पंजाबमधील पशुपालकांचा सुधारित तंत्रावर भर

पंजाबमधील पशुपालकांचा सुधारित तंत्रावर भर

आपल्याकडे शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय प्राधान्याने केला जातो. परंतु, यामध्ये व्यावसायिकता नसल्याने अपेक्षित आर्थिक मोबदला मिळत नाही. पंजाब राज्यातील दुग्धव्यवसाय हा इतर राज्यातील दुग्धव्यवसायापेक्षा अधिक व्यवसायिक पद्धतीने केला जातो. दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी आपल्याला व्यवस्थापनासाठी होणारा खर्च कमी करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपले व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. 

गाई, म्हशींना जास्तीत जास्त आराम मिळणे आवश्यक आहे. वातावरणाचा विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी वातावरणावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना फायदेशीर ठरतात. गाई, म्हशींना त्यांच्या दैनंदिन गरजा वेळेवर भागवता आल्या पाहिजेत, यासाठी पंजाबमधील पशुपालक कटाक्षाने लक्ष देतात. आजारी आणि माजावर असलेल्या गाई, म्हशींना वेळेवर ओळखता यावे, यासाठी येथील पशुपालक चांगले व्यवस्थापन ठेवतात. गाई, म्हशींना पाहिजे त्यावेळेस पुरेसा हिरवा आणि सुक्का चारा, स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. त्यांना सावली किंवा ऊन त्यांच्या मर्जीनुसार मिळाले पाहिजे. जनावरांना खरारादेखील महत्त्वाचा आहे. 

मुक्तसंचार गोठा फायदेशीर  
पंजाबमधील पशुपालकांनी गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी प्रामुख्याने मुक्तसंचार पद्धतीचा अवलंब केला आहे. मुक्तसंचार गोठा करतानाही येथील पशुपालक जनावरांची फार काळजी घेतात. 

गोठ्यामध्ये गाई, म्हशींना उन्हाचा त्रास होणार नाही, यासाठी शेडची उंची जास्त ठेवली जाते. त्यामुळे पत्र्यामुळे गरम झालेल्या हवा गाई, म्हशींच्या संपर्कात येत नाही. या ठिकाणी हवा खेळती रहाण्यासाठी दोन्ही बाजुंनी व मध्यभागी  उंची योग्य प्रमाणात ठेवलेली असते.  

मुक्त संचार गोठ्यात गाई, म्हशींना व्यवस्थितपणे आणि एकमेकांना त्रास न होता चारा खाता यावा, यासाठी विभाजन केलेली गव्हाण बनविलेली असते.

सर्वसाधारणपणे नैसर्गिकरीत्या चरताना ज्याप्रमाणे चाऱ्याची उंची असावी, त्याचप्रमाणे  गोठ्यातील गव्हाणीची उंचीदेखील कमी ठेवलेली असते. गव्हाणीत चारा टाकताना आणि स्वच्छ करताना कमीत कमी मनुष्यबळ लागेल याचा विचार येथील पशुपालकांनी केलेला आहे.

गोठ्यातील गव्हाणी लगतचा भाग ३० टक्के भाग हा पक्का असतो. इतर भागात लहान वाळू किंवा पांढरी माती टाकून तर काही ठिकाणी भाजक्या विटा वापरून जनावरांना जास्त आराम मिळावा याची दक्षता घेतली जाते.

उन्हाळ्यात त्रास कमी व्हावा यासाठी मुक्त संचार  गोठ्यात मोठे पंखे लावलेले असतात. काही ठिकाणी या पंख्यापुढे फॉगर्स लावलेले असतात. त्यामुळे गोठा लवकर थंड होण्यास मदत होते. अशा ठिकाणी वातावरणातील तापमान जरी वाढलेले असले तरी गोठ्यातील तापमान नियंत्रणात ठेवल्याने जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींचे संगोपन करणे पंजाबमध्ये शक्य झाले   आहे.

गोठ्यामध्ये मिल्किंग पार्लरची सोय
 गाईंच्या धारा काढण्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज असते. परंतु, अलीकडे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळणे अवघड झाले असल्याने पंजाबमधील पशुपालक गाईंची धार काढण्यासाठी मिल्किंग पार्लरचा वापर करत आहेत.

 मिल्किंग पार्लरमध्ये गाईंची धार कमी मनुष्यबळात काढून मानवी स्पर्श विरहीत दूध उत्पादन घेतले जाते

गाईंच्या सडातून काढलेले दूध मिल्किंग पार्लरच्या पाइपलाइनमधून बल्क मिल्क कुलरमध्ये थंड तापमानात साठविले जाते. यानंतर बल्क कुलरमध्ये साठविलेले दूध टॅंकरच्या साह्याने मुख्य दूध प्रक्रिया प्रकल्पामध्ये पाठविले  जाते.

संतुलित चारा व्यवस्थापन  
गाई, म्हशींना संतुलित चारा दिला जातो. दिवसभरासाठी जो आहार देणार आहे  तो व्यवस्थितपणे एकमेकांत मिसळून दिला तर गाई, म्हशींना योग्य प्रकारे चारा पचतो. 

 गाई, म्हशींच्या दूध देण्याच्या क्षमतेप्रमाणे चाऱ्याचे भाग केले जातात. गाई, म्हशींना मिक्सर वॅगनच्या साह्याने संपूर्ण मिश्रण असलेला आहार दिला जातो. यामध्ये पशुखाद्य, ओला चारा, मुरघास, सुका चारा व इतर खाद्यपुरके यांचे मिक्सर वॅगनमार्फत एकसारखे मिश्रण तयार केले जाते. असा मिश्रण केलेले संतुलित आहार या वेगनच्या आधारे अगदी कमी कालावधीत व कमी मनुष्यबळ वापरून गोठ्यातील गव्हाणीत दिला जातो.

गाई,म्हशींची स्वच्छता  
गाई, म्हशींची धार काढण्यापूर्वी त्यांना वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या जागेतून पुढे जावे लागते. याठिकाणी त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे सोडले जातात. या वेगवान फवाऱ्यांच्यामधून गाई, म्हशी गेल्याने त्या स्वच्छ होतात. तसेच त्यांच्या शरीराचे तापमानही थंड होते.

शेण काढण्यासाठी स्क्रबर  
 गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी गाई, म्हशी चारा खातात त्या ठिकाणाची जमीन सिमेंट कॉक्रिटची बनविलेली असते. या ठिकाणी जास्त प्रमाणात शेण, मूत्र पडलेले असते.
 गोठ्यातील जागा स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित किंवा हाताने ओढण्याचा स्क्रबर वापरला जातो. स्क्रबर वापरून शेण एका बाजूला एकत्र केले जाते. 

 काही पशुपालकांनी शेण, मूत्र स्लरी एका ठिकाणी जमा करण्यासाठी गोठ्याच्या जवळ टाक्या तयार केलेल्या आहेत.

डंग लोडर 
मुक्तसंचार गोठ्यात एकत्र केलेले शेण हे वाहनामध्ये भरण्यासाठी जास्त मनुष्यबळ लागते. त्यामुळे कमी खर्चात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शेण भरण्यासाठी डंग लोडरचा वापर केला जातो. यामध्ये ट्रॅक्टरच्या हायड्रोलीकचा वापर केलेला आहे. 

 ः डॉ. शांताराम गायकवाड, ९८८१६६८०९९

 ( लेखक गोविंद मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com