बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगती

बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगती

मौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन ही त्यांची खासियत आहे. शेतीच्या बरोबरीने घरगुती स्तरावर एखादा प्रक्रिया व्यवसाय असावा या उद्देशाने सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला  पाटील यांनी बिस्किटेनिर्मिती उद्योग सुरू करायचे ठरविले. यासाठी त्यांना ॲग्रोवन दैनिकातील माहितीचा चांगला फायदा झाला. बिस्किटेनिर्मितीसाठी त्यांनी रितसर प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकार आणि स्वादाची बिस्किटांच्या निर्मितीला त्यांनी सुरवात केली. 

पाटील कुटुंबीय एकत्र आहे. सौ. जयश्री या बारावी शिकलेल्या. त्यांचे पती आप्पासाहेब हे प्रयोगशील शेतकरी. त्यांच्याकडे वर्षभर भाजीपाला पिकांचे नियोजन असते, त्यामुळे भाजीपाला लागवड ते तोडणीसाठी सौ. जयश्री यांना वेळ द्यावा लागतो. यामुळे बिस्कीट व्यवसायाबरोबरच शेतकामाकडेही प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. सौ. ऊर्मिला या पदवीधर आहेत. त्यांचे पती आनंदराव हे वकील आहेत. त्यांच्या वकिली लिखाणाचे काम उर्मिला करतात. बिस्किटे तयार करण्याव्यतिरिक्त दोघींच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे आहे. एकमेकींचा शेती आणि वकिली कामकाजाचा वेळ लक्षात घेऊनच बिस्किटे तयार करण्याचे नियोजन केले जाते. यामुळेच आज दोघींकडून बिस्किटे  व्यवसायात गोडवा टिकून आहे. 

एकत्रित कुटुंबातील जावाजावांचे नाते कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. ऊर्मिला यांचे पती आनंदराव हे कागल शहरात वकिली करतात. यामुळे त्यांचे कुटुंब कागलमध्ये स्थायिक झाले आहे. मौजे सांगाव ते कागल यामध्ये सात किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे ऊर्मिला या वकिली कामातील टायपिंग आणि लिखाणाची जबाबदारी पूर्ण करून बिस्किटेनिर्मितीसाठी आठवड्यातील चार दिवस दररोज गावी येतात. बिस्किटेनिर्मितीमध्ये त्यांना सासरे पांडूरंग व सासूबाई केराबाई मदत करतात. ‘श्री नृसिंह घरगुती बिस्कीट’ या ब्रॅंन्डने बिस्किटांची विक्री केली जाते. यासाठी त्यांनी परवानादेखील घेतला आहे. 

विविध चवींची बिस्किटे 
बिस्किटेनिर्मितीबाबत ऊर्मिलाताई म्हणाल्या, की आम्ही बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच गहू बिस्किटे, अमेरिकन कुकीज, कोकोनट, चॉकलेट सुझबेरी, नाईस नानकटाई, काजू, नाचणी पासूनही बिस्किटे तयार करतो. या शिवाय खास उपवासाची बिस्किटे तयार केली जातात. उपवासाच्या बिस्किटांमध्ये राजगिरा व साबुदाणा पिठाचा वापर केला जातो. या बिस्किटांना श्रावणात चांगली मागणी आहे. 

अमेरिकन कुकीज या बिस्किटांना बेकरी उत्पादकांकडून जादा मागणी आहे. ही बिस्किटे या परिसरात फारसे कोणी तयार करत नाही. इतर बिस्किटांच्या तुलनेत ही बिस्किटे तयार करण्यास जादा कच्चा माल तसेच वेळही लागतो. मात्र, या बिस्किटांची चव वेगळी आहे. लहान मुलांना ही बिस्किटे आवडत असल्याने यांना चांगली मागणी आहे. मौजे सांगाव बरोबरच कागल शहरातून गव्हाच्या बिस्किटांना सातत्याने मागणी असते. काही ग्राहक स्वत: गव्हाचे पीठ व कच्चा माल देऊन आमच्याकडून बिस्किटे तयार करुन घेतात. जर बाहेरुन कच्चा माल ग्राहकाने आणून दिला तर एका किलोस ७० रुपयाप्रमाणे मजुरी आकारून बिस्किटे तयार केली जातात. एका तासास दोन किलो बिस्किटे तयार होतात. जर ग्राहकांना विकतची बिस्किटे हवी असतील तर स्वत: जवळचा कच्चा माल आम्ही वापरतो. 

