्र आहे. सध्या विभागातील पाणीटंचाई भासत असलेल्या जिल्ह्यांत २७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय ३४, तर खासगी २३७ टँकरचा समावेश आहे. तसेच पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने विभागातील १८६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. 

सध्या विभागातील सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई भासत आहे. सांगली जिल्ह्यातील १४० गावे १००३ वाड्यांना १३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ९८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील १२३ गावे ५१७ वाड्यांना ९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील ६९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील २७ गावे २८० वाड्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणी उपलब्ध होण्यासाठी १९ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. 

Web Title: Drought situation in Pune District