शेतकरी होतोय स्मार्ट कृषी उद्योजक

मनोज कापडे
शनिवार, 22 एप्रिल 2017

कंपन्या घेताहेत पुढाकार, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरणाकडे वाढतोय कल

कंपन्या घेताहेत पुढाकार, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरणाकडे वाढतोय कल
पुणे - केवळ शेतमाल पिकवण्याच्या पारंपरिक भूमिकेतून शेतकरी वर्गाला बाहेर काढून देश-विदेशातील बाजारपेठांच्या गरजांनुसार त्याला स्मार्ट कृषी व्यावसायिक बनविण्याची प्रक्रिया कृषी उद्योगांकडून गतिमान होत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकरीवर्गातून "कृषी उद्योजक' मोठ्या प्रमाणात पुढे येतील, अशी स्थिती आहे.

"शेतात काय पिकते ते पिकवण्यापेक्षा बाजारात काय विकते तेच पिकवा,' असा कानमंत्र कृषी उद्योगांकडून शेतकऱ्यांना मिळतो आहे. निर्यातक्षम शेतमालाचा यशस्वी उत्पादक, असा दर्जा शेतकऱ्याला मिळवून देण्यात निर्यातदार कंपन्यांची वाटा मोठा आहे. सुरक्षित अन्न हा जगभर कळीचा मुद्दा बनला आहे. ग्राहकांना त्याचा पुरवठा होण्यासाठी कायदेशीर तरतुदी जास्त कडक करण्याकडे युरोपसह जगातील इतर देशांचाही कल आहे. अन्न सुरक्षित नसल्यास आयातीवर बंदीचा पर्याय युरोपीय देशच नव्हे; तर भारतदेखील वापरत आहे.

कीडनाशकांवर बंदीचे प्रकारदेखील वाढले आहेत. त्यामुळे रासायनिक खते, कीडनाशके आणि बियाणे उद्योगातील कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन आणि विक्री व्यवस्था हा मोठा घटक आता शेतीत उदयाला येत आहे. बारा हजार कोटी रुपयांची उलाढाल करणारा देशातील बियाणे उद्योग आता स्वतःहून कॉर्पोरेट फार्मिंगसाठी सरसावला आहे. त्यातून शेतकऱ्याला लागवड, काढणी ते विक्री अशा तीन स्तरांवर तांत्रिक मार्गदर्शन करत आहे.

सूक्ष्म सिंचनाची आघाडी
पाण्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे शेतकऱ्याला कमी पाण्यात जादा उत्पादनाचे शेतीतंत्र देण्यात सर्वाधिक पुढाकार सूक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपन्यांनी घेतला आहे. कोरडवाहू भागात फळबागा, तसेच निर्यातक्षम उत्पादनाला चालना देण्याची कामगिरी याच कंपन्यांची आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, शेतीत होत असलेला खर्च कमी झाल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही. त्याचाच भाग म्हणजे खत, बियाणे, कीडनाशकांवरचा खर्च कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. विशेष म्हणजे, खत उद्योगातील कंपन्याच असा पुढाकार घेत आहेत. जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता तपासून खतांचा वापर करण्यासाठी खत उद्योगाकडून जागृती केली जातेय.

कंपन्यांकडून प्रशिक्षण
कीडनाशक अवशेषमुक्त शेतमालासाठी जगभरातून मागणी वाढत असल्यामुळे कीडनाशक उत्पादनातील कंपन्या शेतकऱ्यांना शेतात जाऊन प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे रेसिड्यु फ्री प्रोड्युस, पीएचआय (पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल), मॉलिक्‍युल असे शब्द सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडातून सहज बाहेर पडताहेत. दुसऱ्या बाजूला रासायनिक कीडनाशकांपेक्षा जैविक कीडनाशकांचा वापर वाढवणारी चळवळदेखील काही कंपन्यांनी रुजवली आहे. जैविक कीडनाशकांच्या वापराने शेतमालाला जादा भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी अभ्यास करून निर्यातक्षम उत्पादने घेत आहेत.

यांत्रिक शेतीसाठी प्रयत्न
शेतकऱ्याला यांत्रिक शेतीकडे वळविण्यासाठी ट्रॅक्‍टर आणि अवजार उत्पादनातील कंपन्यांनी घेतलेली आघाडी शेतकऱ्याचे कष्ट, वेळ यांची बचत करून जादा उत्पादन देत आहेत. याशिवाय भाडेतत्वावर शेती अवजारे देण्याच्या व्यवसायात किंवा ट्रॅक्‍टरचलित व्यवसायात शेतकरीच मोठ्या संख्येने पुढे येत असल्यामुळे अवजार उत्पादक कंपन्या दुसऱ्या बाजूने स्वयंरोजगाराचादेखील पर्याय पुढे आणत आहेत. अन्नप्रक्रिया धोरणातील कंपन्यांकडून तर शेतकऱ्याला सर्व प्रकारे प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यापासून निर्यातक्षम रेडी टू ईट फूड उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग याच कंपन्यांमुळे वाढला आहे. रिटेल उद्योगामुळे शेतकऱ्यांना करार तत्त्वावर शेतमालाचे उत्पादन घेत हमीभावाने माल विकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

कृषी स्टार्टअपला वाव
देशातील कृषी क्षेत्राची एकूण वाढती बाजारपेठ आणि त्यात शेतकऱ्याला स्मार्ट करण्यासाठीचे प्रयत्न बघता कृषी क्षेत्रात स्टार्टअपला चांगला वाव राहील. सध्या स्टार्टअप चळवळीतील कंपन्यांची संख्या कमी असली; तरी 37 हजार कोटींची कृषी बाजारपेठ भविष्यात कृषीउद्योगावर आधारित कंपन्या व स्मार्ट शेतकऱ्यांची संख्यादेखील वाढवत राहील, असे अभ्यासकांना वाटते.

Web Title: famer becoming to smart agriculture businessman