केळी, कपाशीच्या पट्ट्यात रुजविली हळद

केळी, कपाशीच्या पट्ट्यात रुजविली हळद

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरनजीक धारशिवार येथील अशपाक पिंजारी व मिलन शहा या दोघा तरुणांनी ४० एकर शेती भागीदारीत खरेदी केली आहे. केळी व कापसाच्या या पट्ट्यात काही वर्षांपासून सुमारे १० एकरांवर हळदीचे पीक चांगल्या प्रकारे रुजवण्यात हे तरुण यशस्वी झाले आहेत.दरवर्षी चांगली उत्पादकता राखताना यंदाही एकरी १८० क्विंटल अोल्या हळदीचे उत्पादन त्यांनी सेंद्रिय पद्धतीते घेत जागेवर मार्केटही मिळवले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राहणाऱ्या अशपाक पिंजारी व मिलन शहा यांची अमळनेरपासून तीन किलोमीटरवरील धारशिवारात ४० एकर शेती आहे. दोघांचेही बी. एस्सी.पर्यंत शिक्षण झाले आहे. दोघेही बालपणापासून जिवलग मित्र आहेत. जमीन खरेदी विक्री हा दोघांचा मुख्य व्यवसाय. मात्र गेल्या चार वर्षांपासून तो थंडावलेलाच आहे. वडिलोपार्जित शेती नसल्याने धारशिवारातील जमीन ही खरेदी केलेली आहे. याच जमिनीत त्यांनी विविध पिके घेतली. प्रयोगशील वृत्ती व सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रगतीचा मार्ग धरला.  

हळदीच्या पिकातून प्रगती 
सुरवातीच्या काळात कपाशी, केळी आदी पिके घेतली जायची. मात्र बदलत्या हवामानात कपाशी पीक परवडेनासे झाले. त्याला पर्याय म्हणून ते हळद पिकाकडे वळले. त्यानुसार २०१० मध्ये कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्रातून सेलम जातीचे एक क्विंटल बेणे आणले. गादीवाफा (बेड) पद्धतीने उत्पादन घेतले. पहिल्या वर्षीचा अनुभव चांगला आल्याने त्यात सात वर्षापासून सातत्य ठेवले. 

बेड व ठिबक पद्धतीचा वापर  
साधारण जूनच्या सुमारास हळद लागवडीस सुरवात होते. नांगरटीनंतर एकरी पाच ते सहा ट्रॉली शेणखत मिसळले जाते. त्यानंतर ‘बेडमेकर’द्वारे बेड तयार केले जातात. अर्धे बेड तयार झाल्यानंतर एकरी पाच क्विंटल निंबोळी पेंड, एक क्विंटल करंज पेंड यांचा वापर करून माती चांगल्या रितीने मिसळून बेड पक्के केले जातात. बेडवर ठिबकची नळी अंथरून झिकझॅक पद्धतीने लावण केली जाते. पिंजारी यांनी आपल्या २० एकरांवर ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. 

सेंद्रिय पद्धतीवर भर 
रासायनिक शेतीत उत्पादन खर्च जास्त येतो.    तसेच एकरी उत्पादकताही घटते हे लक्षात आल्यानंतर मागील वर्षापासून पिंजारी सेंद्रिय शेतीकडे वळले  आहेत. अर्थात गरजेच्या वेळी अल्प प्रमाणात रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर केला जातो. 

अोल्या हळदीच्या विक्रीवर भर 
काही शेतकऱ्यांना हळद शेतीत येणारी सर्वात मोठी तांत्रिक अडचण म्हणजे हळद शिजविणे आणि ती पॉलिश करणे हीच असते. पिंजारी यांनी त्यावर मार्ग काढला आहे. त्यांनी मागील दोन वर्षांत ओल्या हळदीच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. यामुळे शिजविणे व पॉलिश यामागील श्रमात व वेळेत बचत केली आहे. मागील वर्षी पाच एकरांत हळद होती. त्यापासून एकूण क्षेत्रात ९०० क्विंटल म्हणजे एकरी १८० क्विंटल अोल्या हळदीचे उत्पादन त्यांना मिळाले. 

