ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मध्य-दक्षिण विभागात ३.१० अब्ज टन इथेनॉलची निर्मिती झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा इथेनॉलची निर्मितीही तुलनेत कमी आहे. येथे ४४.२ टक्के ऊस हा साखर उत्पादनासाठी वापरला जातो, तर ५५.८ टक्के ऊस हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरतात.

नवी दिल्ली : ब्राझीलच्या मध्य आणि दक्षिण विभागातील साखर कारखान्यांमध्ये मे महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात २.११ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत येथे २.०७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. तुलनेत यंदा उत्पादनात १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे येथील साखर उद्योग संघटनेने (यूएनआयसीए) एका अहवालात म्हटले आहे. 

ब्राझील हा जागतिक पातळीवर साखरेचा सर्वांत मोठा उत्पादक व निर्यातदार आहे. येथील दक्षिण-मध्य भागात एप्रिल ते मार्च या कालावधीत ऊस उत्पादन घेतले जाते. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत गाळप हंगाम सुरू असतो. या क्षेत्रातील कारखान्यांची संख्या ब्राझीलच्या एकूण कारखान्यांच्या उत्पादनाच्या ९० टक्के साखर उत्पादित होते. १ एप्रिल ते १५ मे दरम्यान येथे ८०.२८ दशलक्ष टन उसाचे गाळप झाले होते. गाळपास यंदा उशीर झाल्यामुळे साखर उत्पादनावर काहीस परिणाम झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. 

दरम्यान, मध्य-दक्षिण विभागात ३.१० अब्ज टन इथेनॉलची निर्मिती झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा इथेनॉलची निर्मितीही तुलनेत कमी आहे. येथे ४४.२ टक्के ऊस हा साखर उत्पादनासाठी वापरला जातो, तर ५५.८ टक्के ऊस हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरतात. 

दृष्टिक्षेपात ब्राझीलचे ऊसचित्र 
साखर उत्पादन : 

  • जागतिक साखर उत्पादनात क्रमांक : १ 
  • जागतिक उत्पादनापैकी वाटा : २५ टक्के 
  • जागतिक निर्यातीत वाटा : ५० टक्के 

इथेनॉल उत्पादन : 

  • जागतिक इथेनॉल उत्पादनात क्रमांक : २ 
  • जागतिक इथेनॉल उत्पादनापैकी वाटा : २० टक्के 
  • जागतिक इथेनॉल निर्यातीत वाटा : २० टक्के
Web Title: International News Agriculture news Brazil Sugar