...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं  

Feelings of flood affected farmers in Pandharpur
Feelings of flood affected farmers in Pandharpur

पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर  - आधीच दोन वर्षांच्या दुष्काळानं हाल केलं, त्यातून कसंबसं चालू व्हतं. नदीकाठच्या शिवारात केळीची यंदा नव्यानंच बाग लावली व्हती, झाडाला रोज एक नवीन पान फुटत व्हतं. एवढं झाडाला जपत व्हतो, रोज उमलणाऱ्या पानाकडं बघून वाटायचं, आवंदा हाताला काय तरी लागंल; पण कसंचं काय, आमचं स्वप्नच पुराच्या पाण्यानं पार खरडून नेलं, अशी व्यथा अगदी हतबलतेनं पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील देविदास नाईकनवरे हे शेतकरी मांडत होते.  

उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, पिरोची कुरोली, आवे, तरटगाव, खेडभोसे, देवडे, शिराढोण आदी नदीकाठच्या जवळपास ३३ गावांना पुराचा फटका बसला. नदीकाठच्या शेतशिवारात पाणी घुसलेच, पण पटवर्धन कुरोली, खेडभोसे गावातील घरापर्यंत हे पाणी पोचले. त्यामुळे शेतीसह गावांनाही त्याची झळ सोसावी लागली. पुराची ही स्थिती वेळीच नियंत्रणात आणल्याने गावातील नुकसान फारसे नसले, तरी नदीकाठच्या ऊस, केळी, डाळिंब बागा मात्र पुरत्या खरडून गेल्या आहेत. आधीच दुष्काळाने नदीही पार तळाला गेली होती. पण अशी काही परिस्थिती उद्भवेल, असं कोणाच्या मनातच नव्हे, तर स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं. पण ते घडलं. पुराच्या पाण्याचा आर्थिक फटका सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांपैकीच पटवर्धन कुरोलीतील देविदास नाईकनवरे एक. 

नाईकनवरे यांची १६ एकर शेती आहे. त्यात ८ एकर ऊस आहे. तर ८ एकर केळी, त्यापैकी नदीकाठच्या शिवारात यंदा मे महिन्यात नव्यानेच पावणेतीन एकर केळीची लागवड केली आहे. याठिकाणी पावणेचार हजार रोपांची लागवड केली आहे. रोपांसाठी ८० हजाराचा खर्च झाला आहे. त्याशिवाय लागवडीपूर्वी २५ ट्रॉल्या नुसते शेणखत टाकले आहे. शिवाय रासायनिक खते, फवारण्या असा तीन लाखाचा खर्च झाला आहे. आज अडीच ते पावणेतीन महिनेच लागवडीला झालेत. पण हा सगळा खर्च पाण्यात गेला आहे. नाईकनवरे म्हणतात, ‘‘यंदा हाताला काही तरी लागंल असं वाटत व्हतं. त्यासाठी नदीकाठच्या शिवारात दुसरी केळी लावली, गेल्या पाच-दहा वर्षापासनं केळी बाहेर (निर्यात) पाठवतोय, यंदाही पाठवणार व्हतो. जवळपास ८-१० लाखाचा हिशेब व्हता. पण कशाचं काय, पहिलेलं स्वप्न सगळं वाया गेलं.’’ 

पांडुरंग नाईकनवरे यांची पिराचीकुरोली रस्त्यावर बंधाऱ्यालगत शेती आहे. याठिकाणी त्यांचा आठ एकर ऊस आहे. तो पूर्णपणे पाण्याखाली गेला. आता पाणी ओसरत आहे, पण त्याची वाढ काही होणार नाही. शिवाय वजनही कमी होणार आहे. नदी जवळच्या शिवारातील ऊस पूर्ण पाण्यात असल्याने तो खराबच झाला आहे. याबाबत पांडुरंग नाईकनवरे म्हणाले, ‘‘दहा वर्षापूर्वी असाच प्रसंग आमच्यावर आला होता. यंदा तो पुन्हा आला. माझा एकरी पन्नास हजार खर्च झाला आहे. आठ एकराचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. सरकार मदत किती देणार आणि आम्हाला किती मिळणार, याबाबत शंकाच आहे. आमच्या अपेक्षा तर आहेतच. पण बघू आता काय, निसर्गापुढे कोणाचे चालते.’’ पटवर्धन कुरोलीतील हरिदास पाटील यांचे सोयाबीन, सुभाष नाईकनवरे यांचा भुईमूग अशा अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.  

डाळिंब उतरणार व्हतो, तोवर....
पिराची कुरोलीतील दिलीप भोई यांना फक्त दीड एकर शेती आहे. त्यात पाऊण एकर डाळिंब आणि पाऊण एकर केळी आहे. दरवर्षी ते निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतात, शेतातल्या वस्तीवर आई-वडील, भाऊ असं सगळं कुटुंब राहतं. त्यादिवशी वस्तीवरच्या घरातही पाणी शिरू लागल्याने ते सगळं गबाळ घेऊन दुसऱ्याच्या वस्तीवर राहायला गेले. पण जाताना शेतातल्या बागेत भराभर शिरत असलेल्या पाण्याकडे बघत, त्यांचा जीव मात्र तुटत होता. मनात पेरलेलं स्वप्न डोळ्यादेखत खरडून जात असल्याचे पाहून त्यांना गलबलल्यासारखं झालं. असायलाच दीड एकराचा तुकडा, त्यातच कशीबशी उलाढाल करतोय, तर ही परिस्थिती आलीय बगा, असं सांगत त्यांचा कंठ दाठून आला, दिलीप भोई सांगत होते, पाच-सहा वर्षे झाली डाळिंबात राबतोय बघा, दर काही मिळत नव्हता. यंदा दुष्काळातही बाग कशीबशी जपली, यंदा तर दर चांगला मिळंल, अशी लई आशा व्हती. पंधरा दिवसात बाग उतरणारच व्हतो. पण पुराच्या पाण्यानं बघेबघेपर्यंत पुरती बाग खरडून गेली. चार दिवस पुराचं पाणी बागेत व्हतं, आज झाडावरच्या फळांचा सडा बागेत पडलाय. दहा दिसापूर्वी बागेवर लालभडक डाळिंब बघून हायसं वाटायचं. आज मातुर आम्हाला त्याच्याकडे बघून रडू येतंय, असं म्हणत ते पुन्हा हुंदका देतात.

कुरोलीच्या शिवारात ५०० हेक्टरला फटका
पटवर्धन कुरोलीच्या शिवारात जवळपास प्राथमिक माहितीनुसार ५०० हेक्टरवरील पिकांना पुराचा फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक ४०० हेक्टरपर्यंत सर्वाधिक उसाचा समावेश आहे. त्याशिवाय केळी, डाळिंब, कांदा, चारा पिके आदी अन्य पिकांचा समावेश आहे. ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट असे पाच दिवस या भागात पुराची परिस्थिती होती. पशुधनाला वेळीच सुरक्षित स्थळी हलवल्याने नुकसान झाले नाही. पण शेतीचे आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर नेमका आकडा किती हे समोर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com