अोल्या हळदीचे दर
नंदूरबारच्या एका व्यापाऱ्याने यंदा क्विंटलला १०५० रुपये या दराने हळद जागेवरच खरेदी केली. गेल्या दोन ते तीन वर्षांत अोल्या हळदीला प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये दर मिळाल्याचे पिंजारी म्हणाले. अोली हळद विकण्याचा फायदा सांगताना ते म्हणाले की फेब्रुवारीत विक्री केल्याने लवकर पैसे हाती येतात. फेब्रुवारीनंतर दुसरे पीक घेता येते.  

अन्य शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा 
आपल्या केळी, कापूस पट्ट्यात हळदीची शेती रूजवण्यात पिंजारी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रेरणेतून सुमारे १० ते १५ शेतकरी या पिकाकडे वळताना दिसत आहेत. 

पिंजारी-शहा यांची  हळद शेती दृष्टिक्षेपात 
 दरवर्षी एकरी १०० ते १५० क्विंटल ओल्या तर २० क्विंटलपर्यंत सुकवलेल्या हळदीचे उत्पादन घेतात. एकरी २२ हजार रोपे असतील व प्रति कंद एक किलो उत्पादन मिळाले तरी एकरी २२० क्विंटलपर्यंत अोल्या हळदीचे उत्पादन येऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्नशील.

बियाणे घरचे असल्यास एकरी ५० हजार तर बियाणे खरेदी करून उत्पादन खर्च सुमारे ८० हजार रूपयांपर्यंत जातो. हाच खर्च कमी करण्यासाठी आता सेंद्रीय शेतीवर भर. 

 आधुनिक बॉयलरचीही सुविधा आहे. दोन ड्रममध्ये ती एकाच वेळी शिजविली जाते. साधारण तीनशे किलो हळद २५ मिनिटांत शिजवली जाते. त्यानंतर आठ दिवस ती पसरविण्यात येते. त्यानंतर पोत्यात भरली जाते. 

वसमत मार्केट हेच मुख्य मार्केट आहे.
दोन वर्षांपूर्वी निवड पद्धतीने सेलम हळदीची काही वेगळी तयार केली आहेत. त्यात कुरकुमीनचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता वाटते अाहे. हळद संशोधन केंद्राकडे हळदीचा नमुना पाठवणार असल्याचे पिंजारी यांनी सांगितले.  

सुमारे दहा ते पंधरा जणांना वर्षभर रोजगार उपलब्ध केला आहे. त्यांच्या निवासाचीही व्यवस्थाही केली आहे. 

पाण्याच्या कमतरतेमुळे सध्या केळी पीक कमी केले आहे.

प्रशिक्षणाचा लाभ 
पिंजारी यांनी सकाळ माध्यम समूहाच्या पुणे येथील ‘एसआयएलसी’ येथील केंद्रात हळद लागवड तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. हळद पिकातील राज्यभरातील अनुभवी शेतकरी व तज्ज्ञ यांच्याशीही त्यांचा परिचय आहे. त्यातूनच सुधारीत पद्धतीचा वापर त्यांनी शेतीत केला आहे. 

बियाण्यात सुमारे  २५ हजारांची बचत 
पिंजारी म्हणाले की यंदाच्या उत्पादनातील २०० क्विंटल बेणे शिल्लक ठेवले आहे. त्याचा वापर यंदाच्या लागवडीसाठी होईल. बियाण्याचा प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर व एकरी किमान १० किलो बेणेवापर पाहाता एकरी २५ हजार ते ३० हजार रुपयांची बचत साधली आहे. 

 अशपाक पिंजारी, ९५०३२१०२७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com