पुणे विभागात उन्हाळी कांदा लागवड सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे : पुणे विभागात उन्हाळी कांदा लागवडीस सुरवात झाली आहे. खरीप, लेट खरीप कांद्याची आतापर्यंत एक लाख ६ हजार ८८० हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे : पुणे विभागात उन्हाळी कांदा लागवडीस सुरवात झाली आहे. खरीप, लेट खरीप कांद्याची आतापर्यंत एक लाख ६ हजार ८८० हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कांदा लागवडीला पोषक वातावरण असल्याने वर्षभरात तीन वेळा लागवडी केल्या जातात. यामध्ये खरीप कांद्याची जून ते जुलैमध्ये लागवड केली जाते. लेट खरिपची (रांगडा कांदा) सप्टेबर ते आॅक्टोबरमध्ये, तर डिसेंबर ते जानेवारीमध्ये उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. त्यासाठी शेतकरी एक ते दीड महिना अगोदर रोपे तयार करतात. कांद्याची लागवड केल्यानंतर साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनंतर शेतकरी काढणी करतात. सध्या खरीप कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली अाहे. लेट खरीप कांद्याची फेब्रुवारीपासून काढणी सुरू होईल. 

खरीप, लेट खरीप कांद्याची विभागातील नगर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड झाली आहे. नगर जिल्ह्यात कांद्याची एकूण ६६ हजार ६६० हेक्टरवर लागवड झाली आहे. यात राहाता, पारनेर, कर्जत, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यांत सर्वाधिक लागवड झाली आहे. पुणे जिल्ह्यात २५ हजार ६४० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या उत्तरेकडील खेड, जुन्नर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पूर्वेकडील तालुक्यात अल्प लागवडी झाल्या आहेत. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा ही तालुके खरिपात भातासाठी प्रसिद्ध अाहेत. भाताची आॅक्टोबर ते डिसेबर या कालावधीत काढणी केली जाते. त्यानंतर शेत रिकामे ठेवण्यापेक्षा रब्बी हंगामात नवीन एखादे पीक असावे म्हणून शेतकरी कांदा लागवडीकडे वळू लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच अवघ्या १४ हजार ५८० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक लागवड झाली आहे. उर्वरित तालुक्यांत अल्प लागवडी झाल्या अाहेत. 

जिल्हानिहाय खरीप, लेट खरीप कांदा लागवड : (हेक्टरमध्ये) 
जिल्हा -- लागवड 
नगर --- ६६,६६० 
पुणे --- २५,६४० 
सोलापूर -- १४,५८०

Web Title: Farmers in Pune district seeding onions