अकोटमध्ये तूर  खरेदीत अनियमितता

अकोटमध्ये तूर  खरेदीत अनियमितता

अकोला - जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मागील हंगामात ७ फेब्रुवारी ते २२ एप्रिल २०१७ याकाळात तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा चौकशी अहवाल अकोट सहायक उपनिबंधकांनी दिला अाहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणी अकोट पोलिसात फिर्याद करण्यात अाली असून पोलिसांनी कायदेशीर बाबी तपासण्यासाठी तूर्त हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार अाहे.      

याबाबत अधिक माहिती अशी, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी पणनमंत्र्यांकडे तूर खरेदीबाबत तक्रार केली होती. मंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे जिल्हा उपनिबंधकांना अादेश दिले होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सहायक उपनिबंधकांना संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याबाबत नियुक्त केले. या प्रकरणाचा अाता जवळपास वर्षभराने अहवाल अाला अाहे. त्यातही स्पष्टपणे व थेट दोषींची नावे देण्यात अालेली नसल्याचे सांगितले जाते. भ्रष्टाचार झाला असा फक्त अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ फेब्रुवारी ते २४ एप्रिल २०१७ या काळात झालेल्या तूर खरेदीत टोकण व पास वाटपात अनियमितता झाली असल्याची बाब तक्रारीद्वारे सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास अाणून देण्यात अाली होती. त्यावर नियुक्त चौकशी समितीने नुकताच आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक जी. जी. माळवे यांच्याकडे सादर केला आहे.  उपरोक्त काळात शासनाच्या बाजार हस्तक्षेप हमीभाव योजनेनुसार सुमारे २० कोटी ३९ लाखांची तूर खरेदी झालेली अाहे. एका टोकणवर एक नाव असताना प्रवेशपासवर चार ते पाच जणांची नावे होती. एका टोकणवर अनेकांची नावे दर्शवून तूर खरेदी झाली. रद्द झालेल्या ४४०१ ते ४५०० या टोकणवरही पास देवून तूर खरेदी झाली. एकूण १२०० शेतकरी अभिप्रेत असताना २६७४ शेतकऱ्यांकडून माल खरेदी दर्शविण्यात अाला. एका ट्राॅलीमध्ये साधारणतः ५० ते ५५ क्विंटल माल बसतो. मात्र प्रत्यक्षात १४५ ते १६० क्विंटल माल खरेदी झाला. एकाच ट्रॉलीची एका टोकणवर दोनवेळा मोजणी झाल्याचा संशय घेतल्या जात अाहे. चौकशी समितीला अाढळलेल्या संशयास्पद बाबींची संपूर्ण माहिती अहवालात देण्यात अाली. या अहवालानुसार चाैकशी अधिकाऱ्यांच्या अादेशाने सहायक उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी गवई यांनी पोलिसात फिर्याद दिली. तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात जी अनियमितता झाली त्यासाठी तालुका खरेदी विक्री, कृषी उत्पन्न बाजार समिती, विदर्भ को- अाॅप. मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएफ) यांच्याकडून नियमांची पायमल्ली केल्या गेली असे चौकशीनंतर निरीक्षण नोंदवण्यात अाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com