फळबागेचे स्वप्न झाले साकार...

विकास जाधव
सोमवार, 20 मार्च 2017

करंजखोप (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे अभय आचरेकर यांनी शेतीच्या आवडीतून शाश्वत उत्पन्नासाठी चार एकर क्षेत्रावर आंबा, डाळिंब, केळी, पपई या फळपिकांची लागवड केली आहे. यंदाच्या हंगामापासून फळांचे उत्पादन सुरू झाल्याने शेतीचे स्वप्न साकार होत आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा दुष्काळी पट्ट्यात मोडतो. या भागातील करंजखोप हे सुमारे २५०० लोकसंख्या असलेले गाव. या गावामध्ये गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची कामे झाल्याने काही प्रमाणात विहिरीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे काही शेतकरी बागायती पिकांकडे वळत आहेत. याच गाव शिवारातील डोंगरालगत पुणे येथील संगणक अभियंता अभय दशरथ आचरेकर यांनी २०१२ मध्ये दीड एकर शेती खरेदी केली.  शेती नियोजनाबाबत अभय आचरेकर म्हणाले, की माझे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा. हे गाव पुण्यापासून ५०० किलोमीटर अंतरावर असल्याने मला तेथे शेती करणे किंवा देखरेख करणे शक्य नव्हते.  त्यामुळे मी २०१२ मध्ये सातारा जिल्ह्यातील करंजखोप गावाजवळील डोंगरालगत दीड एकर शेती खरेदी केली. टप्प्याटप्प्याने आणखी चार एकर शेती खरेदी केली. सध्या माझी सात एकर शेती चार ठिकाणी विभागलेली आहे. जमीन हलक्या स्वरूपाची आहे. शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने २०१३ मध्ये विहीर खणली. शेताजवळील डोंगरालगत बंधारा असल्याने विहिरीच्या पाणीपातळीतही वाढ झाली. सध्या विहिरीला पाण्याची पातळी बरी असल्याने पिकांना संरक्षित पाणी देणे शक्य होते. 

शेती नियोजनाला सुरवात 
अभय आचरेकर यांनी विहिरीच्या माध्यमातून संरक्षित पाण्याची सोय झाल्यानंतर पीक लागवडीच्यादृष्टीने नियोजन सुरू केले. सुरवातीच्या काळात पीकलागवड आणि व्यवस्थापनाची फारशी माहिती नसल्याने  या भागातील पिकांचा अभ्यास सुरू केला. परिसरातील शेतकरी, कृषितज्ज्ञ, इंटरनेटवरून माहिती गोळा करण्यास सुरवात केली. अॅग्रोवनमधील यशोगाथा व पीक व्यवस्थापन लेखांचे संकलन सुरू केले. पुण्यातील नोकरीमुळे शेती नियोजनासाठी शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त वेळ देता येणार नसल्याने कंरजखोप येथील राजेंद्र शिंदे यांना बरोबर घेत पीक लागवडीस सुरवात केली. पहिल्या टप्प्यात बटाटा, कांदा, वाटाणा, घेवडा या पिकांची लागवड करण्यास सुरवात केली. परंतु तिमाही पिकांना आवश्यक तेवढा वेळ देता येणे शक्य नसल्याने वार्षिक पीकलागवडीचे नियोजन सुरू केले.  सुरवातीच्या काळात मजूरटंचाई, पीकनियोजनातील त्रुटींमुळे काही वेळा तोटाही सहन करावा लागला. मात्र न खचता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. शेतीतील कामे वेळेत होण्यासाठी दोन कुटुंब कायमस्वरूपी ठेवली आहेत. त्यांना रहाण्यासाठी खोल्या बांधून दिल्या आहेत. स्वयंपाकासाठी इंधनाची सोय म्हणून आता बायोगॅसही केला आहे.   

