आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून साधला खर्चाचा मेळ

सुदर्शन सुतार
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

खर्चाचे असे केले नियोजन

  • यंदा मिळालेल्या उत्पन्नातील सुमारे चार ते पाच लाख रुपये पुढील हंगामातील पीक नियोजनासाठी राखीव ठेवले आहे.
  • मजुरांच्या पगारासाठी दीड लाख रुपये.
  • मुलाच्या शाळेसाठी दीड लाख रुपये.
  • घरखर्चासाठी दीड ते दोन लाख रुपये.
  • इतर खर्च व आजारपण वगैरे ५० हजार रुपये
  • अन्य पाच लाख ऐनवेळचा खर्च आणि अन्य कामांसाठी शिल्लक.

पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष कालावधी होता; पण त्या आधीच कलिंगड, हिरवी मिरची, झेंडू आणि कांदा यांसारख्या एकापाठोपाठ एक चार आंतरपिकांचे योग्य नियोजन करून शेतीतला खर्च साधण्याचा मेळ शेटफळ नागोबाचे (ता. करमाळा) येथील विजय लबडे या शेतकऱ्याने घातला. आंतरपिकातील अतिरिक्त उत्पन्नावर ते शेतीतल्या खर्चाचे नियोजन करतातच; पण आपत्तीच्या काळातही त्यानुसार पीकनिवड करून कमी खर्च आणि जादा उत्पन्न घेण्याचा प्रयत्न ते करतात, त्यामुळे बाजारपेठेचं गणित कधीही कोसळलं, तरी त्यांचं आर्थिक गणित मात्र कायम साधून जातं.

सोलापूर जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे येथील विजय लबडे हे प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकरी. जिल्ह्याची वरदायिनी भीमेच्या उजनी धरणाच्या बॅकवॅाटरपासून अवघ्या काही फूट अंतरावर लबडे यांची शेती आहे. 

सिंचनाची फारशी समस्या भासत नसल्याने या गावामध्ये ऊस शेती वाढली होती. ती काही प्रमाणात टिकून असली तरी उसाला मिळणारा दर आणि त्याच्या खर्चाचा विचार करता अलीकडे अनेक शेतकरी केळी पिकाकडे वळले. केळीची गुणवत्ता आणि एकरी उत्पादकताही चांगली आहे; पण केळीतही बाजारभावाची अस्थिरता लक्षात घेऊन अन्य पिकांचा विचार या भागात सुरू झाला. या सर्व चक्राप्रमाणेच लबडे यांनीही २०१७ मध्ये दोन एकरवर व्हीएनआर वाणाच्या पेरूची लागवड केली.

पेरूत कलिंगड, मिरची, झेंडू अन् कांदा
दोन एकरांवर त्यांनी आठ बाय आठ फूट अंतरावर मार्च २०१७ मध्ये पेरूची लागवड केली. शिफारशीप्रमाणे केलेल्या लागवडीमध्ये दोन ओळींमध्ये मोकळी जागा होती. शिवाय, पेरू प्रत्यक्ष उत्पादनाला येण्यास दीड वर्षाचा कालावधी होता. त्यात त्यांनी कलिंगड आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच हिरवी मिरचीही लावली. दोन रोपांच्या मधल्या अंतरावर कलिंगड आणि मिरची अशी आलटून पालटून त्यांनी लागवड केली. पुढे उन्हाळ्यात कलिंगड आणि मिरचीचे उत्पादन सुरू झाले. कलिंगडाचे २८ टन उत्पादन मिळाले. त्याला सरासरी ८ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. २४ हजार व्यवस्थापन खर्च वजा जाता २ लाख रुपये निव्वळ उत्पन्न कलिंगडातून मिळाले. मिरचीतून एक लाख रुपये मिळाले. 

- कलिंगड आणि मिरची संपल्यानंतर त्यांनी याच जागेवर जून महिन्यात झेंडूची लागवड केली. या फुलासाठी पुढे गणेशोत्सव- नवरात्रीचा हंगाम त्यांना मिळाला. त्यातूनही सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले. 

- त्यानंतर पेरूमध्ये उन्हाळी कांद्याची लागवड केली. कांद्यातून सुमारे दीड लाख रुपये मिळाले. एकीकडे पेरूची जोपासना सुरूच होती. दुसरीकडे या आंतरपिकातून पावणेसात लाख रुपये मिळवले. कमीत कमी क्षेत्र व खर्चात त्यांनी अवघ्या काही महिन्यांतच एवढे उत्पन्न मिळवले. 

