प्रत्येक शेतच व्हावे कृषी विद्यापीठ

प्रत्येक शेतच व्हावे कृषी विद्यापीठ

आमच्या सदनिकेच्या गॅलरीमध्ये विराजमान असणारी आराम खुर्ची ही माझी विश्रांतीची आणि चिंतनाची आवडती जागा. भल्या सकाळी याच खुर्चीत बसून घरी येणाऱ्या इंग्रजी आणि मराठी दैनिकांचे नियमित वाचन करणे हा माझा कित्येक वर्षांचा परिपाठ आहे. मी फक्त सकारात्मक वाचन करत असल्याने तास दीड तासात वृतपत्रे वाचून बाजूला होतात. वाचन चालू असताना सोबत एक पेन आणि डायरी हमखास असतेच, कारण तिच्यामध्ये वृतपत्रात येणाऱ्या सकारात्मक विचारांची नोंद मी करत असतो. प्रत्येक दिवसाची ही माझी डायरी माझ्यासाठी हरिपाठच असते. नोंद केलेल्या विचारांवर मनात मंथन सुरू असते. त्यातूनच लेखांची निर्मितीही होत असते.

२१ जून २०१८ चा दिवस माझ्यासाठी प्रेरणा दिन ठरला. आवडता ‘अॅग्रोवन’ हातात पडताच पान तीनवरील नाशिक येथील ‘अॅग्रोवन’च्या ‘जपाल माती तर पिकतील मोती’ या विषयावरील चर्चासत्र वाचण्यात आले. यामधील ‘‘शेताला मी कृषी विद्यापीठ मानले असून, निसर्गाला कुलगुरू मानले. शेतामधील जीवजंतू, पशुपक्षी, झाडे, वेली, पाणी, हवा हेच माझे प्राध्यापक आहेत,’’  हे सुभाष शर्मा यांचे विचार वाचले आणि त्या दिवसाची सुरवात छान होईल असे वाटत असतानाच दुधात साखर पडावी तसे झाले. सुभाष शर्मा हे निसर्गशेती अभ्यासक. माझी त्यांची ओळख नाही. मात्र, व्यक्तींच्या विचारामधून त्यांची ओळख आणि त्यांचे विशाल, प्रसन्न, आनंदी मन कळते. एवढे शुद्ध विचार आणि आचरणाच्या पद्धतीमधील मोहकता केवळ निसर्गावर प्रेम करणारा माणूसच करू शकतो. वाटले कुठेतरी ही व्यक्ती आपणास जरूर भेटावी. ओढीची आतुरता निर्माण व्हावी हेच विचारांचे खरे सामर्थ्य असते. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकोबांची गाथा’ यांचे पारायण करूनच माझा शेतकरी आषाढीला पंढरीस जातो. संतांचे हे विचारधनच त्याची खरी शिदोरी असते. या संतांना प्रत्यक्ष कुणी पाहिलेय?

ग्रामीण भागामधील माझ्या लहान गावात बालवाडी आणि शाळेत असताना मी माझ्या आई- वडिलांबरोबर आमच्या शेतात असेच कृषी विद्यापीठाचे शिक्षण घेत होतो. या उघड्यावरील निसर्ग शिक्षणासाठी बालवयात प्रतिदिनी पाच- सहा कि.मी. चालत जात असे. मातीची माझी खरी नाळ जोडली गेली ती अशी. आजही तो वावरामधील पहिल्या पावसाचा सुगंध आठवला की डोळे पाणावतात. माती जैवविविधतेने समृद्ध असेल तरच तिला सुगंध प्राप्त होतो, हे मला विद्यापीठामधील बंद वर्गात आणि प्रयोगशाळेत पाहावयास मिळाले. मात्र, हा आनंद घेण्यासाठी जेव्हा मी वावरात गेलो तेव्हा तेथे आणि परिसरात फक्त रासायनिक खते आणि कीटकनाशकांचाच दर्प येत होता. ज्याला मी माझे कृषी विद्यापीठ समजत होतो, ते कृषी विज्ञान न समजल्यामुळे वाळवंटीकरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसत होते.

