हरभऱ्याच्या भावपातळीत घसरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

केंद्र सरकारने देशातील हरभरा उत्पादनाचा अंदाज चार लाख टनांनी वाढविल्यामुळे आणि आयात माल तुलनेने स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे दरात घसरण दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी ५८०० ते ६५०० रुपये क्विंटलच्या रेंजमध्ये असणारा हरभरा आता ५४०० ते ६००० रुपयांवर उतरला आहे. 

केंद्र सरकारने देशातील हरभरा उत्पादनाचा अंदाज चार लाख टनांनी वाढविल्यामुळे आणि आयात माल तुलनेने स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे दरात घसरण दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी ५८०० ते ६५०० रुपये क्विंटलच्या रेंजमध्ये असणारा हरभरा आता ५४०० ते ६००० रुपयांवर उतरला आहे. 

देशातील हरभरा उत्पादनाचा अंदाज ९१ लाख टनांवरून ९५ लाख टन करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत अनुक्रमे १७.७७, १३.८२ व ४३.३७ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. तसेच मुंबई बंदरात सध्या आयातीचा हरभरा ५५०० ते ५८०० रुपये क्विंटल दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे हरभऱ्यातील तेजी रोखली गेली आहे. अकोला भागात सध्या दिवसाला २५०० ते ३००० पोत्यांची आवक होत असून भावपातळी ५४०० ते ५८०० रुपये क्विंटल आहे. आयातीचा माल वाढला तर ही भावपातळी अजून खाली जाईल; मात्र पावसाळ्याच्या आसपास पुन्हा एकदा हरभरा बाजारात तेजी येऊ शकते, असे व्यापारी म्हणाले.

बाजारात सध्या मिलउद्योगाकडून स्थिर मागणी आहे. ही मागणी आणि सरकारी खरेदी वाढल्यास भावपातळीला आधार मिळू शकतो. एसएफएसी या केंद्र सरकारच्या संस्थेने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी राज्यात हरभरा खरेदी केंद्रे उघडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु ही खरेदी किती होणार व कधी सुरू होणार याविषयी अजून माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

राज्यातील प्रमुख हरभरा उत्पादक पट्ट्यातून आतापर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास माल बाजारात आल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. लातूर मार्केटला सध्या दररोज १० ते १२ हजार क्विंटल आवक होत असून भावपातळी ५७०० ते ६००० रुपयांपर्यंत आहे. दर्यापूर, अकोला, अमरावती, लातूर भागात होणारी उच्चांकी आवक होऊन गेलेली आहे. त्यामुळे आता यापुढे आवक घसरती राहील. त्यामुळे भविष्यात मिलउद्योगाची मागणी, आयात व सरकारी खरेदी हे मुद्दे महत्त्वाचे ठरतील, असे स्टॉकिस्ट मंडळींनी सांगितले.

Web Title: Gram Falling prices