मॉन्सून यंदा वेळेवर; केरळात १ जूनला येणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

‘‘सध्या आम्ही अल निनोबाबत चिंतेत नाही आहोत, कारण अल निनोचा वातावरणीय बदल जुलैनंतरच आढळण्यास प्रारंभ होईल. परिणामी, मॉन्सून केरळात १ जूनला येईल.’’ 
- के. जे. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान विभाग.

नवी दिल्ली - मॉन्सूनचा देशातील कार्यकाळ यंदा अल निनोमुळे प्रभावित होणार नाही. केरळात १ जूनला मॉन्सून दाखल होऊन सरासरी गाठेल, असे संकेत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के. जे. रमेश यांनी दिले आहेत. मॉन्सून कार्यकाळ संपल्यानंतर त्याचा प्रभाव जाणविणार असल्याने, पावसाचे चारही महिने सुखरूप पार पडतील, असेही श्री. रमेश म्हणाले. 

गेल्या सहा-सात वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमनावर ‘अल निनो’चा प्रभाव राहिला अाहे. परिणामी, मॉन्सूनचे सरासरी वेळापत्रक नेहमीच प्रभावित होत आले. महाराष्ट्रासह देशातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने गेली चार वर्षे सतत दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. पावसाने सरासरी गाठली जरी, तरी वेळापत्रकच बिघडल्याने पिकांचे उत्पादन अशाश्‍वत झाले आहे. पावसाच्या मोठ-मोठ्या खंडाने तर शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. यंदा मात्र, तूर्त अल निनोचा प्रभाव जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर काळात राहणार नसल्याने पाऊसकाळ सुरळित पार पडण्याची आशा निर्माण झाली अाहे. 

सरासरी १ जूनला मॉन्सून केरळात दाखल होतो, यानंतर ७ जूनला तो महाराष्ट्रात व १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तर भारताकडे मार्गक्रमण करत असतो. मॉन्सूनचे परतणेसुद्धा वेळेतच होण्याचे संकेतही मिळाले अाहेत. 

पूर्व व मध्य पॅसिफिक समुद्रतळातील तापमानवाढीच्या प्रकाराला ‘अल निनो’ परिणाम असे म्हटले जाते. साधारणत: काही वर्षांनंतर निसर्गातील हा तापमानवाढीचा प्रकार होत असताे. अल निनोमुळे भारतीय मॉन्सून प्रभावित होऊन कमी पाऊस, दुष्काळ, मोठे खंड असे परिणाम होत असतात, असा अभ्यास आहे, तर दुसरीकडे ‘ला निनो’ या प्रकारात हेच समुद्रतळ तापमान कमी होत जाते, ज्यामुळे अधिक पाऊस पडण्याचे संकेत मिळत असतात. 

२०१६मधील अल निनोच्या प्रभावामुळे पीक नुकसान, आग अाणि महापूर अशी संकटे अाल्याचे म्हटले. गेल्या वर्षी ‘ला निनो’चा प्रभाव मॉन्सून कार्यकाळावर असल्यामुळे सरासरीच्या पुढे पावसाचा अंदाज देण्यात आला होता. मात्र सरासरीच पाऊस पडल्याचे आणि ‘अल निनो’ अाणि ‘ला निनो’चा कमी प्रभाव भारतीय मॉन्सूनवर पडत असल्याचे श्री. रमेश यांनी सांगितले. भारतीय मॉन्सूनची सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्क्यांदरम्यान असतो. सरासरी ८९ सेंटिमीटर पाऊस या चार महिन्यांच्या कालावधीत गृहीत धरला जातो. 

भारताच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) अाहे. देशातील २६३ दशलक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची पिके हे या मॉन्सूनवरच अवलंबून असतात. २०१६मध्ये सरासरी पाऊस पडूनही भारताला शतकातील चौथ्या सततच्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. 

‘‘सध्या आम्ही अल निनोबाबत चिंतेत नाही आहोत, कारण अल निनोचा वातावरणीय बदल जुलैनंतरच आढळण्यास प्रारंभ होईल. परिणामी, मॉन्सून केरळात १ जूनला येईल.’’ 
- के. जे. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान विभाग.

Web Title: India's monsoon likely to escape El Nino unscathed