मॉन्सून आणि मार्केट

Representational image
Representational image

गेल्या वर्षी चांगला पाऊस बरसल्यानंतर यावर्षीही मार्चपासूनच मॉन्सूनने सुखद धक्के देणे चालू केले आहे. यंदा मॉन्सून वेळेवर येण्याबरोबर तो सरासरीएवढा असा समाधानकारक बरसेल, असे एकापाठोपाठ एक अंदाज भारतीय कृषी हवामान विभागाकडून आले. या शुभ संदेशात अजून एक भर म्हणजे २६ मेला मॉन्सून श्रीलंकेत दाखल झाला असून तो ३० किंवा ३१ मे रोजी भारतीय मॉन्सूनच्या प्रवेशद्वारावर अर्थात केरळात येऊन धडकणार असल्याचे संकेत हवामान विभागाला मिळाले आहेत.

सर्वसाधारणपणे मॉन्सून एक जूनला केरळात दाखल होतो. त्यानंतर ७ जूनपर्यंत तो महाराष्‍ट्रात पोचून १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून टाकतो. अशावेळी केरळात एक ते दोन दिवस अगोदरच दाखल होणारी घटनाही महत्त्वाची मानली पाहिजे.

एकदा मॉन्सून केरळात दाखल झाला की तो झपाट्याने पुढे सरकतो. विशेष म्हणजे या वर्षी मॉन्सूनच्या गतीला सध्यातरी कोणताही अडसर दिसत नाही. त्यामुळे यावर्षी राज्यात वेळेवर (किंबहुना एक-दोन दिवस अगोदरच) पावसाला सुरवात होईल. पावसाच्या पहिल्या टप्प्यात समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांसह मार्केटमध्येही चैतन्यमय वातावरण आहे. शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. कृषी निविष्ठांचा बाजारही फुलला आहे. शेतीचे उत्पादन वाढले म्हणजे मोठा ग्राहक वर्ग असलेल्या आपल्या देशाकडे वस्तू आणि सेवांचे मार्केटिंग करण्यासाठी जगाचे लक्ष असते. 

मॉन्सूनचे वेळेवर आगमन, समान वितरण आणि समाधानकारक बरसणे म्हणजे अधिक आणि शाश्वत उत्पादनाची हमीच. असे असले तरी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात मोठी विविधता आढळून येते. कोकणात मुसळधार पाऊस पडतो तर या तुलनेत मध्य महाराष्ट्रात पावासाचे प्रमाण एक चतुर्थांश एवढे कमी असते. मराठवाड्यात येणाऱ्या मॉन्सूनच्या प्रवाहात बाष्प अजून कमी झालेले असल्यामुळे पावसाचे प्रमाण आणखीनच घटते. तर विदर्भात पर्जन्यमानाची स्थिती पुन्हा सुधारते. सरासरी पाऊसमानाच्या वर्षातही पावसाचे वेळेवर आगमन-उशिरा परतणे, उशिरा आगमन-लवकर परतणे, मध्येच मोठा खंड अथवा अतिवृष्टी असे प्रकार घडत आलेले अाहेत. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक आणि पाण्याच्याही योग्य नियोजनाची आणि व्यवस्थापनाची तयारी ठेवायलाच हवी. 

शेतीतून उत्पादन वाढ साधली गेली तरी उत्पन्न वाढ साधतेच असे नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न (निव्वळ नफा) मिळविण्यासाठी पिकांची निवड ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मागील वर्षीचे अनुभव आपल्या पाठीशी आहेत. सोयाबीन तुरीपासून गहू भुईमूगापर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवूनही त्यांच्या उत्पन्नात वाढ मात्र झाली नाही. यावर्षीही चांगल्या पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये उत्पादनवाढीची खात्री आहे, मात्र त्याचबरोबर शेतमालाचे भाव पडून (अथवा पाडले जाऊन) अधिक मिळकत न होण्याची शंकाही आहे. त्यामुळे यावर्षी शेतमालाची सध्याची उपलब्धता, जागतिक पातळीवरील उत्पादनाचे अंदाज तसेच बहुताश शेतकऱ्यांचा पिकांकडील ट्रेंड याबाबतीत माहिती घेऊन त्याचे अभ्यासपूर्ण विश्लेशष केल्यास शेतमाल काढणीच्या वेळेच्या दराचा सर्वसाधारण अंदाज येऊ शकतो.

याबाबत पीकनिहाय बाजार विश्लेषण तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरू शकते. आजच्या काळात कोणत्याही शेतमालाचे केवळ अधिक उत्पादन घेणे पुरेसे नाही तर शेतमालाचे स्मार्टपणे मार्केटिंग करून अधिक नफा पदरात पाडून घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com