शेततळे योजनेतील कामांना गती

प्रतिनिधी
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले.

जळगाव  - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर ४२ कामे प्रगतिपथावर आहेत.

शेततळे योजनेसंबंधी दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमधून अधिकची मागणी आली होती. या भागात कामे गतीने करण्यावर प्रशासनाने भर दिला. 

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाल्याचे झाली आहेत. या अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात आलेल्या २०६ कामांमध्ये ४ हजार ९७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ७९ कामे पूर्ण झालेली आहेत. १३ कामे प्रगतिपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत ५३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आगामी काळात जी कामे २०१७-१८ या वर्षात मंजूर झाली, परंतु अपूर्ण राहिली, यासंदर्भात आढावा घेऊन संबंधित कामे पूर्ण करण्यावर प्रशासन भर देणार आहे. सध्या निवडणुकांचा माहोल असून, प्रशासन या कामात व्यस्त आहे. परंतु मे महिन्यामध्ये या कामांबाबत कटाक्ष ठेवून कार्यवाही केली जाणार आहे.

ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचीही दुरुस्ती 
मुडी (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील ब्रिटिशकालीन फड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ३३ लाख रुपये निधी काही दिवसांपूर्वी मंजूर झाला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्ती होईल. पाणीप्रश्‍नावर मात करण्यास मदत होणार आहे. मुडी येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धुळे पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हा बंधारा दुरुस्तीसाठी ३३ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कालवा खोलीकरण व विस्तारित कामाचा जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून सुरवातही झाली. गेल्या १८ ते २० वर्षांपासून या बंधाऱ्याचा डाव्या तीरावरील भाग वाहून गेला आहे. मुडी, मांडळ, लोण, एकतास, एकलहरे, शहापूर या परिसरातील सुमारे २५० हेक्‍टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यास हा बंधारा लाभदायी आहे. यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farming pond work progress in jalgaon