डिंभे धरणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

प्रतिनिधी
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सुमारे १९ गावांना कमळजाई उपसा सिंचन योजनांद्वारे डिंभे धरणातून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे - आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी डिंभे धरणाच्या कमळजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या आदिवासी भागातील तब्बल १९ गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तसेच शेतीसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सुमारे १९ गावांना कमळजाई उपसा सिंचन योजनांद्वारे डिंभे धरणातून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील व कामगार उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर झाला. सर्वेक्षणाचे आदेश जयंत पाटील यांनी दिले. त्यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे रविवारी (ता. ९) बैठक झाली. या वेळी आमदार रोहित पवार, जलसंपदा सचिव खलील अन्सारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, उपसभापती सलीम तांबोळी, पुणे जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, उपाध्यक्ष मारुती केंगले, शांताराम लोहकरे, अशोक शेंगाळे उपस्थित होते.

हेही वाचा : यांत्रिकीकरणातून शेती झाली कमी श्रमाची

डिंभे धरणात साडेतेरा टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी आदिवाशी धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहा टक्के पाणीसाठा आरक्षित आहे. यात कमळजाई उपसा सिंचन योजनेसाठी व बोरघर, फुलवडे, गोहे बुद्रुक या गावांतील शेतीसाठी पाणी उपसा योजनेसाठी ०.६० टीएमसी पाणी आवश्यक आहे. यामुळे सुमारे साडेपाच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर सुमारे दीड हजार एकराहून अधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येईल. 
- सुभाष मोरमारे, माजी सभापती, समाजकल्याण विभाग, पंचायत समिती, आंबेगाव

हेही वाचा : व्हॅलेंटाइन डेसाठी 'या' भागातून गुलाबाच्या फुलांची परदेशात निर्यात

या गावांना मिळेल पाणी
राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, मेघोली, तळेघर, फलोदे, राजपूर, म्हातारबाची वाडी, नांदूरकिचीवाडी, तेरूंगण, निगडाळे, गोहे खुर्द, कोंढवळ, कोलतावडे, कळंबई, गोहे बुद्रुक, बोरघर, फुलवडे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government has taken important decision regarding the Dhimbe dam