कोकणगिड्ड देशी गायींचे संवर्धन

मुझफ्फर खान
शुक्रवार, 7 जून 2019

कोकणगिड्ड गायीची वैशिष्ट्ये 
  कोकण मुळातच डोंगररांगांचा व घाटांचा आहे. अशा डोंगरांमध्ये चढणारी व उतरणारी ही काटक व चपळ गाय आहे.
  कोकणात वनौषधींची कमतरता नाही. त्यामुळे त्यांचा पाला सतत खात राहणाऱ्या या गायीचे दूधही अत्यंत आरोग्यदायी असते. अनिकेत सांगतात की दोन्ही वेळचे मिळून पाच लिटरपर्यंत दूध मिळत असले तरी त्यातील गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध उत्पादने तयार करून त्यांनाही चांगले मार्केट देण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोकणाला निसर्गाचे मुक्त हस्ते वरदान लाभले आहे. आंबा, काजू, सुपारीच्या उंचच उंच बागा व विलोभनीय समुद्रकिनारे हे कोकणाचे वैशिष्ट्य. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील शिरळ येथील अनिकेत बापट या युवकाचीही शेती आहे. मात्र शेतीपेक्षाही त्याने देशी गायीच्या संवर्धनाला अधिक प्राधान्य दिले आहे.

कोकणगिड्ड जातीचे संवर्धन 
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिकेतला शहरात नोकरीच्या संधी होत्या. मात्र शेती व त्यातही देशी गायीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा त्याचा मानस होता. कोकणगिड्ड ही कोकणातील स्थानिक जात नामशेष होत चालली आहे. या गायीचा सांभाळ करण्यासाठी त्याने पावले उचलली. कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथील वैदिक पंचगव्य गुरुकुलमधून एक वर्षाचा प्रशिक्षणवर्ग पूर्ण केला. कोकणगिड्ड गायीचे संगोपन करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील अनिकेतचा हा एकमेव प्रकल्प असावा.

संवर्धनाचे केलेले प्रयत्न 
अनिकेत यांनी आपल्या सासूरवाडीची ११ एकर शेती कसण्यास घेतली आहे. आपल्या उपक्रमाबाबत तो म्हणाला की देशी गाय संगोपनात अनेकजण गीर, खिलार आदींना प्राधान्य देतात. मी मात्र कोकणगिड्ड या जातीचाच विचार केला. या गायीचे जातिवंत, शुद्ध ब्रीड मिळावे, यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटकंती केली. अलीकडील वर्षांत दोन जातींचे ‘क्रॉस’ करण्याचे अनेक प्रयत्न सुरी आहेत. त्यातून मूळ जात नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. आमच्या जिल्ह्यातील जुन्या पिढीतील म्हणजे वृद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन घेत, त्यांच्याकडून ओळख पटवत कोकणगिड्ड गायी घेण्यास सुरवात केली. त्याचबरोबर पुणे येथील मिलिंद देवल यांचाही या विषयात सखोल अभ्यास आहे. गायी घेताना प्रत्येक वेळी तिचे छायाचित्र वा व्हिडिओ त्यांना पाठवण्यात येत असे. त्यांनी होकार भरल्यानंतर मग गाय घेण्यात येत असे असे अनिकेत यांनी सांगितले. तीन वर्षांपासून मी या कामात व्यस्त आहे. 

व्यवस्थापन मुद्दे
  अनिकेत सांगतात, की कोकणगिड्ड गायपालनात दूध हा मुद्दा केंद्रस्थानी नाही. आईचे दूध अधिकाधिक वासरानांच पाजण्यावर आमचा भर असतो. दूध वा तुपासाठी कच्छ, भूज, राजस्थान आदी भागांत आढळणारी कांकरेज जातीची गाय आमच्याकडे आहे.

  गायींसाठी मुक्तसंचार पद्घतीचे वातावरण ठेवले आहे. विशेषतः ज्या वेळी वनसंपदा बहरते त्या वेळी आमच्या ११ एकर क्षेत्रातील कुरणात चरण्यासाठी त्यांना मोकळीक असते. कमी खर्चात संगोपन केले जात आहे. 

  ऋतुमानानुसार पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या बंदिस्त गोठ्याचा वापरही होतो.

  मका, यशवंत, मारवेल या जातींची लागवड चाऱ्यासाठी केली आहे.  

  पावसाळ्यात भात घेऊन त्याचा पेंढा आणि नाचणीचे काड तसेच डोंगरावरील नैसर्गिक गवत, मका, ज्वारी, बाजरी यांच्यापासूनही सुका चारा बनविला जातो.

  कृत्रिम रेतनापेक्षा नैसर्गिक रेतनावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी जातीवंत वळूही पाळला आहे. 

  गो संगोपनासाठी घरातील सर्व सदस्य राबतात. अनिकेत यांची पत्नी अन्वयी बीएस्ससी बायोटेक आहेत. उत्पादनांच्या पॅकेजिंगची जबाबदारी त्या सांभाळतात. 

  शेतकरी तसेच देशी गायींच्या पालनासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी कृषी पंचगव्य प्रशिक्षण वर्गाचीही सुरवात करण्यात आली आहे.   

गोमूत्र अर्क, शेणापासून उत्पादने 
अनिकेत यांनी गोमूत्रापासून अर्क व शेणापासून विविध उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्यांना मार्केट देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. गोमूत्र अर्काची विक्री प्रति लिटर २५० रुपये दराने केली जाते. तेल, शाम्पू, तूप, शीतल जल, भस्म, घनवटी, पंचगव्य आदी उत्पादने त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. धूपकांडीचे तर बाजारातील मागणीनुसार सुगंधी, अग्निहोत्र व मच्छरांना पळवून लावण्यासाठी असे तीन प्रकार केले आहेत.

रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, मुंबईपर्यंत आपले मार्केट विस्तारण्याचा प्रयत्न केला आहे. काही आयुर्वेदिक डॉक्‍टर्स गरजेनुसार काही घटक अनिकेत यांच्याकडून घेतात. महिन्याला सुमारे २० ते २५ हजार रुपयांची विक्री होऊ लागल्याचे आश्‍वासक चित्र दिसू लागल्याचे अनिकेत सांगतात. काही उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी व्हॉटसॲप, फेसबुक या सोशल मीडियाचा आधार घेतला. मात्र माऊथ पब्लिसिटीद्वारेच अधिकाधिक विक्री होत असल्याचे ते सांगतात.  

उंचीला ठेंगणी असल्याने व मूळ कोकणातील असल्याने कोकणगिड्ड या नावानेच ही गाय ओळखली जाते. सध्या पंधरा गायी असल्या, तरी येत्या काळात त्यांची संख्या ५० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. सध्या मजूरबळ कमी आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. देशी गोपालकांना सामूहिक स्तरावर बाजारपेठ मिळावी, यासाठी अन्य संघटनांसोबत संलग्न होण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- अनिकेत बापट, ९८८१६४३९५९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkangidd Cow Aniket Bapat