खान्‍देशात कांद्याचे क्षेत्र यंदा वाढणार

रविवार, 26 ऑगस्ट 2018

जळगाव - खान्‍देशात यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. धुळे जिल्ह्यात कांदा लागवड वेगात सुरू असून, यंदा तेथे सुमारे तीन हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणार आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यातही सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे. 

जळगाव - खान्‍देशात यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. धुळे जिल्ह्यात कांदा लागवड वेगात सुरू असून, यंदा तेथे सुमारे तीन हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणार आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यातही सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे. 

सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. मागील दोन महिन्यांपासून दर बऱ्यापैकी असून मागणी, बाजाराचे चित्र अनुकूल आहे. पाऊस ही विलंबानंतर दाखल झाला. जुलैमध्ये आगाप लागवडी अनेक ठिकाणी झाल्या. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्‍यातील पिंपळनेर, धुळे तालुक्‍यांतील नेर, कुसुंबा, कापडणे, वडने, न्याहळोद, लामकानी, जापी भागात कांदा लागवड बऱ्यापैकी आहे. शिंदखेडा तालुक्‍यातील चिचवार व परिसरात यंदाही चांगली कांदा लागवड झाली आहे. अजूनही या भागात लागवड सुरू आहे. रोपांसाठी शेतकरी नजीकच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा भागाला पसंती देत आहे. रोपांचे दर प्रतिवाफे १००० ते १२०० रुपये आहेत. सुमारे अडीच फूट बाय १२ फुटाचे वाफे १००० रुपयांपर्यंत मिळत असून, दर मागील वर्षासारखेच आहेत. 

जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्‍यात केऱ्हाळे, रसलपूर भागात, यावलमध्ये किनगाव, साकळी, वड्री, डांभुर्णीत, चाळीसगाव तालुक्‍यांतील पिलखोड व गिरणा काठालगत चांगली लागवड झाली आहे. चोपडा तालुक्‍यातील अडावद, धानोरा, पंचक, लोणी, मंगरूळ, आडगाव, कठोरा भागातही कांदा लागवडीचे प्रमाण चांगले आहे. लागवड क्षेत्र आणखी वाढू शकते. रावेर भागात अनेक शेतकऱ्यांनी १० ते १२ दिवसांपूर्वीच गादी वाफ्यावर बी पेरणी केली आहे.

आमच्या भागात यंदा कांदा लागवड अधिक आहे. कारण कांद्याचे दर स्थिर आहेत. तसेच रोपेही फारशी महाग नाहीत. कांदा परवडत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे कल दिसत आहे. 
- संदीप पाटील, शेतकरी, यावल, जि. जळगाव.