भूमिहीन खवले यांनी करार  शेतीतून उंचावले अर्थकारण

Economy raised from agriculture
Economy raised from agriculture

भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील वृत्तीने व इच्छाशक्तीने शेती केल्यास नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळवून कटुंबाचे अर्थकारण उंचावणे शक्य होते. अकोला येथील विजय व संजय या खवले बंधूंनी हिंमतीने तीन शेतकऱ्यांची शेती कराराने घेत ही बाब सिद्ध केली आहे. सध्या ७० एकरांपैकी ३० एकरांत डाळिंब, चार एकर आंबा व काही क्षेत्रावर पपईची लागवड करून त्यांनी शेतीचे व्यवस्थापन नेटके ठेवले आहे. 

मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील गेरू माटरगाव येथील विजय खवले यांचे भूमिहीन कुटुंब आहे. त्यामुळे त्यांचे आईवडील मजुरी करायचे. विजय यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रोजगारासाठी अकोला गाठले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी एका व्यावसायिक कुटुंबात व्यवस्थापक म्हणून काम केले. परंतु नोकरीत मर्यादा होत्या. शेती नसली तरी विजय यांना त्याची आवड होती. त्या आधारे त्यांनी शेतीचा अभ्यास सुरू केला. व्यावसायिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींची वा शेतकऱ्यांची जमीन करार पद्धतीने कसण्यास घेण्याचा पर्याय त्यांच्यापुढे होता. इच्छा असेल तर मार्ग निघतो या न्यायाने त्यांनी संधी शोधण्यास सुरवात केली. 

करारावर शेती 
विजय यांना बंधू संजय यांची साथ मिळाली. परिसरातील शेती करारावर मिळू लागली. सुरुवातीला काही क्षेत्रात भाजीपालावर्गीय पिकांचे व्यावसायिक उत्पादन घेतले. सोबतच वनशेती, फळबाग लागवडीचेही काम हाती घेतले. सीताफळ, आंबा आदी फळपिकांची लागवड केली. वनशेतीत प्रामुख्याने महुआ, अंजन, साग आदी वृक्षांचा समावेश होता. करार शेती म्हणजे समोर आव्हान होते. परंतु चिकाटी, सचोटी ठेवली. संबंधित शेतकऱ्यांचा विश्‍वास जिंकला. सध्या ७० एकरांपैकी ३० एकरांत डाळिंब, चार एकर आंबा व काही क्षेत्रावर पपईची लागवड आहे. 

डाळिंबाची शेती  
विदर्भात डाळिंबाचे क्षेत्र मध्यंतरी बऱ्याच अंशी वाढले होते. दरम्यानच्या काळात त्यातून अपेक्षित उत्पादन व उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांनी बागा काढल्या. अशा परिस्थितीत डाळिंबाची बाग उभी करण्याचे व ती यशस्वी करण्याचे प्रयत्न विजय यांनी केले. सन २०१४ मध्ये कुंभारी येथे एका व्यावसायिकाची माळरान असलेली शेती विकसित केली. सन २०१५ मध्ये भगवा डाळिंबाची दहा एकरात ३२०० रोपे लावली. उत्कृष्ट पद्धतीने बागेची निगा ठेवत जोपासना केली. झाडे सदृढ वाढविली. एकरी चार टनांच्या पुढे उत्पादन मिळाले. दुसरा बहर २०१८ मध्ये घेतला. यंदा तिसरा बहर घेतला. वेगवेगळ्या बहारांत उत्पन्न मिळावे यासाठी बागेचे बहारनिहाय सहा एकर व चार एकर असे दोन भाग केले. 

कंपनीमार्फत निर्यात 
यंदा सहा एकरांतील उच्च गुणवत्तेची फळे मध्यस्थ कंपनीमार्फत निर्यात केली. त्याला प्रतिकिलो ८६ रुपयांचा दर मिळाला. उर्वरित फळांना स्थानिक बाजारात प्रति किलो ४५ ते ७० रुपयांदरम्यान दर मिळाला. डाळिंब बागेचे बहुतांश व्यवस्थापन सेंद्रिय वा जैविक पद्धतीने केले जाते. त्यात प्रामुख्याने जीवामृताचा अधिक वापर होतो. परिसरातील शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करून शेतात जीवामृत तयार केले  जाते. 

आच्छादन व मधमाशीपालन 
उष्णतेपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेत पालापाचोळा, गवत यांचे आच्छादन करण्यात येते. बागेत परागीभवन क्रिया नैसर्गिक पद्धतीने होण्यासाठी मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवण्यात येतात. सोबतच हिमोलिया वनस्पतीची लागवड केली आहे. झाडांना येणाऱ्या फुलांकडे मधमाश्‍या मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. त्याचा फायदा डाळिंबासाठी होतो, असे विजय म्हणाले.    

काजू, सफरचंद प्रयोग  
विजय यांनी काजू, जांभूळ, फणस, सीताफळ, रामफळ, हनुमानफळ, पेरू, संत्रा, मोसंबी या विविध झाडांचीही लागवड केली आहे. काजूचे पीक आपल्या भागात कशा प्रकारे येईल याचा प्रयोग ते सध्या अजमावत आहेत. मात्र झाडे अतिशय चांगली वाढली असून त्यांना दोन वर्षांपासून काजू येण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय बागेत प्रायोगिक तत्त्वावर सफरचंदाच्या रोपांची २०१८ मध्ये लागवड केली आहे.

पक्षिनिरीक्षणाचा छंद जोपासला
विजय यांनी शेती व प्रपंच सांभाळून पक्षिनिरीक्षणाचा छंदही जोपासला आहे. सन २००१ पासून ते पक्षिमित्र म्हणून काम करतात. हरीण, करकोचा, घुबड आदी पक्ष्यांचा त्यनी अभ्यास केला असून, बाकी अन्य पक्ष्यांबाबतही त्यांना इत्यंभूत माहिती आहे. 

केशर आंब्याची बाग 
डाळिंबाव्यतिरिक्त विजय यांनी २०१६ मध्ये करार शेतीअंतर्गत केशर आंब्याची बाग चार एकरांत उभी केली आहे. सद्यस्थितीत सुमारे दोन हजार झाडांचे संगोपन होते आहे. या बागेतून सुमारे आठ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे अशी वर्तमानपत्राद्वारे जाहिरात करून थेट ग्राहक मिळवले. साधारण प्रति किलो शंभर रुपये दराने बॉक्समधून विक्री केली. काही आंब्यांची मॉलद्वारेही विक्री केली आहे. 

करार शेतीतून साधले अर्थकारण 
चरितार्थासाठी स्वमालकीच्या शेतीचा पर्याय नसलेले विजय उदरनिर्वाहासाठी अकोला येथे आले. सुमारे २५ वर्षे त्यांनी याच शहरात आपले आयुष्य व्यतीत केले आहे. डाळिंब, आंबा पिकांची निवड व्यावसायिक दृष्टिकोनातून केली. करार शेतीतून नोकरीपेक्षा अधिक मासिक उत्पन्न मिळत असल्याचे व त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यांसोबत ऋणानुबंध तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.   याच शेतीतील उत्पन्नातून दोन्ही मुलांना सीबीएसई अभ्यासक्रमातील शाळांचे शिक्षण देणे शक्य झाले आहे. एक मुलगा अकरावीत शिकत असून नीट परीक्षेची तयारी करतो आहे. दुसरा यंदा दहावीत शिकतो आहे.

विजय खवले, ९०११५७६६४१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com