बाजार फुलला; पण चेहरे कोमेजले..

राजकुमार चौगुले
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर : अहो काका, दहा रुपयांना किलो घ्या...आत्ताच फुले तोडून आणलीत...शेतकऱ्याची हाक. काका नको, म्हणून पुढे जातात. काका पुढे जात असल्याचे पाहून शेतकरी पुन्हा तळमळतो. पंधरा रुपयांना दोन किलो देतो घ्या ओ...दोन पावले पुढे गेलेले काका पुन्हा माघारी येतात...आणि पंधरा रुपयांना दोन किलो फुले घेऊन जातात...वीस रुपयांतले पाच रुपये परत देताना शेतकऱ्याचा चेहरा कसानुसा होतो; पण परिस्थितीच अशी की फुले, तर द्यावीच लागतील नाही, तर फेकून द्यावी लागतील..

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून कोल्हापूर शहरात झेंडू घेऊन आलेल्या शेकडो शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था रविवारी (ता. 30) बघवत नव्हती. सकाळी नऊ वाजताच किलोला दहा रुपये, अशी आरोळी देत शेकडो शेतकरी शिंगोशी मार्केट या कोल्हापुरातील प्रसिद्ध फूल बाजारात केविलवाण्या चेहऱ्याने ग्राहकांची वाट पाहात होते. सकाळीच दहा रुपये, तर दर सायंकाळी काय होइल, या चिंतेनेच त्यांना ग्रासले होते. दिवाळी सणाचा आनंद सगळीकडे झळकत असताना शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने झेंडू विकताना पाहून हळहळ व्यक्त होती.

कोल्हापुरातील शिंगोशी मार्केट हे दक्षिण महाराष्ट्रातील फुलांचे अग्रगण्य मार्केट आहे. सणासुदीला तर या बाजारात जाणेही मुश्‍किल असते. इतकी गर्दी असते लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रविवारी बाजारही फुलला होता. बाजाराच्या बाहेरीही रस्तावर पोत्यात झेंडू फुले घेऊन शेतकरी आरोळी देत विक्री करत होते; पण दहा रुपये किलो फुले म्हणताना आवाजात शीणपणा होता. युवक शेतकऱ्यांचे चेहरेही त्रासलेले होते. दिवाळीचा आनंद या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता. प्रचंड कष्टाने पिकविलेले झेंडू मातीमोल भावात विकताना हास्य कधीच पळून गेले होते. शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया घ्यायची, हेही सुचत नव्हते. खासगी वाहनांतून फुले आणणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था तर बिकटच होती. वाहतूक भाडेही निघत नव्हते.

गेल्या पंधरावड्यापासून पंधरा-वीस रुपये किलोच्या आसपास झेंडूचा दर आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारपर्यंत चांगला दर मिळतो, म्हणून पहाटेच कोल्हापूर गाठले. दिवस उजाडला आणि झेंडूच्या राशीच्या राशी पाहून मनात पाल चुकचुकली आणि क्षणात दहा रुपये किलोने विक्री सुरू झाली. तेव्हाच समजले आता काय खरे नाही...काहीही करून दुपारच्या आत फुले संपवावी, म्हणून आता मिळेल तो भाव करून फुले विकत आहे.
- संपत पाटील, सांगरुळ, जि. कोल्हापूर

झेंडू दरातील तफावत अशी (रविवार, ता. 30)
ठिकाण---विक्रेते---दर (प्रतिकिलो)
कोल्हापूर मध्यवर्ती---व्यापारी--- 30 रुपये
बस स्थानक
शाहूपुरी---व्यापारी---20 ते 25
शिंगोशी मार्केट---शेतकरी---5 ते 10

Web Title: Kolhapur Market is full of customers; but no profit for Farmers