विजेचा बसेना मेळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

विकास जाधव
मंगळवार, 9 मे 2017

-भारनियमनातील बदलाने ग्रामीण भागाची उडाली झोप
-गलथान कारभाराने मागणी आणि पुरवठ्यात तफावत
-पिकांना पाणी देण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडणार

सातारा : राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाऱ्या विजेच्या वेळेत नुकताच बदल करण्यात आला आहे. सप्ताहातील गुरुवार ते शनिवारी रात्री साडेदहा वाजता देण्यात येणारी वीज मध्यरात्री दोन वाजता देण्यात येऊ लागली आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना सप्ताहातील तीन दिवस शेतातच मुक्काम करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे त्रासदायक ठरणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी साप, विंचवासह हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यासही सामोरे जावे लागणार आहे.

राज्यात सोमवार ते गुरुवार दिवसा व शुक्रवार ते रविवार रात्री थ्री फ्रेज वीज दिली जाते. उद्योगाच्या तुलनेत कृषिपंपांसाठी फार कमी वीज दिली जाते. दिवसाकाठी अवघ्या आठ तास उपलब्ध होणाऱ्या विजेत शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडून भारनियमनाच्या वेळेत नुकताच बदल करण्यात आला आहे. सोमवार ते गुरुवारी सकाळी आठ वाजता येणारी वीज आता १० वाजता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे नियोजन दहा वाजता सुरू करावे लागणार आहे. हा बदल शेतकऱ्यांना सहन करण्यासारखा आहे; मात्र शुक्रवार ते रविवार यामध्ये करण्यात आलेला बदल हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे. उदाहरणार्थ शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत बारामती झोनमध्ये रात्री साडेदहा ते साडेआठ वीज दिली जाते. यामध्ये जाचक बदल करण्यात आला आहे.

विजेच्या वेळेत बदल करा
शुक्रवार ते रविवार यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास रात्रभर वीज गायब होणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे चक्र पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्यरात्री देण्यात येणाऱ्या विजेच्या वेळेत बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून केली जात आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्याऐवजी पहाटे सहापासून दुपारी एकपर्यंत वीज उपलब्घ करावी.

वीज कपातीचा फटका
शुक्रवार ते रविवारी रात्री १० तास वीज दिली जात होती. भारनियमनाच्या वेळेत नुकताच बदल करण्यात आला आहे. शुक्रवार ते रविवार यादरम्यान देण्यात येणाऱ्या विजेत कपात करण्यात आली आहे. दहा तास दिली जाणारी वीज आता आठ तासांवर आणण्यात आली आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडणार आहे. सहकारी व संघटित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना अडचणीत येणार आहेत. सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

जबाबदार कोण?
गेल्या दोन-तीन दिवसांपासून महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. सद्यःस्थितीत राज्यातून विजेची मागणी २२,५०० मेगावॉटपर्यंत पोचली आहे; मात्र राज्यभरातील काही वीजनिर्मिती संच बंद असून, काही संच देखभाल-दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे; परंतु अचानक उद्भवलेल्या या संकटाला सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.


सरकार आणि वीज वितरण कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकऱ्यांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होणार नाही. या भारनियमनाच्या वेळांमध्ये बदला केला पाहिजे.
-सचिन पवार, काशीळ, जि. सातारा.


जाचक बदलांनी शेतकरी त्रस्त
साडेदहा वाजता येणारी वीज आता मध्यरात्री दोन वाजता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात मुक्कामाची वेळ आली आहे. उन्हाची त्रीवता वाढत असल्याने पिके सुकू नयेत, यासाठी मोठ्या प्रयत्नाने उपलब्ध होईल तेथून पाणी आणून शेतकरी पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भारनियमनाच्या वेळेत जाचक बदल करून वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे साप, विंचू तसेच अनेक हिस्त्र प्राणी गारव्याच्या शोधात शिवारात बाहेर पडत आहे. त्यापासून शेतकऱ्यांना दंश होण्याचा धोका वाढाला आहे.

असे आहेत बदल
झोन---सोम ते गुरुवार---शुक्र ते रविवार
कोल्हापूर---८.४५ ते १६.४५---००.४५ ते ०८.४५
बारामत---१० ते १८---२ ते १०
नाशिक---१०.४५ ते १८.४५---२ ते १०
औरंगाबाद---९.३० ते १७.३०---१.३० ते ९.३०
पुण---८.४५ ते १६.४५---००.४५ ते ०८.४५
लातूर---९.४५ ते १७.४५---१.४५ ते ९.४५
जळगाव---९ ते १७---१ ते ९
नांदेड---९.३० ते १७.३०---१.३० ते ९.३०
अमरावत---१० ते १८---१.४५ ते ९.४५
अकोल---९.१५ ते १७.१५---१.१५ ते ९.१५
नागपूर---९.१५ ते १७.१५---१.४५ ते ९.४५
चंद्रपूर---१०.१५ ते १८.१५---१.४५ ते ९.४५
गोंदिया---९.४५ ते १७.४५---१.४५ ते ९.४५

Web Title: farmer and electricity