नफ्यातून वाढविला व्यवसाय 
बिस्कीटे तयार करण्यासाठी ओव्हन आणि मिक्‍सरचा वापर केला जातो. भविष्यात ब्रेड, टोस्ट, खारी तयार करण्याचे नियोजन आहे. गव्हाची बिस्किटे प्रतिकिलो १२० रुपये तर वेगवेगळ्या स्वादाच्या बिस्किटांची विक्री प्रतिकिलो १४० रुपये या दराने होते. उपवासाची बिस्किटे प्रतिकिलो २४० रुपये या दराने विकली जातात. सर्व खर्च वजा जाता तीस टक्क्‍यांपर्यंत या व्यवसायातून नफा राहातो, असे उर्मितालाई सांगतात.

अनोखे व्यवस्थापन -  बिस्किटेनिर्मिती व्यवसाय करताना सौ. जयश्री आणि सौ. ऊर्मिला यांनी चांगली पारदर्शकता ठेवली आहे. व्यवसाय सुरू करताना त्यांनी घरच्या सदस्यांच्या मदतीने बिस्किटेनिर्मिती यंत्रासाठी एक लाख रुपये कर्ज काढले. व्यवसाय सुरू केल्यानंतर जशी बिस्किटांची विक्री होईल आणि रक्कम हाती येईल तशी कच्या मालासाठी रक्कम बाजूला ठेवून होणारा नफा हा कर्जासाठी भरला. गेल्या दोन वर्षांत दोघींनी घेतलेले कर्ज फेडले आहे. घरच्या मंडळींनीही हा व्यवसाय करताना दोघींना स्वातंत्र्य दिले. या व्यवसायात कोणीही हस्तक्षेप करीत नाही, त्यातील रक्कमही घेत नाहीत. जयश्री यांचे पती आप्पासाहेब हे शेतकरी आहेत. त्यामुळे ते शेतकामासाठी बाहेर गेले की गावातील विविध बेकरींमध्ये बिस्किटेही पोच करतात, कच्चा माल खरेदी करून आणतात. बिस्किटे विक्रीनंतर रक्कम हाती आल्यानंतर आप्पासाहेब यांना तीनशे रुपये पेट्रोल खर्च दिला जातो. घरच्या सदस्यांवर पेट्रोल खर्चाचाही भारही पडू नये इतकी दक्षता दोघींनी घेतली आहे. 

घरच्या गव्हाची बिस्किटे
बिस्किटासाठी प्रामुख्याने गव्हाच्या पिठाची गरज असते. पाटील कुटुंबीय दरवर्षी अर्धा एकरात गव्हाची लागवड करतात.  उत्पादनापैकी काही गहू हा बिस्किटेनिर्मितीसाठी वापरला जातो. यामुळे बिस्किटांचा दर्जा चांगला राहातो. दर्जा आणि विविधतेमुळे ग्राहकांची बिस्किटांना चांगली मागणी आहे. त्यामुळे उत्पादनांची जाहिरात करण्याची वेळ आली नाही. ग्राहकांच्याकडूनच आपोआप बिस्किटांची जाहिरात होत असते. काही वेळा मागणी इतकी असते की, एका दिवसामध्ये तब्बल दहा ते पंधरा किलोपर्यंत गव्हाची बिस्किटे तयार केली जातात. ग्राहकांच्या सोयीनुसार पोच केली जातात. काही ग्राहक घरी येऊन बिस्किटे घेऊन जातात. गहू, मैदा, तूप, दूध, साखर, वेलची याचे अनोखे व विविध प्रकारानुसारचे मिश्रण करून टेस्टी बिस्किटे करण्यात त्यांचा हातखंडा झाला आहे. 

सौ. ऊर्मिला पाटील, ९६२३९३४८६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com