मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जूनपर्यंत उष्णतेची लाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

गेल्या चार-पाच वर्षांपासून उन्हाळ्यातील तापमान वाढत चालले अाहे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम अाहे. हरित क्षेत्रात झालेली घट, वाढते शहरीकरण, विस्तारलेला खाण उद्योग अादी घटक तापमानवाढीला कारणीभूत ठरत अाहेत. 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत एप्रिल ते जूनपर्यंतचे तापमान सरासरी ते सरासरीच्या वर राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत येथे उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ शकतात, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता ४७ टक्के असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मार्च महिन्याच्या अखेरीस देशभरात तापमानात वृद्धी होऊन उन्हाच्या झळा बसल्या होत्या. एप्रिल ते जूनदरम्यान देशातील बहुतांश भागातील तापमान सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने अधिक राहील, असा अंदाज अाहे. २०१६ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचे वर्षही उष्ण राहणार असल्याची शक्यता आहे. मध्य अाणि वायव्य भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली अाहे. गेल्या अाठवडाभरात देशातील बहुतांश शहरांतील तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले अाहे. जूनपर्यंत तापमान उष्ण राहणार अाहे. वायव्य भारतातील कमाल तापमान सरासरीपेक्षा १ अंश सेल्सिअसने, तर उर्वरित भागातील तापमान ०.५ अंश सेल्सिअसने अधिक राहील, असे हवामान विभागाने म्हटले अाहे. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून उन्हाळ्यातील तापमान वाढत चालले अाहे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम अाहे. हरित क्षेत्रात झालेली घट, वाढते शहरीकरण, विस्तारलेला खाण उद्योग अादी घटक तापमानवाढीला कारणीभूत ठरत अाहेत. 
- डाॅ. कंदुरी रमेश, महासंचालक, भारतीय हवामान विभाग 

येथे उष्णतेच्या लाटांची शक्यता 
पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगण, आंध्रची किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भाग या ठिकाणी उष्णतेच्या लाटी येण्याची शक्यता आहे.

Web Title: Heat wave will continue till June in Maharashtra