तयारी 'आले' लागवडीची 

डॉ. जितेंद्र कदम 
सोमवार, 17 एप्रिल 2017

राज्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दरम्यान आले लागवडीची सुरवात होते. आल्याच्या उगवणीसाठी ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असून, आल्याची लागवड मे महिन्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. त्यानंतर अधिक उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. 

राज्यामध्ये अक्षय तृतीयेच्या दरम्यान आले लागवडीची सुरवात होते. आल्याच्या उगवणीसाठी ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असून, आल्याची लागवड मे महिन्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. त्यानंतर अधिक उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. 

जमीन :
- आले हे कंदवर्गीय पीक असल्याने जमीन भुसभुसीत असणे गरजेचे आहे, त्यासाठी उत्तम निचरा होणारी, मध्यम प्रतीची कसदार जमीन निवडावी. या पिकाचे कंद जमिनीमध्ये एक फूट खोलीपर्यंत वाढतात, त्यामुळे कमीत कमी एक फूट खोली असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.० च्या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये शक्यतो आल्याची लागवड करू नये. कारण पिकावर पिवळसर छटा राहते. 
- आल्याच्या लागवडीसाठी जमीन निवडत असताना कंदवर्गीय पिके घेतलेली जमीन (उदा. हळद, बटाटा, रताळे इ.) निवडू नये, त्यामुळे कंदकूजचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. 
- शक्यतो द्विदलवर्गीय पिकांचा बेवड या पिकासाठी उत्तम समजला जातो. 

बियाणे व जाती :
- बीजोत्पादनासाठी आले पीक घेतलेल्या शेतामधूनच बियाणे निवडावे. उत्पादनावाढीस फायदा होतो. 
- महाराष्ट्रामध्ये या पिकाच्या लागवडीसाठी वेगवेगळ्या जातींचा वापर केला जातो. हवामानाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. त्या त्या भागानुसार जातींना नावे दिली आहेत. जसे सातारा परिसरातील माहीम, औरंगाबाद परिसरातील औरंगाबादी, कालिकत, कोचीन, मारन इ. जातींचा समावेश होतो; तर काही जाती बाहेरच्या देशांतून आयात केलेल्या आहेत. त्यामध्ये रिओडी जानशे, चायना, जमेका या जातींचा समावेश होतो. राष्ट्रीय स्तरावर भारतीय मसाल्याचे पीक संशोधन केंद्र कालिकत यांनी काही जाती प्रसारित केल्या आहेत. 

१. वरदा : कालावधी २०० दिवस, उत्पादन २२.३ टन प्रति हेक्टर, तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के, फुटव्यांची संख्या ९ ते १०, सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के. 
२. महिमा : कालावधी २०० दिवस, उत्पादन २३.२ टन प्रति हेक्टर, तंतूचे प्रमाण ३.२६ टक्के, फुटव्यांची संख्या १२ ते १३, सूत्रकृमीस प्रतिकारक जात, सुंठेचे प्रमाण १० टक्के. 
३. रिजाथा : कालावधी २०० दिवस, उत्पादन २२.४ टन प्रति हेक्टर, तंतूचे प्रमाण ४ टक्के, सुगंधी प्रमाण २.३६ टक्के, फुटव्यांची संख्या ८ ते ९, सुंठेचे प्रमाण २३ टक्के (प्रामुख्याने सुंठ बनवण्यासाठी जात प्रसारित) 

बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी :
- कंदकूज रोगास बळी न पडलेल्या शेतातून ९ ते १० महिने पूर्ण झालेले कंद आल्याचे बियाणे म्हणून वापरावे. 
- आल्याच्या बियाण्यास १ ते १.२ महिन्याची सुप्तावस्था असते. निवडलेले बियाणे सावलीच्या ठिकाणी साठवावे, त्यास ‘आडी लावणे’ असे म्हणतात. 
- बियाण्याची आडी लावलेल्या ठिकाणी हवा खेळती राहील असे पाहावे. तसेच, बियाण्याच्या ढिगावर दिवसातून एकवेळ गोणपाट पूर्णपणे भिजवून पिळून टाकावे. 
- लागवडीखाली एकरी १० क्विंटल बियाण्याची आवश्यकता असते. 
- लागवडीच्या अगोदर एक ते दोन दिवस बियाण्याचे २५ ते ४५ ग्रॅम वजनाचे व लांबी २.५ ते ५ सेंमी असलेले तुकडे करावेत. बियाण्यावरती एक ते दोन डोळे येतील हे पाहावे. 
- बीजप्रकियेसाठी क्विनॉलफॉस २ मिलि अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे द्रावण तयार करून, त्यात बियाणे अर्धा तास बुडवून ठेवावे. 

जमिनीची मशागत व गादी वाफे निर्मिती :
- जमीन भुसभुशीत राहण्यासाठी उभी नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटींमध्ये पंधरा दिवसांचे अंतर ठेवावे. त्यानंतर मागील पिकाची धसकटे वेचून कच्चे गादी वाफे तयार करून घ्यावेत. 
- कच्या गादीवाफ्यावर शेणखत एकरी १२ ते १५ टन, लिंबोळी पेंड ४०० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, पोटॅश ५० किलो टाकून घ्यावा. त्यानंतर रोटाव्हेटर मारून खते मिसळून घ्यावीत. पक्के गादी वाफे तयार करावेत. 
- दोन गादी वाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. 
- गादी वाफ्यावर दोन ओळी लावल्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सेंमी, तर उंची ३० सेंमी ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी ठेवून, दोन कंदांमधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे. 
- गादीवाफ्यावर तीन किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळीप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सेंमी अंतर ठेवावे. 
- आले लागवडीपूर्वी गादी वाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आल्याची लागवड करावी आणि लगेच पाणी द्यावे. त्यामुळे कंद गाभळण्याचे प्रमाण कमी होऊन कंदकुजीचा धोका टळतो. 
- आले लागवडीनंतर तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक सातत्याने राहत असल्यास गादीवाफ्यावर आच्छादन म्हणून कोथिंबीर किंवा मेथीची पेरणी करावी, त्यामुळे आले पिकाचे नवीन येणारे अंकुर जास्त तापमानामुळे कोमेजून जाणार नाहीत. 
- आल्यामध्ये शेणखताचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लव्हाळा किंवा हराळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव असल्यास, लागवडीनंतर ९ - १० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१ टक्के) हे तणनाशक ४ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सजीव आच्छादन करावयाचे असल्यास तणनाशकांचा वापर टाळावा. 
- साधारण पंधरा दिवसांपासून आल्याची उगवण व्हायला सुरवात होते, त्यानंतर मात्र कोणतेही तणनाशक वापरू नये. 
- लागवडीसाठी लागणाऱ्या मजुरांची बचत करण्यासाठी आल्याची लागवड यंत्राद्वारे केल्यास फायदेशीर ठरते. 

लागवड करताना घ्यावयाची विशेष काळजी :
- लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूला असावा, त्यामुळे निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढ चांगली होते. 
- कंद ४ ते ५ सेंमी खोल लावावेत. 
- लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील, याची दक्षता घ्यावी. 
- एकरी ३० ते ३५ हजार रोपांची संख्या किंवा कंदांची संख्या ठेवावी. 

- डॉ. जितेंद्र कदम, ९४२१३९२६६८ 
(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रस, ता. मिरज, जि. सांगली) 
 

Web Title: ginger planting season start now