द्राक्ष सल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सध्याची अवस्था ही छाटणीनंतर १४७ दिवसांची असून, घड काढणीच्या स्थितीमध्ये आहे. 

सध्याची अवस्था ही छाटणीनंतर १४७ दिवसांची असून, घड काढणीच्या स्थितीमध्ये आहे. 

पाणी व खत व्यवस्थापन : 
- डॉ. ए. के. उपाध्याय 
- अपेक्षित पॅन बाष्पीभवन - ८ ते १० मिमी 
- ज्या बागा विश्रांतीच्या स्थितीमध्ये जाणार आहेत, त्या ठिकाणी सध्या वेलीवर असलेली पाने वाळणार नाहीत, व वेलींची प्रकाश संश्लेषणाची क्रिया योग्य प्रकारे सुरू राहील इतपत पाणी द्यावे. या काळात सिंचनाचे प्रमाण अंदाजे आठवड्यातून दोन वेळा ५,००० लिटर प्रति एकर द्यावे. मात्र, फुटव्यावर नवीन वाढ होताना आढळल्यास पाण्याचे प्रमाण कमी किंवा बंद करण्याची काळजी घ्यावी. 
- जर भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्यास, खरड छाटणीच्या वेळी बोदावर मल्चिंग करण्यासोबतच एक प्रवाही पाणी देऊन घ्यावे. मल्चिंगमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होईल. जमिनीतील क्षारांचा ताण कमी होण्यासोबतच मातीतील ओलाव्यामुळे नव्या फुटींना चालना मिळेल. 
- पायाभूत छाटणीनंतर १३,६०० ते १७,००० लिटर प्रति एकर प्रति दिन पाणी फुटींच्या वाढीच्या अवस्थेत द्यावे. 

खत व्यवस्थापन 
१) विश्रांती ते पायाभूत छाटणीच्या अवस्थेतील बागा - 
युरिया १० किलो, डीएपी १० किलो आणि सल्फेट ऑफ पोटॅश १० किलो प्रति एकर या प्रमाणे १५ ते २० दिवसांतून दोन वेळा विभागून द्यावे. 
- बागेमध्ये मुक्त सोडियमचे प्रमाण अधिक असल्यास, मातीमध्ये जिप्सम मिसळून पाण्याचा निचरा करावा. 
- चुन्याचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमध्ये याच कारणासाठी सल्फरचा वापर करावा. 

पायाभूत छाटणी अवस्थेतील बागा - 
शेणखत, कंपोस्ट किंवा अन्य सेंद्रिय खतांचा वापर छाटणीपूर्वी १२ ते १५ दिवस करावा. शक्य असल्यास शेणखतामध्ये २०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून द्यावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक व पोषकतेचे प्रमाण वाढून, मुळांच्या परिसरामध्ये ओलावा राहण्यास मदत होते. निचऱ्याद्वारे होणारे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. 
- चुनखडीयुक्त जमीन असल्यास, सल्फर ५० किलो या प्रमाणे मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे. त्यामुळे कॅल्शिअम कार्बोनेटमध्येही जमिनीची कार्यक्षमता वाढते. सेंद्रिय खतासोबत मिसळून सल्फरचा वापर केल्यास मुळांच्या कार्यक्षेत्रातील कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण कमी होते. तसेच मातीचा सामूही कमी होतो. 
- फुटी वाढीच्या अवस्थेत असल्यास, एकरी २५ किलो युरिया दोन ते तीन वेळा विभागून द्यावा. जर फुटींची वाढ जोमदार असेल, तर नत्राचा वापर थांबवावा. फुटी स्थिर होईपर्यंत उर्वरीत नत्र देऊ नये. 

कॅनोपीचे व्यवस्थापन 
- डॉ. आर. जी. सोमकुंवर 

- कलम केलेल्या वेलीमध्ये : 
बागेमध्ये वाढत असलेल्या तापमान आणि कमी होणाऱ्या आर्द्रतेमुळे पाण्याची गरज वाढणार आहे. वेलीचे खोड आणि आकडे चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी शाकीय वाढीला चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठी नत्रयुक्त खते उदा. १२-६१-० आणि युरिया चांगली भूमिका निभावतात. ही खते संध्याकाळी किंवा सकाळी लवकर दिल्यास फायदा होतो. 

- जुन्या वेलीमध्ये : 
खरड छाटणीपूर्वी १२ ते १५ दिवस आधी ३ ते ४ इंच खोली आणि दोन फूट रुंदीचा चर खणून घ्यावा. यामुळे काही प्रमाणात मुळी तुटून सूर्यप्रकाशामध्ये येतात. अशा तुटलेल्या मुळांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही व या मुळ्या अधिक काळ प्रखर सूर्यप्रकाशामध्ये राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अन्यथा वेलींवर अधिक ताण येऊ शकतो. 

कीड व कोळी नियंत्रण व्यवस्थापन 
- डॉ. डी. एस. यादव, डॉ. बी. बी. फंड 

काढणीपूर्व स्थितीतील बागांमध्ये मिली बग आणि कोळी यांचा प्रादुर्भात वाढू शकतो. 
- मिली बग व कोळी यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्यावे. प्रादुर्भाव असलेल्या घडापासून अन्य निरोगी घडांना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. 
- कोळी किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासठी १०० लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणे फवारणी करावी. कोळ्यांचा अधिक प्रादुर्भाव असल्यास, पानगळ रोखण्यासाठी सल्फर (८० डब्ल्यूडीजी) १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

टीप : 
- सध्याच्या स्थितीमध्ये फवारणीपूर्वी एमआरएल व पीएचआयच्या अद्ययावत नोंदीसाठी अॅनेक्श्चर ५ या आधार घ्यावा. 
- पीक सल्ला हा तज्ज्ञांनी हवामान, वाढीची अवस्था आणि अन्य परिस्थितींचा विचार करून दिलेला आहे. त्यामध्ये स्थान व बदलत्या परिस्थितीनुसार काही बदल होऊ शकतात. 
(स्रोत : द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.) 

 

Web Title: grapes farming