जामदराचे शेतकरी करणार सामूहिक शेती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सामूहिक शेती करणे आता काळाची गरज झाली आहे. सामूहिक पद्धतीने मशागत करणे, पेरणी, खते, बी-बियाणे व कामे केल्याने विविध अडचणींवर मात करता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. याला गावातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या हंगामात सामूहिक पद्धतीने शेती करण्याबाबत होकार दिला.

वाशीम : पीक परिस्थिती चांगली राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाटी मानोरा तालुक्यातील जामदरा गावातील शेतकऱ्यांनी या हंगामात सामूहिक शेती करण्याचा निश्चय केला आहे. बुधवारी (ता. ३) माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, डाॅ. नीलेश हेडा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

सामूहिक शेती करणे आता काळाची गरज झाली आहे. सामूहिक पद्धतीने मशागत करणे, पेरणी, खते, बी-बियाणे व कामे केल्याने विविध अडचणींवर मात करता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. याला गावातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या हंगामात सामूहिक पद्धतीने शेती करण्याबाबत होकार दिला. काही वर्षांपासून जामदरा गाव दुष्काळी आहे. गावात कमी पावसामुळे पीक आले नाहीत. तर वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे गावकरी पिके अर्ध्यावर सोडून देतात. हे दरवर्षी घडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत. तीनशे ते चारशे लोकसंख्या असलेल्या या गावाची शेती ही कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरीप पिकांवर अवलंबून असते. पिके आली तर शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन चालते. मागील वर्षी गावकऱ्यांनी खरीप हंगामावर सामूहिक बहिष्कार घालण्याचे जाहीर केले होते. 

नैसर्गिक परिस्थिती, वन्यप्राण्यांपुढे हतबल 
शेतकरी मेहनत करायला तयार आहेत. मात्र नैसर्गिक परिस्थिती व वन्यप्राण्यांपुढे हतबल झाले आहेत. पाऊस कमी होत असल्याने शेतकरी खरिपात केवळ सोयाबीन तूर ही पिके घेत असतात. तुरीचे पीक काढणीला येण्यापूर्वीच प्राण्यांचा त्रास सुरू होतो. अनेक शेतकरी भीतीपोटी पिके सोडून देतात. हे थांबले पाहिजे, अशी अपेक्षा गावातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

मार्गदर्शनासाठी सल्लागार समिती स्थापन 
या वर्षीच्या खरिपात शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करण्याचे निश्चित केले. पारंपरिक शेतीला फाटा देत गावातील सुमारे २५ शेतकऱ्यांनी १०० एकरांवर सामूहिक शेती करण्याचा संकल्प केला. यामध्ये शेतकरी पेरणीपासून, ते पीक काढणीपर्यंत सामूहिकरीत्या शेतीचे नियोजन करणार आहेत. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून, या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार सावंत, उपाध्यक्षपदी वाशीम जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर, सचिव म्हणून डॉ. नीलेश हेडा काम करणार आहेत.

Web Title: Farmers in Jamdara, Vidarbha to start Group Farming in Maharashtra