सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक

green-chili
green-chili

गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची कमतरता आहे. परिणामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक आणि मागणी यांच्यातील तफावत वाढल्याने हिरव्या मिरचीचा बाजार चांगलाच कडक राहिला आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून मिरचीचा सर्वाधिक दर ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत राहिला आहे. आज आवक बऱ्यायापैकी घटली असली तरी सरासरी दर ३५ रुपयांपर्यंत कायम आहे. त्यातही देशी मिरचीला चांगला उठाव मिळत असून, संकरीत मिरचीच्या तुलनेत दर प्रति किलोला १० ते २० रुपयांनी अधिकच आहे. 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेली बाजारपेठ अशी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची खासीयत आहे. कांद्यासाठी ही बाजारपेठ सर्वाधिक प्रसिद्ध असली तरी फळभाज्या आणि भाजीपाल्यासाठीही ती आघाडीवर आहे. बाजार समितीतील सर्वच व्यवहार चोख आणि रोख होतात. सोलापूर शहरानजीक असलेल्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा भर याच बाजारपेठेवर सर्वाधिक भर असतो. 

मिरची लागवडीचे नियोजन  
अलीकडील काळात भाजीपाला पिकांमध्ये मिरचीची बाजारपेठ तुलनेने टिकून आहे. आकाराने देठासहीत लांब, गडद हिरवा रंग अशी ही मिरची दिसायला देखणी, पण तितकीच चवदारही आहे. अनेक शेतकरी संकरीत वाणाचीच निवड करतात. तरीही सर्वाधिक पसंती देशी वाणाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला लागवडीचे नियोजन पाऊस व पाण्याच्या उपलब्धतेवर खरीप व रब्बीत केले जाते. दरवर्षी जून-जुलै, ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार जानेवारी-फेब्रुवारी असे वेळापत्रक मिरचीसाठी करण्यात येते.     

वर्षभर मागणी  
विशिष्ट चवीमुळे स्थानिकसह जिल्ह्याबाहेरही सोलापूरच्या मिरचीला पसंती मिळते आहे. प्रति दिन ५० ते १०० क्विंटल किंवा त्यापेक्षाही अधिक आवक होते. मिरची खरेदीसाठी स्थानिकसह काही व्यापारी बाहेरूनही येतात. इथे खरेदी झालेली मिरची पुढे हैदराबाद, पुणे, मुंबईला रवाना होते. मिरचीला वर्षभर मागणी राहतेच. मात्र आषाढ महिन्यासह पुढे गौरी-गणपतीपासून नवरात्रोत्सव ते दिवाळीपर्यंत सर्वाधिक उठाव मिळतो. या काळात मिरची बाजारात येण्याचे नियोजन शेतकरी करतात. याच काळात उलाढालही चांगली होते. संकरीत मिरचीपेक्षा देशी मिरचीला प्रति किलो १० ते १५ रुपये दर अधिक मिळतो आहे. 

शेतकरी अनुभव... यंदा दराचा उच्चांक 
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील मोतीराम धोडमिसे दरवर्षी पाच ते सात वर्षांपासून रब्बी हंगामात हिरवी मिरची घेतात. त्याचे साधारण क्षेत्र २० ते २५ गुंठ्याच्या आसपास असते. त्यांची नऊ एकर शेती आहे. त्यात ऊस, कांदा अशी अन्य पिके आहेत. मागील ऑक्टोबरमध्येही त्यांनी हिरवी मिरची घेतली. ती पुढे फेब्रुवारी-मार्चपर्यंत चालली. साधारण १५ ते २० रुपये तर सर्वाधिक ३० ते ४० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळतात. मागील वर्षी कमाल दर ५० रुपये मिळाला होता. वर्षभर मागणी असल्याने एखाद्या महिन्यात कमी मिळालेला दर पुढील काळात भरून निघतो असा त्यांचा अनुभव आहे. यंदाही मिरची नियोजनाची तयारी सुरू झाली आहे. यंदा ढोबळी मिरची घेतली आहे. मात्र हिरव्या मिरचीचा खर्च त्या तुलनेत कमी आहे. क्षेत्रानुसार दोन ते तीन टन उत्पादन तर खर्च वजा जाता ५० हजार रुपये ते त्यापुढे नफा होत असल्याचे धोडमिसे यांनी सांगितले. 

