अठरा कीडनाशकांवर बंदी

अठरा कीडनाशकांवर बंदी
  •  केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय; तीन वर्षांत अंमलबजावणी
  •  बुरशीनाशक, कीटकनाशक अाणि तणनाशकाचा समावेश
  •  मानव, पशुपक्षी, मधमाश्यांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य

पुणे (प्रतिनिधी) : मानव, जलचर सजीव, पक्षी व मधमाशी यांच्या आरोग्य सुरक्षिततेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील १८ कीडनाशकांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्याबरोबर काही तणनाशकांचाही यात समावेश असून, बंदीची अंमलबजावणी वेगवेगळ्या कीडनाशकांसाठी २ ते ३ वर्षांत करावयाची अाहे.

भारतात नोंदणीकृत असलेल्या निअोनिकोटिनॉईडस गटातील कीटकनाशकांच्या वापराविषयी आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने जुलै २०१३ मध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन केली. त्यानंतर हेच उद्दिष्ट कायम ठेवून पुढे अन्य देशांत बंदी असलेल्या किंवा मर्यादित वापरासाठी संमत झालेल्या (रिस्ट्रिक्टेड) मात्र भारतात त्यांच्या वापरासाठी नोंदणीकरण झालेल्या कीडनाशकांचा आढावा घेण्याचे कार्य समितीतील तज्ज्ञांनी केले. या संबंधीचा अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालय विभागाला सादर केला. केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीने (सीआयबीआरसी) देखील यासंदर्भातील आपला अहवाल विभागाकडे दिला. तज्ज्ञ समितीच्या शिफारसी व सीआयबीआरसीचा अहवाल यांचा एकत्रित विचार करून मानवी आरोग्य, प्राणी व पक्षी यांच्यासाठी धोकादायक असलेल्या १८ कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आला. अर्थात ही बंदी त्वरित लागू होणार नसून ती १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीपर्यंत लागू होणार आहे. त्यानुसार संबंधित कीडनाशकाची आयात, उत्पादन, फॉर्म्युलेशन, वाहतूक, विक्री व वापर या बाबींंना कायदेशीर मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, यातील काही कीडनाशकांवर यापूर्वीच मर्यादित स्वरूपाची बंदी घालण्यात आली होती. तर काही कीडनाशके कालबाह्य झाली होती. दरम्यान, नव्या अधिसूचनेनुसार एक जानेवारी २०१८ पासून ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीपर्यंत ही बंदी अमलात आणली जाणार आहे.

का आली बंदी?
बंदी घालण्यात आलेल्या व सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाच्या कीडनाशकांचा तपशील. बंदी लागू होण्याच्या कालावधीपर्यंत संबंधित उत्पादनाच्या लेबलवर खाली दिलेल्या जोखीमविषयक तपशिलातील माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
१) बेनोमील (बुरशीनाशक) : १ जानेवारी २०१८ पासून पूर्णपणे बंदी.
धोक्याची बाजू - पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध. या बुरशीनाशकामुळे मानवी गर्भालाही धोका पोचत असल्याने गर्भवती महिलेचा संपर्क या उत्पादनाशी येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
२) कार्बारील (व्यापक क्षमतेचे कीटकनाशक) : १ जानेवारी २०१८ पासून पूर्णपणे बंदी.
धोक्याची बाजू - पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध. मधमाश्यांसाठी सर्वात विषारी. त्यामुळे मधमाशा बागेत सक्रिय असताना किंवा पीक फुलोरा अवस्थेत त्याचा वापर करता येणार नाही.
३) फेन्थिआॅन (कीटकनाशक) : १ जानेवारी २०१८ पासून पूर्णपणे बंदी.
धोक्याची बाजू - पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध.
४) मिथिल पॅराथिआॅन (कीटकनाशक) : १ जानेवारी २०१८ पासून पूर्णपणे बंदी.
धोक्याची बाजू - पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध. पक्ष्यांसाठी विषारी. मधमाश्यांसाठी सर्वात विषारी. त्यामुळे मधमाशा बागेत सक्रिय असताना किंवा पीक फुलोरा अवस्थेत त्याचा वापर करता येणार नाही.
५) ट्रायडेमॉर्फ (बुरशीनाशक) : १ जानेवारी २०१८ पासून पूर्णपणे बंदी.
६) ट्रायफ्लुरॅलीन (तणनाशक) ः १ जानेवारी २०१८ पासून पूर्णपणे बंदी.
पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध.
७) अलाक्लोर (तणनाशक) : ३१ डिसेंबर २०२० पासून वापर करता येणार नाही. १ जानेवारी, २०१९ पासून आयात, निर्मिती वा फॉर्म्युलेशन करता येणार नाही. पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध.
८) डायक्लोरव्हॉस (कीटकनाशक) : ३१ डिसेंबर २०२० पासून वापरावर बंदी. १ जानेवारी २०१९ पासून आयात, निर्मिती वा फॉर्म्युलेशन करता येणार नाही.
पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध. पक्ष्यांसाठी विषारी. मधमाश्यांसाठी सर्वात विषारी. त्यामुळे मधमाशा बागेत सक्रिय असताना किंवा पीक फुलोरा अवस्थेत त्याचा वापर करता येणार नाही.
९) फोरेट (धुरीजन्य कीटकनाशक) : ३१ डिसेंबर २०२० पासून वापरावर बंदी. १ जानेवारी २०१९ पासून आयात, निर्मिती वा फॉर्म्युलेशन करता येणार नाही. पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध. पक्ष्यांसाठी विषारी. मधमाश्यांसाठी सर्वात विषारी. त्यामुळे मधमाशा बागेत सक्रिय असताना किंवा पीक फुलोरा अवस्थेत त्याचा वापर करता येणार नाही.
१०) ट्रायझोफॉस (कीटकनाशक) : ३१ डिसेंबर २०२० पासून वापरावर बंदी. १ जानेवारी २०१९ पासून आयात, निर्मिती वा फॉर्म्युलेशन करता येणार नाही. पाण्यात राहणाऱ्या (जलचर) सजीवांसाठी धोकादायक. त्यामुळे जलस्त्रोत, मत्स्यशेती आदी ठिकाणी त्याचा वापर करण्यास प्रतिबंध. पक्ष्यांसाठी विषारी. मधमाश्यांसाठी सर्वात विषारी. त्यामुळे मधमाशा बागेत सक्रिय असताना किंवा पीक फुलोरा अवस्थेत त्याचा वापर करता येणार नाही.
बाजारपेठेत सध्या वापरात नसलेल्या किंवा कालबाह्य झालेल्या किंवा मर्यादित वापर असलेल्या १८ पैकी उर्वरित रसायनांची नावे - डायझिनॉन, फेनारीमोल, लिन्युरॉन, मिथॉक्सी इथिल मर्क्युरी क्लोराईड, सोडियम सायनाईड, थायोमेटॉन, फॉस्फामिडॉन, ट्रायक्लोरफॉन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com