मिरची, तुरीसह पारंपरिक मालासाठी मोर्शी बाजार समिती

विनोद इंगोले 
शनिवार, 1 एप्रिल 2017

हिरव्या आणि लाल मिरचीसोबतच सोयाबीन, तूर, हरभरा, गहू ज्वारी अशा पारंपरिक पिकांच्या खरेदी-विक्रीचे ‘हब’ म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बाजार समिती नावारुपास आली आहे. तालुक्‍यातील १६५ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीत सध्या तुरीची आवक दर दिवशी ३ हजार क्‍विंटलच्या घरात आहे. मिरचीची वार्षिक आवकही सुमारे १२ हजार क्‍विंटलच्या घरात आहे. 

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या तालुक्‍यांत नागपुरी संत्र्याखाली सुमारे ६० हजार हेक्‍टरच्या आसपास क्षेत्र आहे. याच कारणामुळे या भागाला विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ म्हटले जाते. परंतु संत्र्याचे बहुतांश व्यवहार थेट बागेत होत असल्याने या भागातील बाजार समित्यांमध्ये संत्र्यांची उलाढाल होत नाही. असे असले तरी मोर्शी बाजार समितीने मिरची व अन्य शेतमालाच्या उलाढालीतून वेगळे अस्तित्व जपले आहे. सन १९६३ मध्ये स्थापन झालेल्या या बाजार समितीचा परिसर सुमारे पाच एकरांचा आहे. बाजार समितीचा उपबाजार लेहगाव येथे असून तो चार एकरांवर विस्तारीत आहे. 

खरेदीचा निश्चित ठराविक दिवस 
या बाजार समितीत शेतमालाची आवक दररोज होत असली तरी मुख्य बाजार आणि उपबाजारात खरेदीसाठी ठराविक दिवस निश्चित केले आहेत. बाजार समिती सचिव लाभेश लिखीतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस मोर्शीस्थित मुख्य परिसरात मालाची खरेदी होते. मंगळवार, शुक्रवार असे दोन दिवस उपबाजार लेहगाव येथे ठरवून देण्यात आले आहेत. मंगळवारी मोर्शीच्या मुख्य बाजारात मिरचीचे व्यवहारदेखील होतात. पावसाळ्याचे दोन महिने वगळता उर्वरित कालावधीत मिरचीच्या आवकेत सातत्य राहते. दर मंगळवारी मिरचीची सुमारे ६०० क्विंटलपर्यंत आवक होते. 

फक्त पाच रुपयांत जेवण 
बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांत जेवणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. दररोज सुमारे १५० शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. योजनेत शेतकऱ्याचे पाच रुपये, अडत्या व व्यापाऱ्याचे प्रत्येकी पाच रुपये तर बाजार समितीचे दहा रुपये याप्रमाणे २५ रुपये होतात. बाजार समितीच्या पाच एकर परिसरात दोन ‘वॉटर फिल्टर’द्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. देशभरातील बाजारभाव दर्शविणारे ‘इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले’ बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात आहेत. 

निवास व्यवस्था निःशुल्क 
मोर्शी, वरुड तालुक्‍यापासून मध्य प्रदेशची सीमा जवळच आहे. त्यामुळे येथील खरेदीदार तसेच विक्रेत्यांची रेलचेल या बाजारात राहते. त्या भागातील शेतकरीही आपला माल विक्रीसाठी येथे आणतात. अंतर जास्त असल्याने शेतमालाचे व्यवहार न झाल्यास शेतकरी निवासाच्या माध्यमातून दोन खोल्यांची उपलब्धता निशुल्क करण्यात आली आहे. 

उत्पन्नासाठी व्यावसायिक संकुल 
बाजार समितीने उत्पन्नवाढीचे स्राेत निर्माण केले आहेत. मुख्य रस्त्यावर बाजार समिती असून दर्शनीय भागातील व्यापारी संकुलात २० गाळे बांधण्यात आले आहेत. व्यावसायिक वापरासाठी हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. बाजार समितीच्या आतील भागातही १८ गाळे उभारण्यात आले असून त्या माध्यमातूनही उत्पन्न मिळते. 

