द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहण

सांगली - द्राक्ष बागा जगवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धडपड सुरू आहे. उमदी (जि. सांगली) येथे टँकरने पाणी आणून शेतकरी असे शेततळ्यात साठवत आहेत.
सांगली - द्राक्ष बागा जगवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धडपड सुरू आहे. उमदी (जि. सांगली) येथे टँकरने पाणी आणून शेतकरी असे शेततळ्यात साठवत आहेत.

सांगली - गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय...द्राक्ष बागंला टॅंकरन पाणी घालतुया... विहिरीबी कोरड्या हायत्या... जमिनीतील पाण्याची पातळी ६०० ते १२०० फुटापर्यंत खालावल्या हायत्या... प्यायला पाणी नाय तर बागला कुठणं आणायच... पीककर्ज काढलया... झाड जगवायसाठीच टॅंकरनं पाणी द्यावं लागतय तर उत्पन्न मिळणं दूरच... त्यामुळं अन्‌ कर्ज कसं फेडायचं असं पळशी (ता. खानापूर) येथील शेतकरी सांगत होते. 

पाणीटंचाईच्या निमित्तानं खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, आणि जत तालुक्‍यांचा दौरा केला. चौका चौकात शेतकरी बसून होते. पाऊस तर गेला. आता करायचं काय? अशा चर्चा शेतकरी करत होते. ‘‘ताकारी, टेंभूचं पाणी चार पाच मैलावर आलंया...पण तिथनं पाणी टॅंकरन आणल्याशिवाय पर्याय न्हाय बघा...पण डिझेलचे दर वाढल्याती त्यामुळं टॅंकरबी महाग बसतूया,’’ असा संवाद अमित गुरव आणि पंकज पिसे यांच्यात सुरू होता. यंदा हवामान खात्यानं चांगला पाऊस पडलं असं अंदाज व्यक्त केला होता. पण पाऊस पडलाच नाही. 

दुष्काळीपट्ट्यात परतीचा पाऊस पडतो. यामुळे शेतकऱ्यांना थोडेतरी पाणी मिळते. पण यंदा परतीचा पाऊस न बरसताच निघून गेला. यामुळं द्राक्ष पट्ट्यात फळ छाटण्याच थांबल्या. प्रत्येक ठिकाणी पाणी कसे आणायचे याचे शेतकरी नियोजन करत होते. जवळपास कुठंच पाणी नव्हतं. पंधरा ते वीस किलोमीटरवर पाणी होत. पण, ते पाणी आणण्यासाठी गेल्या वर्षीपेक्षा टॅंकरमागे ३०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागणार असल्याने आर्थिक पडवरणारे नव्हते. गेल्या वर्षी २५०० ते २७०० प्रतिटॅंकर असा दर होता. तर यंदा ३००० रुपये प्रतिटॅंकर दर आहेत.

जत तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी टॅंकर दुरुस्ती करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसले. टॅंकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ३० ते ५० किलोमीटरच्या परिसरात पाणीच नाही. जत तालुक्‍यातील शेतकरी उजनी किंवा कर्नाटकातील भीमा नदी पाणी आहे, त्याठिकाणाहून पाणी आणण्यासाठी जाणार आहेत. या भागातील लोकांनी पाणी दिलं तरच पाणी, अन्यथा स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. त्या वेळी कुठून ना कुठून तरी पाणी उपलब्ध होत होत. मात्र, यंदा भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ३० ते ५० किलोमीटरच्या परिसरात पाणी नाही. पुढील परिस्थिती खूप वाईट आहे.

खानापूर, तासगाव, जत तालुक्‍यांत गेल्या चार ते पाच वर्षांपासून अपेक्षित पाऊसच झालेला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर ६०० फूट बोअर घेऊनदेखील पाणी लागत नाही. तर जत तालुक्‍यात १२०० ते १३०० फूट खोल बोअर घेतली तरीही नुसताच मातीचा फुफाटा शेतकऱ्यांच्या नशिबी आहे. 

प्रतिक्रिया
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टॅंकरने पाणी देऊन द्राक्ष बागा जगवल्या आहेत. मात्र, आता पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. माझी विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे बागेला पाणी कसे आणायचे असा प्रश्‍न पडला आहे.
- सुनील हसबे, शेतकरी, हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली.

आमच्या गावातील पाण्याची पातळी ६०० फुटापेक्षा खाली गेली आहे. दुष्काळाच्या चक्रातून संपण्याची भीती निमार्ण झाली आहे. नवीन उद्योग करू शकत नाही.
- अमित गुरव, शेतकरी, पळशी, ता. खानापूर, जि. सांगली.

बागेला टॅंकरने पाणी देण्याची माझी ऐपत नसल्याने मी बाग धरली नाही. त्यामुळे जगणे मुश्‍कील झाले आहे, बॅंकेचा हप्ता ही भरू शकत नाही.
- मनोहर थोरात, शेतकरी, झरे, ता. आटपाडी, जि. सांगली.

सन २०१५ चा दुष्काळापेक्षा सध्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तीस किलोमीटर परिसरात पाणी नाही. पुढील परिस्थिती खूप वाईट आहे. शासनाने म्हैसाळंच पाणी सोडावं. तर लोक जगू शकतील.
- विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत, जि. सांगली.

द्राक्ष हंगामातील एकरी अंदाजे खर्च
    हंगाम १५० दिवस
    त्यापैकी ७५ दिवस टॅंकरने पाणी द्यावे लागते
    प्रतिटॅंकर ३ हजार रुपये प्रमाणे प्रतिदिनी एक टॅंकर 
    ७५ दिवसांचे २ लाख २५ हजार
    कीडनाशके, खते आणि मजुरी दोन ते अडीच लाख
    असा एकूण सव्वा चार लाख ते चार लाख ७५ हजार अंदाजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com