कष्ट, कृषी ज्ञानाच्या संगमातून घेतले दर्जेदार मिरची उत्पादन 

तुकाराम शिंदे
बुधवार, 31 मे 2017

मराठवाड्यातील सातत्याच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतीव्यवसाय अडचणीत येत आहे. मात्र भणंग जळगाव (ता. अंबड, जि. जालना येथील बाबासाहेब खापे व त्यांची मुले देविदास, अनिकेत यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. पाणी बचतीसह आंतरपीक मिरचीचे दर्जेदार उत्पादन घेऊन विक्रीचेही उत्तम नियोजन बसवले आहे. 

मराठवाड्यातील सातत्याच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतीव्यवसाय अडचणीत येत आहे. मात्र भणंग जळगाव (ता. अंबड, जि. जालना येथील बाबासाहेब खापे व त्यांची मुले देविदास, अनिकेत यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. पाणी बचतीसह आंतरपीक मिरचीचे दर्जेदार उत्पादन घेऊन विक्रीचेही उत्तम नियोजन बसवले आहे. 

भणंग जळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील बाबासाहेब दादाराव खापे यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर शेती होती. मोठा मुलगा देविदास याच्यासह पारंपरिक पद्धतीने कष्टपूर्वक शेती करत बाबासाहेबांनी ९ एकर शेती विकत घेतली. त्यांच्या शेतीचे मोसंबी चार एकर, ऊस दोन एकर, कपाशी चार एकर असे नियोजन असते. सिंचनासाठी एक विहीर असून, पाण्याची कमतरता भासत असे. त्यामुळे २०१२-१३ पासून हळूहळू सर्व शेती ठिबक सिंचनखाली आणली. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांचा धाकटा मुलगा अनिकेत बी. एस्सी (ॲग्री) होऊन शेतीमध्ये लक्ष घालू लागला. पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्राचा वापर शेतीमधे करण्याचा आग्रह अनिकेतने धरला. पहिल्याच वर्षी गादीवाफा व प्लॅस्टिक मल्चिंग तंत्र वापरले. दुष्काळी स्थितीतही पाण्याचे काटेकोर नियोजन शक्य झाले. तीस गुंठ्यातील मिरची पिकातून सुमारे साडेपाच लाखाचे उत्पन्न मिळाल्याने कुटुंबीयांचा उत्साह वाढला. 

आंतरपिकातून साधले फायद्याचे गणित
मोसंबी बागेमध्ये तीस गुंठे क्षेत्रात मिरची लागवड केली. लागवडीपूर्वी ट्रॅक्‍टरच्या साह्याने रोटा मारून जमिनीची मशागत केली. मशागत केल्यानंतर चार फूट अंतराची सरी तयार करून बेड तयार केले. त्यावर शिफारशीप्रमाणे खताचा बेसल डोस देण्यात आला. ठिबकची लॅटरल टाकून, त्यावर मल्चिंग पेपर अंथरण्यात आला. त्यावर चार फूट बाय दीड फूट अंतरावर मिरचीची लागवड ७ नोव्हेंबर रोजी केली.

खत -पाण्याचे तीस गुंठ्याचे काटेकोर नियोजन 
सिंचनासाठी एक विहीर व एक बोअरवेल आहे. पिकाच्या वाढीनुसार योग्य तितके पाणी ठिबकद्वारे देण्यात आले. प्लॅस्टिक मल्चिंगमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले. तसेच खालील बाजूने परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे कीड व रोगांचे प्रमाण कमी झाले. 

बेड तयार करताना सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीइतका बेसल डोस देण्यात आला. लागवडीनंतर वीस दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे १९-१९-१९ तीन किलो दिले. त्यानंतर पाच दिवसाने बुरशीनाशकाचे ड्रेंचिग केले.  लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी १२-६१-० हे खत तीन किलो दिले. 

लागवडीनंतर साठ दिवसांनी फुले आल्यानंतर, १३-४०-१३ हे तीन किलो खत दिले. पुढे दर तीन दिवसांनी एकदा याप्रमाणे ही खतमात्रा सुरू ठेवली. 

लागवडीनंतर पंचाहत्तर दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट चार किलो व बोरॉन पाचशे ग्रॅम अशी खतमात्रा दिली. कीड व रोगनियंत्रणासाठी जैविक व रासायनिक पद्धतीचा योग्य मेळ घातला. काटेकोर खत व पाण्याच्या नियोजनामुळे मिरचीचे दर्जेदार उत्पादन मिळाले.  

विक्रीचे नियोजन
हिरव्या मिरचीचा दर कमी झाल्यानंतर लाल मिरची वाळवून विक्री केली जाते. त्यामुळे हे पीक शाश्वत उत्पन्न देत राहते. 
मिरचीच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेची निवड. तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी व अंबड येथे मिरचीची ठोक व किरकोळ विक्री केली. परिणामी प्रति किलो पंचवीस ते सत्तर रुपये दर मिळाला. 
सातत्यपूर्ण दर्जेदार उत्पादनामुळे व्यापारी शेतातून मिरची घेऊन जातात. 
नियमित आठवडी बाजारामध्येही बाबासाहेब खापे हे स्वतः विक्री करतात. 
ठोक व किरकोळ विक्रीचा मेळ घातल्याने चांगला फायदा मिळत असल्याचे बाबासाहेब खापे यांनी सांगितले.
पाण्याचे प्रमाण कमी पडत असल्याने उसाखालील क्षेत्र कमी करत एक एकरापर्यंत आणले आहे. त्याऐवजी कमी  पाण्यावरील हंगामी पिकांना प्राधान्य दिले जाते. 

कष्ट आणि कृषी ज्ञानाचा झाला संगम  
खापे कुटुंबातील सर्व पाचही व्यक्ती सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत शेतात काम करतात. त्यांच्याकडे ऊस, कापूस, मोसंबी, मिरची ही पिके आहेत. उत्पादन सुरू झाल्यानंतर बाबासाहेब मिरची व पिकाच्या विक्रीचे नियोजन करतात. अलीकडेच अनिकेत यांनी तीर्थपुरी येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे शेतीला पूरक उत्पन्न सुरू झाले आहे. 

अनिकेत बाबासाहेब खापे,९६७३४४०७३३

Web Title: jalna news agrowon chili production