कृषी विस्तार आराखडा १५ दिवसांत तयार करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूरमध्ये कृषी सचिवांनी दिल्या सूचना 

नागपूर - कृषी विस्ताराला पूरक ठरणारा नियोजनबद्ध आराखडा पंधरा दिवस तयार करा. त्यासोबतच पीक प्रात्यक्षिकातून वाढलेल्या उत्पादकतेचा आढावा गंभीरपणे घेतला जाईल, असा सूचक इशारा कृषी सचिव विजयकुमार यांनी दिला. 

नागपूरमध्ये कृषी सचिवांनी दिल्या सूचना 

नागपूर - कृषी विस्ताराला पूरक ठरणारा नियोजनबद्ध आराखडा पंधरा दिवस तयार करा. त्यासोबतच पीक प्रात्यक्षिकातून वाढलेल्या उत्पादकतेचा आढावा गंभीरपणे घेतला जाईल, असा सूचक इशारा कृषी सचिव विजयकुमार यांनी दिला. 

कृषी सचिव विजयकुमार यांनी वनामती येथे नागपूर विभागातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी कृषी विस्तार कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्याकरिता जिल्हानिहाय विस्तार आराखडा येत्या १५ दिवसांत कोणत्याही परिस्थिती तयार करा, असेही त्यांनी बजावले. कृषी सचिवांच्या संकल्पनेतील या आराखड्यात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पीक प्रात्यक्षिकांमध्ये प्रशिक्षणांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. हंगामात चारापीक प्रात्यक्षिक घेतली जाणार आहेत. त्या त्या विभागानुसार हे प्रशिक्षण कोणत्या विषयावर राहतील, याचीही माहिती आराखड्यात असावी, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कमी उत्पादकता असलेल्या गावांमध्ये कृषी सहायकामार्फत प्रत्येकी १० हेक्‍टरवर नियोजनबद्ध कृषी विस्तार कार्यक्रम राबविला जाणार आहे. कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहायक यांच्यावर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राहील. हंगामाच्या शेवटी पीक प्रात्यक्षिकामुळे किती उत्पादकता वाढली याचेही निरीक्षण नोंदवावे लागणार आहे. त्यासंबंधीचा अहवाल हंगामाच्या शेवटी सादर करण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली. बैठकीला विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे उपस्थित होते. 

अवजारांची जबाबदारी कोणावर? 
जिल्हा परिषदेच्या व राज्य कृषी विभागामार्फत राज्यात अनेक ठिकाणी अनुदानावर वाटपासाठी अवजारांची खरेदी करण्यात आली. अवजारांच्या या खरेदीत तांत्रिक बाबी दुर्लक्षित करण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून त्याची उचलच झाली नाही. कोट्यवधी रुपयांची अशीच अवजारे नागपूर विभागातील अनेक जिल्ह्यांत धूळखात आहेत. या प्रकाराबद्दल कृषी सचिव विजयकुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. कोट्यवधी रुपयांची ही अवजारे/यंत्रे आता भंगारात निघाली आहेत. त्याच्या वसुलीकरिता आता कोणावर जबाबदारी निश्‍चित करावी, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. या पुढे ठराविक दर्जाची अवजारे खरेदी व्हावी, याकरिता राज्यातील कृषी विद्यापीठात असलेल्या अवजारांच्या गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Krushi vistar arakhada 15 days ready