सात तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ 

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सात तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये २०१८ च्या तुलनेत यंदाच्या (२०१९) महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे.

परभणी - जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सात तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये २०१८ च्या तुलनेत यंदाच्या (२०१९) महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. परंतु, जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झालेली नाही. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदीनंतर हे आढळून आले आहे. 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे यंदाच्या (२०१९) सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. यंदा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत राहिला. परंतु, गतवर्षीप्रमाणे पावसाचा दीर्घ खंड पडला नाही. 

सप्टेंबर महिन्यात अनेक तालुक्यांतील मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील नऊ पैकी परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सात तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये ०.०६ ते २ मीटरने वाढ झाली. परंतु जिंतूर, सेलू या दोन तालुक्यांतील अनेक मंडळामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली नाही. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात गतवर्षीप्रमाणेच सेलू तालुक्यातील भूजलपातळी सर्वाधिक म्हणजे १०.२३ मीटर खाली, तर पूर्णा तालुक्यातील भूजलपातळी सर्वांत वर म्हणजे १.४७ मीटर असल्याचे आढळून आले. 

गेल्या पाच वर्षांतील सरासरी भूजलपातळीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भूजलपातळी जिंतूर तालुक्यात ०.२३ मीटरने, तर सेलू तालुक्यात २.१० मीटरने कमी झाली. २०१४ ते २०१८ या पाच वर्षांतील सरासरी भूजलपातळीच्या तुलनेत यंदा परभणी तालुक्यातील भूजलपातळी १.७३ मीटरने वर, मानवत तालुक्यात ०.८४ मीटरने, पाथरी तालुक्यात १.६६ मीटर, सोनपेठ तालुक्यात १.९६ मीटर, गंगाखेड तालुक्यात १.५१ मीटर, पालम तालुक्यात ०.९६ मीटर, पूर्णा तालुक्यात २.४१ मीटरने वर आली. गतवर्षी ऑगस्ट महिन्यातच बहुतांश भागांत पाऊस उघडला होता. यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत अनेक भागांत पाऊस सुरू होता. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या नोंदी नंतर भूजलपातळीत बदल झाल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतरच पाणीटंचाई उद्भभवणाऱ्या गावांची संख्या समजू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. 

सप्टेंबरमधील तुलनात्मक भूजलपातळी (मीटरमध्ये) 
तालुका...२०१८...२०१९...फरक 
परभणी...६.६५...६.५९...०.०६ 
जिंतूर...४.५४...५.४४...-०.९ 
सेलू ...८.५१...१०.२३...-१.७२ 
मानवत...४.५७...३.८३...०.७४ 
पाथरी...५.९३...५.५९...०.३४ 
सोनपेठ...६.५४...४.५४...२.० 
गंगाखेड...८.४१...६.७७...१.६४ 
पालम...४.४९...३.१७...१.३२ 
पूर्णा...२.०३...१.४७...०.५६ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in ground water level in seven talukas