`एफसीअाय’च्या शासकीय ज्वारीला कीड

गाेपाल हागे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

अकाेट, चाेहाेट्टा येथील गाेदामात गेल्या हंगामात खरेदी केलेली शासनाची १३ ते १४ हजार क्विंटल ज्वारी ठेवलेली अाहे. या ज्वारीच्या पाेत्यांमध्ये कीड लागली असून, ही कीड बाजारात येणाऱ्या चांगल्या धान्यासाठी बाधक ठरत असल्याची बाब तहसील प्रशासनाच्या निदर्शनास अाणून दिली अाहे. गाेदामात ठेवलेल्या धान्य साठवणुकीचे भाडे मिळावे, अशी मागणीसुद्धा बाजार समितीने केलेली नाही.
- राजकुमार माळवे, बाजार समिती सचिव 

अकाेला - गेल्या हंगामात किमान अाधारभूत किमत खरेदी याेजनेतून खरेदी केलेल्या हजाराे क्विंटल ज्वारीला कीड लागली असून, यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या बाजार समितीने या प्रकाराकडे जिल्हा यंत्रणेला लक्ष घेण्यासाठी विनवणी केली, त्यांच्यावरच हे प्रकरण उलटविण्याचा प्रयत्न चालला अाहे. भाडे दिले नसल्याने गाेदाम खाली करण्यासाठीच हे केल्याचा अहवाल देऊन तालुका यंत्रणा माेकळी झाली अाहे. 

अाधारभूत किमतीत गेल्या वर्षी अकाेट तालुक्यात केंद्र शासनाची नाेडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळा(एफसीअाय)ने  सुमारे १६ हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारीची खरेदी केली हाेती. खरेदी केलेली ही ज्वारी सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाेदामांमध्ये साठवून ठेवण्यात अालेली अाहे. अकाेट येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये असलेल्या गाेदामात साडेसहा हजार क्विंटल ज्वारी ठेवलेली अाहे. या गाेदामातील ज्वारीच्या पाेत्यांवर सर्वत्र जाळे चढले असून, किडीचे साम्राज्य पसरलेले अाहे. ही कीड ज्वारीची नासाडी करीत असून, त्या परिसरात दुर्गंधीसुद्धा निर्माण झाली अाहे. शिवाय या गाेदामातील कीड अाता बाजार समितीत येणाऱ्या धान्यावरपर्यंत पाेचत असल्याने त्याचा त्रास हाेत अाहे. अकाेट बाजार समितीच्या चाेहाेट्टा बाजार उपबाजारातील गाेदामातही ज्वारीला कीड लागल्याचे समाेर अाले. त्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांनी पाहणी करून मान्यही केले; मात्र नुकसानकारक नसल्याचा शेरा मारून अधिकारी माेकळे झाले अाहेत. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या धान्याची शासनाकडून अशाप्रकारची नासाडी व हेळसांड हाेत असल्याचा संतापजनक प्रकार सुरू अाहे. 

ज्वारीचे जागीच ‘पीठ’?
अकाेट बाजार समितीच्या अकाेट व चाेहाेट्टा बाजार येथील गाेदामांत १० हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारी अाहे. ही ज्वारी सरासरी १५०० रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात अालेली अाहे. या ज्वारीचे तेव्हाचे बाजारमूल्य १५ काेटींवर जाते. एक वर्ष उलटूनही या ज्वारीचा कुठलाही उपयाेग घेण्यात अालेला नाही. शिवाय या प्रकाराकडे त्वरित लक्ष न दिल्यास ज्वारीचे जाग्यावर ‘पीठ’ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती अाहे.

भाडे दिले नाही म्हणून...!

ज्वारी सडली नसून, किरकाेळ प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला अाहे. शिवाय ही कीड नियंत्रणात अाहे, असे अकाेट तहसीलदारांतर्फे चाेहाेट्टा बाजार येथील गाेदामाची पाहणी केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात म्हटले अाहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाेदामात साठवणूक केली अाहे, त्या गाेदामाचे भाडे देण्यात अाले नाही. धान्य सडणे व प्रादुर्भाव हाेण्याचे कारण सांगून भाडे मिळवणे व गाेदाम खाली करणे, असा त्यांचा उद्देश असावा, असा शेराही या अहवालात देण्यात अाला अाहे; मात्र अकाेट येथे ठेवलेल्या गाेदामातील ज्वारीवर किडीने हल्ला केला असून, प्रशासनाने अद्याप एकही उपाययाेजना या ठिकाणी केली नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे बुधवारी(ता. ९) प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून अाले.

Web Title: fci government sorghum pest