खुली लिलाव पद्धती 
शेतमालाचा ढीग लावून त्यासोबतच पोत्यातील शेतमालाचा अंदाज घेत लिलाव करण्याची पद्धत येथे आहे. पोते उघडून त्यातील शेतमालाचा दर्जा व्यापाऱ्यांकडून पाहिला जातो. पोत्यातील संपूर्ण मालाचा अंदाज घेत बोली लावली जाते. व्यापाऱ्यांचा आक्षेप असल्यास ढीग लावूनदेखील लिलाव पार पाडले जातात. शेतमालाच्या साठवणुकीसाठी बाजार समितीने चार शेडसची उभारणी केली आहे. 

झालेली आवक 
सन २०१५-१६ या वर्षात बाजार समितीत सोयाबीनची २१ हजार १०१ क्‍विंटल आवक झाली. तुरीची सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ५४८ क्‍विंटल, गहू १६ हजार १८२ क्‍विंटल, ज्वारी ४ हजार ७२१ क्‍विंटल तर हरभऱ्याची ७ हजार ८६५ क्‍विंटल एवढी आवक झाली. व्यवहारापोटी शेकडा १ रुपया मार्केट शुल्क तर पर्यवेक्षक शुल्क ५ पैसे आकारले जाते. 

नव्वद टक्‍के व्यवहार ‘कॅशलेश’ 
नोटाबंदीनंतर शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार बाजार समितीमधील ९० टक्‍के व्यवहार हे शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात चुकारे किंवा चेक या पद्धतीद्वारे होतात. बाजार समितीमधील १० टक्‍के व्यवहार मात्र रोखीने होतात. 

शेतमाल तारणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद 
बाजार समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण योजनेला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या वर्षीपर्यंत केवळ दीड लाख रुपयांचा शेतमाल तारण ठेवण्यात आला होता. बाजार समिती प्रशासनाने कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ‘ऑटोरिक्षा’द्वारे जागृती केली. त्यासोबतच पत्रके वाटली. परिणामी बाजार समितीकडे यावर्षी तब्बल २५ लाख रुपयांचा शेतमाल तारण ठेवण्यात आला आहे. सहा टक्‍के व्याज दराने ७५ टक्‍के रक्‍कम या योजनेत शेतमाल तारणापोटी दिली जाते. बाजार समिती परिसरात तारण शेतमाल साठवणुकीसाठी दोन गोदामांची व्यवस्था आहे. 

मोशी बाजार समिती दृष्टिक्षेपात - 
स्थापना- १९६३ 
एकूण क्षेत्र- पाच एकर 
कार्यक्षेत्रातील गावे- १६५ 
उपबाजार- लेहगाव 
व्यापारी- २० 
अडते-४० 
हमाल- ६० 
मापारी-२० 

बाजार समितीने शेतमाल विक्रीनंतरच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. चुकाऱ्यातही सुसूत्रता आहे. बाजार समितीकडून मिळणाऱ्या सुविधा समाधानकारक असल्या तरी स्थानिक तसेच विदर्भातील बाजारभावाची माहिती व्हावी याकरिता एसएमएस सेवेची गरज वाटते. 
अजित जोशी, 
शेतकरी, मोर्शी, जि. अमरावती 

शासन आदेशानुसार बाजार समितीने शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बाजार समितीत यावर्षी नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीची विक्रमी आवक झाली. आजवर सुमारे २० हजार क्‍विंटल तुरीचे मोजमाप झाले असून सुमारे ९ हजार क्‍विंटल तूर शिल्लक आहे. इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्याचा वापर शेतमाल मोजणीसाठी होतो. तारण योजनेतील शेतमालापोटी अवघ्या अर्ध्या तासात धनादेश शेतकऱ्यांना मिळेल अशी सुलभ व्यवस्था केली आहे. 

अशोक रोडे 
सभापती, मोर्शी बाजार समिती 
संपर्क - ९४२३२२३७११. 

लाभेश लिखीतकर - ९६७३४१४१४०. 
सचिव, बाजार समिती 
 

Web Title: green chili daal market