शेतकऱ्याचे शेत हे स्वतःच्या मालकीचे मुक्त कृषी विद्यापीठ व्हावे; पण कसे? ते पारंपरिक पिकांनी आणि सेंद्रिय खताने समृद्ध असावे. या कृषी विद्यापीठामधील शेतकरी हा विद्यार्थ्याच्या रूपात कायम प्रयोगशील आणि आनंदी असावा. बांधावरील वृक्ष हे त्याचे सहयोगी प्राध्यापक असावेत. विश्रांतीच्या काळात या विद्यार्थ्यांनी कायम त्यांच्याशी संवाद साधावा. झाडावरील पक्षीरूपी साहाय्यक शिक्षकांना त्याने सांगावे, की प्रयोगामधील माझ्या प्रयत्नांना किडीचा अडथळा येत आहे, तो निर्मूलन करावा. अशा कृषी विद्यापीठात शिक्षक हा नेहमीच शेतकरीरूपी विद्यार्थ्याच्या मदतीस न सांगता धावून येत असतो. निसर्ग हा खरंच कुलगुरू आहे. विद्यार्थ्याच्या कृषी प्रयोगासाठी लागणारा पाऊस, भूगर्भातील पाणी, आवश्यक थंडी आणि सहज सहन होणारा उन्हाळा याची योजना करणे हे याचे काम. शेतजमिनीमधील कायम टिकणारा ओलावा हे या विद्यापीठाचे प्रकुलगुरू. निसर्ग कुलगुरूंनी केलेली सर्व मदत शेतकरी विद्यार्थ्यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी पोचविणे हे यांचे कार्य. या प्रकुलगुरूंच्या सहवासात नत्र, स्फुरद आणि पालाश या मूलद्रव्यांचे वरिष्ठ प्राध्यापक शेतकऱ्यांचे प्रयोग यशस्वी करत असतात. यांना सेंद्रिय जमिनीत कितीतरी साहाय्यक प्राध्यापकांचे विविध मूलद्रव्यांच्या रूपाने साहाय्य मिळत असते. या कृषी विद्यापीठात निसर्गरूपी कुलगुरूच प्रयोगाचे सर्व साहित्य शेतकऱ्यांना देतात. मात्र उद्देश एकच, ही शेताची प्रयोगवही स्वच्छ, निटनेटकी आणि सकारात्मक निष्कर्षाने भरलेली असावी आणि तिचे अनुकरण इतरांनी करावे. शेकडो वर्षांपासून अस्तिवात असलेली ही कृषी विद्यापीठे फक्त आनंदी आणि समाधानी विद्यार्थ्यांचीच निर्मिती करत होती. कितीतरी पिढ्या याच्या साक्षीदार आहेत. मीही त्यापैकीच एक चार दशकांपूर्वीचा कदाचित शेवटचाच साक्षीदार असावा.

निसर्गच कुलगुरू असलेली शेतामधील ही मुक्त कृषी विद्यापीठे आणि त्यामधील आनंदी विद्यार्थी आता शोधणे केवळ अशक्य आहे. शेतामधील कृषी विद्यापीठे सर्वत्र आढळतात. मात्र, ती मुक्त नसून उजाड आहेत. सेंद्रिय प्रयोगशाळा कुठेही दिसत नाही, दिसते ती रासायनिक प्रयोगशाळाच आणि तिच्यामध्ये बाहेरून आयात केलेली नत्र, स्फुरद आणि पालाशरूपी उच्च वरिष्ठ प्राध्यापक मंडळी. पूर्वी पारंपरिक पीकपद्धतीमध्ये खरीप, रब्बीमध्ये प्रयोगशील शेतकरी कमीत कमी दहा- पंधरा तरी प्रयोग या कृषी विद्यापीठात करत असत. आता या आयात रसायनशास्त्राच्या प्राध्यापकांच्या नियंत्रणाखाली जेमतेम दोन- तीन प्रयोग होतात. काही शेतकरी विद्यार्थी तोच तो प्रयोग अनेक वर्षं करत असतात. विद्यार्थीरूपी शेतकऱ्यांच्या प्रयोगवह्या कायम अपयशाच्या डागांनी भरलेल्या असतात. निसर्गरूपी कुलगुरूंना हे अनेक वेळा आवडत नाही, म्हणून उभ्या शेतामधील प्रयोग मध्येच मोडले जातात. कीटकरूपी बाह्य शक्ती प्रयोगात अडथळे आणतात. पूर्वीच्या मुक्त कृषी विद्यापीठात घरामधील आणि गावामधील वरिष्ठ अनुभवी माणसे समृद्ध ग्रंथालयासारखी कामं करत. दुर्दैवाने आजच्या या उजाड कृषी विद्यापीठांना ग्रंथालयेच नाहीत. म्हणून शेतकरी विद्यार्थी दुःखी आणि सैरभैर झाला आहे. बांधावरील सर्व वेली, झाडे तोडून, पक्ष्यांना दूरदेशी पाठवून आम्ही आमचे विद्यापीठ फक्त विद्यार्थ्यांचेच केले आहे. कुठेही आमचा आवडता प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा मदतनीस ठेवलेला नाही. मग कुलगुरू रागावले तर दोष कुणाचा?

खरंच प्रत्येक शेत हे पुन्हा मुक्त कृषी विद्यापीठ होईल का? याचे उत्तर ‘हो’ असेच आहे. प्रयत्न केला तर हे सहज शक्य आहे. भुतानसारख्या छोट्या राष्ट्राने केवळ तीन दशकांमध्ये अशी शेकडो कृषी विद्यापीठे प्रत्येक शेतामध्ये निर्माण करून तेथील शेतकऱ्यांना आनंदी, सुखी केले आहे. सिक्कीम हे राज्यसुद्धा पूर्णतः याच मार्गावर आहे. हे सर्व तेथील शासन आणि शेतकरी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले. आपणाससुद्धा हे शक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एक लहान का होईना; पण एक मुक्त सेंद्रिय कृषी विद्यापीठ सुरू करावे. दहा- बारा पारंपरिक पिकांच्या प्रयोगांची आखणी करावी. जमिनीखालील उच्च प्राध्यापक मंडळी तुमच्यासाठी विनावेतन काम करतील. बांधावरील वेली, झाडे, पक्षी प्रयोगशाळा मदतनीस म्हणून तुमच्याकडे धावत येतील आणि निसर्ग कुलगुरूंचा तुम्हास कायम आशीर्वाद राहील. अशा या मुक्त कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी होण्याचे भाग्य तुम्हास लाभो, ही शुभेच्छा!
 ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com