फळबागेचे नियोजन 
अभय आचरेकर यांनी २०१३ मध्ये पावणेदोन एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्याचा निर्णय घेतला. डाळिंबाच्या भगव्या जातीच्या रोपांची प्रयोग म्हणून सघन पद्धतीने ७ बाय ५ फूट अंतरावर लागवड केली. २०१३ मध्ये दीड एकर क्षेत्रावर आंब्याच्या केसर जातीची १० बाय पाच फूट अंतराने सघन पद्धतीने लागवड केली. नोव्हेंबर २०१६ मध्ये एक एकर केळीची  लागवड केली. जूनध्ये एक एकरावर आल्याची लागवड केली. सध्या पीक काढणीस आले आहे. दर कमी असल्याने काढणी केलेली नाही.  पीकव्यवस्थापन आणि उत्पादनाबाबत आचरेकर म्हणाले, की गतवर्षीपासून डाळिंब फळांचे उत्पादन सुरू झाले. मात्र अवकाळी पावसामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. फळांची गुणवत्ता बिघडली. पुण्यामधील व्यापाऱ्यास तीन टन फळांची विक्री केली. यातून  एक लाख रुपये मिळाले होते. यंदा बागेचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. यंदाच्या वर्षीपासून आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरवात होईल. केळी व पपई रोपांची चांगलीच वाढ झाली आहे. काही क्षेत्रावर हंगामानुसार  गहू, कांदा, वाटाणा तसेच हिरवी मिरचीचेही उत्पादन घेतले.  सध्या केळी आणि पपईमध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले आहे. टप्प्याटप्प्याने शेतीतील उत्पादनातून वाढ मिळण्यास सुरवात होत आहे. तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने बागेतील छाटणी, खत व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातात.  प्रत्येक शनिवारी व रविवारी मी शेतीवर न चुकता येतो. माझ्याबरोबर पत्नी सौ. अश्विनी तसेच मेहुणे अजित हडकर शेती नियोजनासाठी वेळ देतात. इतर दिवशी शेतीची सर्व जबाबदारी राजेंद्र शिंदे बघतात. सध्या शेतीतील धान्य व भाजीपाला पुण्याला घेऊन येतो. स्वतःच्या शेतीतील भाजीपाला, धान्याची चव वेगळीच असते. सेवानिवृत्त झाल्यावर पूर्ण वेळ शेती करण्याचे नियोजन आहे. यासाठी शेतात घर बांधण्याचा आराखडा तयार केलेला आहे. तसेच हायड्रोपोनिक तंत्राचा  शेतीमध्ये वापर करण्याचा विचार आहे. संरक्षित पाणी पुरवठ्यासाठी शेततळ्याचे नियोजन केले आहे. 

ठिबक सिंचन आणि आच्छादनाचा वापर
दुष्काळी भाग असल्याने पाण्याचे प्रमाण कमी आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर तसेच सर्व पिकांना पाणी मिळावे, या दृष्टीने अभय अाचरेकर यांनी सात एकर शेतीला ठिबक सिंचन केले. डाळिंब आणि आंबा कलमांना झिकझॅक पद्धतीने डिफ्युजर बसविलेले आहेत. यामध्ये ठिबकद्वारे पाणी सोडले जाते. यातून झाडांना आवश्यक तेवढे पाणी मिळते. झाडांच्या मुळाशी ओलावा टिकून रहातो. तिमाही पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. सध्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर केला जातो. मात्र भविष्यात जास्तीत जास्त सेंद्रिय खतांच्या वापरावर त्यांचा भर आहे.  

खिलार गाईंचे संगोपन
देशी गाईचे महत्त्व ओळखून अभय अाचरेकर यांनी पाच खिलार गाईच्या संगोपनासाठी ४० बाय १५ फुटांचा गोठा बांधला. गाईंना चारा उपलब्ध होण्यासाठी लसूण घास, मक्याची लागवड केली होती. सध्या चाऱ्यासाठी ऊसवाढे, ज्वारी कडब्याचा वापर केला जातो. शेतीत सुरवातीला रासायनिक खतांचा मोठा खर्च होत होता. हा खर्च कमी करण्यासाठी गांडूळ खताचे युनिट सुरू केले. गाईचे शेण, मूत्र, शेतीतील पालापाचोळ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले आहे. याचा वापर फळबागेसाठी केला जातो. 

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
 सात एकराला ठिबक सिंचन, गांडूळखत, विद्राव्य खतांचा जास्तीत जास्त वापर.
 व्यावसायिक पद्धतीने शेती नियोजनाचा प्रयत्न.
 बागेतील फवारणी करण्यासाठी एचटीपी पंपाचा वापर. 
 ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत. 
 वादळापासून नुकसान होऊ नये यासाठी बागेतील
सर्व झाडांना बांबूचा आधार.

Web Title: Fruit gardern dream come true