शेतकरी करतील आता वीज, इंधनाची निर्मिती 

मनोज कापडे 
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

 महागडी वीज आणि तीदेखील बेभरवशाची असल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शेतातच इंधन तयार करण्याची संधी देणारे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत.

शेणासह भाताचे तूस, सोयाबीन कूट, उसाचा भुस्सा यांचा होणार वापर 

पुणे : महागडी वीज आणि तीदेखील बेभरवशाची असल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शेतातच इंधन तयार करण्याची संधी देणारे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शेतजमिनीकडे केवळ पिकांचे उत्पादन देणारी जागा म्हणून न बघता इंधन तसेच वीजनिर्मितीचा कारखाना म्हणून भविष्यात पाहावे लागणार आहे. 

शेतकऱ्यांना बायोगॅसच्या माध्यमातून इंधनाची निर्मिती करण्याचे प्रभावी साधन उपलब्ध आहे. रोजचे केवळ 50 किलो शेण उपलब्ध असल्यास दोन घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्याने उभारल्यास महिन्याकाठी दोन एलपीजी सिलिंडर इतके इंधन मिळते. जनावरांचा गोठा आणि शेण यांची उपलब्धता असेल, तरच बायोगॅस मिळवता येतो, असा समजदेखील नव्या तंत्राने खोडून काढला आहे. कारण भाताचे तूस, सोयबीन कूट, साखर कारखान्यातील उसाचा भुस्सा यांपासूनदेखील बायोसीएनजी मिळतो. पुण्यातील एका कंपनीने भुश्‍श्‍यापासून बायोसीएनजी तयार करण्यास सुरवातदेखील केली आहे. 

युरोपात बायोगॅसच्या माध्यमातून शेतकरी वाहने चालवितात; तसेच शीतगृहे, सिंचन व्यवस्थाही चालवितात. येत्या दहा वर्षांत राज्यातील अनेक गावांमध्ये बायोगॅसनिर्मित सीएनजी पंप सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. शेतात मिळणारा भाताचा पेंढा, गव्हाचे तूस, कापूस तुराट्या, केळी खुंट, गवत, पालापाचोळा यांच्यापासून बायोसीएनजी मिळत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना इंधन किंवा वीजनिर्मितीच्या सामग्रीची शेती करता येईल, असा विश्वास ऊर्जाविषयक अभ्यासकांना वाटतो. 

शेतात छोट्या स्वरूपाच्या बायोगॅस प्रकल्पामधून यशस्वी वीजनिर्मितीला शेतकऱ्यांनी सुरवातदेखील केली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूर भागातील मोटके बंधूंचा उल्लेख केला जातो. मोटके बंधूंनी 300 गायींच्या गोठ्यातील दोन टन शेणापासून रोज दीडशे युनिटची वीजनिर्मिती करण्यात यश मिळविले आहे. या विजेपासून ते कृषिपंप, कडबाकुट्टी यंत्र चालवीत आहेत. राज्यभरातून दरमहिन्याला 300-400 शेतकरी या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. 

शेतीमधील शिल्लक बायोमासचे करायचे काय, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. या बायोमासपासून ब्रिकेट तयार केल्यास त्यापासून इंधनाचा पर्याय उपलब्ध होतो. कोल्हापूर भागात भालचंद्र वाघचौरे यांनी बायोमास ब्रिकेटिंगचा कारखाना सुरू केला आहे. या ब्रिकेट्‌स दहा रुपये किलोने विकल्या जातात. बायोमासपासून एका तासाला अडीचशे किलोची वाफ तयार करणारा छोटा बॉयलरदेखील आता तयार झाला आहे. फाउंड्रीसाठी बायोमासवर चालणारे फर्नेस, बेकरीसाठी तयार करण्यात आलेल्या थर्मिक फ्ल्युईड हीटर तंत्रावरील ओव्हन या सर्व तंत्रातून आता वीजनिर्मितीचे पर्यायी मार्ग तयार होत आहेत. 

छोटे बायोसीएनजी प्रकल्प राहतील उभे 
राज्यातील बाजार समित्या, हॉटेल्स, ग्रामीण भागातील सेंद्रिय ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून बायोगॅसनिर्मित सीएनजीमुळे शेतकऱ्यांचे ट्रॅक्‍टरदेखील बायोगॅसवर चालण्याची शक्‍यता आहे. राज्यात पुढे पाच टन क्षमतेचे छोटे बायोसीएनजी प्रकल्प उभे राहतील. त्यासाठी अडीच हजार रुपये टनाने शेतकऱ्यांकडून सेंद्रिय टाकाऊ पदार्थ विकत घेतले जातील आणि त्यापासून तयार होणारा बायोसीएनजी 50 रुपये प्रति किलोने विकला जाईल, असे गणितदेखील मांडले जात आहे. 

 

 
 

Web Title: farmers made electricity and petroleum production