जमीन सुपीकता जपत  दर्जेदार संत्रा उत्पादनावर भर

जमीन सुपीकता जपत  दर्जेदार संत्रा उत्पादनावर भर

दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत तिवसा घाट (ता. वरुड, जि. अमरावती) येथील उध्दव फुटाणे यांनी परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर, ठिबक सिंचनाने पाणी नियोजन, विद्राव्य खतांचा वापर, एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर देत गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादन घेण्यावर फुटाणे यांनी भर दिला आहे.

तिवसा घाट (ता. वरुड, जि. अमरावती) येथील प्रयोगशील शेतकरी उध्दव फुटाणे यांची ४० एकर शेती आहे. यामध्ये ३० वर्ष, २० वर्ष, ११ वर्षे आणि दोन वर्षे वयाच्या संत्रा बागा आहेत. फुटाणे यांची पिंपळशेंडा शिवारात २४ एकर संत्रा बाग आहे. त्यांनी नागपूर संत्रा जातीची १८ बाय १८ फूट अंतरावर लागवड केलेली आहे. फळबाग सोडून बाकीच्या क्षेत्रावर हंगामी पिकांची लागवड असते.

संत्रा बागेच्या व्यवस्थापनाबाबत उध्दव फुटाणे म्हणाले, की मी फळबागेला पुरेशा प्रमाणात शेणखत देतो. शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करतो. पाच वर्षांपर्यंत फळबागेत हिरवळीच्या खतासाठी धैंचा, बोरूचे आंतरपीक घेतो. संपूर्ण फळबाग मी ठिबक सिंचनाखाली आणली आहे. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर करतो. रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मासारख्या जैविक निविष्ठांचा वापरतो. कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करतो. किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जातो. माझ्याकडे सहा कूपनलिका आणि पाच विहिरी आहेत. मी प्रामुख्याने आंबिया बहराचे नियोजन करतो. 

बागेचे व्यवस्थापन 
 संत्रा बागेच्या व्यवस्थापनाबाबत फुटाणे म्हणाले, की मी अंबिया बहर धरत असल्याने मागील हंगामातील फळांची दहा नोव्हेंबरपर्यंत तोडणी पूर्ण करतो. त्यानंतर १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत बाग ताणावर सोडतो. या काळात बागेत एकरी तीन ट्रॉली शेणखत आणि २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा जमिनीत मिसळून देतो. १० डिसेंबर ते २० डिसेंबरच्या काळात ताण सोडण्यासाठी दोन वेळा पाट पाणी दिले जाते. त्यामुळे दिलेले खत जमिनीत चांगले मुरते. पाणी दिल्यानंतर शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाते. 

साधारणपणे जानेवारीपासून फुलधारणा सुरू होते. १५ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान फळांचे सेटिंग सुरू होते. या दरम्यानच्या काळात कीड, रोग नियंत्रणाचे उपाय तसेच विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते. साधारणपणे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत फळ काढणीचा हंगाम असतो. दर्जेदार फळांच्या उत्पादनावर माझा भर आहे. 

गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला एकरी १२ टन फळांचे उत्पादन मिळते. मी थेट व्यापाऱ्यांना फळे विकतो. प्रतिटन सरासरी तीन हजार रुपये दर मला मिळाला आहे. चांगली फळ धारणा असताना मला सर्व खर्च वजा जाता एकरी दीड लाखाचा नफा मिळाला आहे. 

विक्रीसाठी हुंडीचा पर्याय 
विक्रीच्या नियोजनाबाबत फुटाणे म्हणाले, की मी व्यापाऱ्याबरोबरीने चर्चा करून बागेत एक हजार फळांचा दर निश्‍चीत करतो. बागेतील झाडांवर असलेल्या फळांवरुन हा अंदाज बांधला जातो. यालाच हुंडी पध्दतीने विक्री असे म्हटले जाते. यामुळे बागेतच फळांची विक्री होते. तोडणी, प्रतवारी आणि वाहतूक खर्च वाचतो.

हिरवळीच्या पिकांची लागवड - जमिनीची सुपीकता जपण्यासाठी फुटाणे फळबागेत पहिल्या पाच वर्षांपर्यंत हिरवळीच्या पिकांची लागवड करतात. दरवर्षी खरिपात बागेमध्ये धैंचा, बोरूची लागवड करण्यात येते. यंदाच्या वर्षीदेखील त्यांनी नवीन लागवड केलेल्या बागेत बोरूचे पीक घेतले आहे. हिरवळीच्या पिकामुळे जमिनीचा पोत सुधारतो, ओलावा टिकून राहातो. सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. यामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते असा फुटाणे यांचा अनुभव आहे. 

दर्जेदार रोपांची निर्मिती
संत्रा फळबागेच्या बरोबरीने फुटाणे यांनी संत्रा रोपवाटिकाही उभारली आहे. खुंटासाठी त्यांच्याकडे रंगपूर लाईमची ७०, जंबेरीची ४० आणि एलिमोची २० झाडे आहेत. याचे बियाणे रोपवाटिकेत पेरून खुंट रोपे तयार केली जातात. त्यावर नागपूरी संत्राचे डोळे भरले जातात. रोपवाटिकेत नागपुरी संत्र्याची १५० मातृ कलमे आहेत. सन १९७३ पासून फुटाणे यांच्याकडे रोपवाटिकेचा परवाना आहे. १९९२ पासून उध्दव नर्सरी असा ब्रॅण्ड त्यांनी नावारूपास आणला. सात वर्षांपूर्वी त्यांना नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डचे नामांकन मिळाले आहे. त्यांच्या रोपवाटिकेतून दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख रोपांची विक्री होते. ही रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टाच्याबरोबरीने राजस्थान, मध्य प्रदेश आणि तमीळनाडूतही जातात.  गादीवाफ्यावर रोपांची निर्मिती केली जाते. सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्यामुळे रोपे सक्षक्त होतात. फुटाणे यांच्या संत्रा बागेची नोंद राष्ट्रीय लिंबूबर्गीय संशोधन संस्थेने घेतली आहे. 

क्रेट निर्मिती उद्योग
फुटाणे यांचा मुलगा अनिकेत हा अभियंता आहे. संत्रा बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन त्याने क्रेटनिर्मितीचा व्यवसाय उभारला आहे.  संत्रा फळांची साठवणूक आणि वाहतुकीसाठी क्रेटला चांगली मागणी आहे. आठ महिने हा उद्योग चालतो. २४ तासात २५०० क्रेट उत्पादन अशी या उद्योगाची क्षमता आहे. शेतकऱ्यांच्याबरोबरीने व्यापाऱ्यांकडून क्रेटला चांगली मागणी आहे. 
  उद्धव फुटाणे, ९४२२८५७५७३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com