पेरूच्या दोन बहरांत १५ लाख रुपये
पुढे २०१८ च्या जूनमध्ये त्यांनी पहिल्यांदाच पेरूचा बहर धरला. डिसेंबरमध्ये काढणी झाली, त्या वेळी पहिल्यांदाच त्यांना पेरूमध्ये तब्बल ३५ टन उत्पादन निघाले. त्या वेळी प्रतिकिलो ३५ ते ५० रुपयांचा दर मिळाला. एकूण उत्पन्नातील पाच लाख रु. व्यवस्थापन खर्च वजा करता १० लाख रु. निव्वळ नफा मिळाला. मात्र, पेरू लागवड ते प्रत्यक्ष उत्पादन या दरम्यानच्या काळामध्ये आंतरपिकांची लागवड केली होती, त्यामुळे पेरू व्यवस्थापनाचा खर्चही आंतरपिकातून वसूल करण्यात त्यांना यश आले. त्यानंतर यंदा पुन्हा जानेवारीत त्यांनी छाटणी करून बहर धरला. मात्र, कडक उन्हामुळे पेरूचे फळ सेटिंग फारसे झाले नाही. आधीच बऱ्यापैकी फूलगळ झाली, त्यामुळे उत्पादन घटून २५ टनांपर्यंत कमी झाले, दरही निम्म्यावर आला, तरीही पाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांनी मिळवले. साधारणपणे वर्षभरात त्यांना १५ लाखांचे उत्पन्न मिळाले. आता पुन्हा पेरूमध्ये आणखी दोन महिन्यांनी कलिंगड करण्याचा त्यांचा विचार आहे.

ऊस, केळीतील अनुभव 
लबडे हे मूळचे ऊस आणि केळी बागायतदार. उसाचे ते एकरी १०५ ते १२० टनांपर्यंत उत्पादन घेतात. आजही त्यांच्याकडे दोन एकर क्षेत्रावर ऊस आहे. तरीही गेल्या दोन वर्षांत ऊस दरातील घसरणीमुळे ऊस क्षेत्र मर्यादितच ठेवले आहे. शिवाय, २०१२ मध्ये त्यांनी केळी बागही लावली होती. गेल्या वर्षी खोडवा केळीचे उत्पादन त्यांनी घेतल्यानंतर केळीही मोडून टाकली. केळीचेही एकरी सरासरी २५ टन इतके उत्पादन घेतले आहे. ऊस, केळीतील घसरत्या दराचा अंदाज घेऊन ते पेरूकडे वळले आहेत. मात्र, या पिकातील त्यांचा अनुभव मोठा आहे. 

आपत्तीकाळात पीकबदल
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती आहे. लबडे यांना उजनी धरणाचे बॅकवॅाटर जवळ असल्याने पाण्याची तशी अडचण नाही. पण जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पाण्याचा वापर नियंत्रित पद्धतीने करतात. पिकाची निवडही बाजारपेठेतील गणित ओळखून करतात. यंदा पेरूशिवाय चार एकर क्षेत्रावर त्यांनी कांद्याची लागवड केली आहे. दुष्काळामुळे सगळीकडे पाण्याची कमतरता असल्याने कांदा पिकाऐवजी अन्य शेतकरी कमी कलावधीच्या भाजीपाला पिकांची निवड करतील, असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे कांदा पिकाची लागवड यंदा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आहे.  

लोकविकास फार्मफ्रेश ब्रँड 
प्रयोगशीलता, अभ्यासूपणासोबत बदलत्या काळानुसार शेतमालाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगवरही लबडे यांनी भर दिला आहे. पेरूची विक्री करताना बाजारपेठेमध्ये आपली वेगळी ओळख म्हणून ‘लोकविकास फार्मफ्रेश’ या नावाने ब्रँडिंग करत आहे. प्रत्येक फळाला फोम आणि प्लास्टिक कव्हरही घातले जाते. ही फळे नाव छापलेल्या बॅाक्समध्ये पॅकिंग करून पुणे, मुंबई बाजारात पाठवतात. उत्तम दर्जा आणि नियमितपणामुळे या ब्रँडच्या पेरूला चांगली ओळख मिळाली आहे. परिणामी पेरूला प्रतिकिलो ५० रुपये इतका दर मिळवण्यात त्यांना यश आले.  

- विजय लबडे, ७५८८६१०१०५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expenditure Inter crop Management Vijay labade