मिरचीचे प्रकार, वैशिष्ट्ये 
बहुतांश हिरव्या मिरचीमध्ये संकरीत आणि देशी काळी मिरची असे दोन वाण पाहण्यास मिळतात. देशी मिरची आकाराने छोटी, कमी देठ, काळसर रंग, मात्र चवीला फार तिखट असते. त्यास पोपटी रंगाच्या संकरीत मिरचीच्या तुलनेत ४ ते ५ रुपये प्रति किलो जादा दर मिळतो. पण रोगाला ती अधिक बळावू शकते. शिवाय तिचे वजन कमी भरते. त्यामुळे तिची लागवड तुलनेने कमी असते. त्या तुलनेत संकरीत हिरवी मिरची आकाराने लांब, देठही लांब असतो, तोडताना सहज तुटते. चव मध्यम तिखट असते. तिची टिकवण क्षमता चांगली असते. त्यामुळे दूरवरच्या मार्केटमध्ये नेण्यासाठी ती सोयीची आहे. शिवाय तिचे वजनही चांगले भरते. त्यामुळे ही मिरची घेण्याकडे सर्वाधिक कल असतो. 

कमी पाण्यावर मिरची नियोजन, आठवड्याला चार क्विंटल उत्पादन
सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या नजीकच्या भागात दरवर्षी मिरचीचे हमखास उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा हे शेतकरी सोसत आहेत. पाण्याच्या पातळीने केव्हाच तळ गाठला आहे. पण त्यातूनही योग्य नियोजन करून उत्पादन घेण्यासाठी होत असलेले त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यापैकीच बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील निवृत्ती बंडगर हे एक धडपडे शेतकरी. त्यांची सव्वातीन एकर शेती आहे. पाण्यासाठी त्यांनी बोअर घेतले आहे, पण ते जेमतेम चालते. पाण्याच्या या अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी सव्वा कोटी लिटर क्षमतेचे शेततळे त्यांनी घेतले. त्यावरच टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिके तरली जातात. त्यात दरवर्षी हिरवी मिरची ठरलेली असते.

दरवर्षीचे मिरचीचे नियोजन : पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी मिरचीची लागवड ठिबकवरच होते. शिवाय पॉली मल्चिंग पेपरचाही वापर होतो. यंदा मात्र माळरानाचे काहीसे क्षेत्र असल्याने मल्चिंगचा वापर केलेला नाही. मात्र पाण्यासाठी ठिबक आणि मल्चिंग या बाबी त्यांच्यासाठी नियमित गरजेच्या ठरतात. तीन-चार वर्षांपासून संकरीत आणि देशी अशा विविध वाणांचे प्रयोग केले. तुलनेने संकरीत वाण त्यांना फायदेशीर वाटले. दरवर्षी उन्हाळ्याच्या आधी किंवा भर उन्हाळ्यात ते लागवड करतात. जूनपासून मिरचीला मार्केट असते, असा बंडगर यांचा अनुभव आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये तर यंदा एप्रिलमध्ये मिरची घेतली. सद्यस्थितीत उत्पादन सुरूच आहे. दर आठवड्याला तोडा होतो. प्रति आठवडा सुमारे चार क्विंटल उत्पादन हाती येते. पावणेतीन महिन्याच्या कालावधीत सुमारे ५० क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले आहे. जूनमध्ये प्रतिकिलो सरासरी ३० त ३५ रुपये, जुलैमध्ये २५ ते ३० रुपये तर ऑगस्टमध्ये २० ते २२ रुपये असा दर मिळाला.

आणखी दोन महिने प्लॉट चालणार
वर्षातून एकदा हिरव्या मिरचीची लागवड असते. चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात चढ-उतार आहे. पण तरीही दर टिकून आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये सरासरी दर मिळतो आहे. आणखी किमान दोन महिने उत्पादन सुरू राहिल. त्यादृष्टीने अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन करतो आहे. त्यामुळे दर कमी-जास्त झाले तरी बऱ्यापैकी उत्पन्न हाती येईल अशी आशा आहे. दुष्काळात हाच काय तो दिलासा राहील.
- निवृत्ती बंडगर, मिरची उत्पादक, बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com